लोकेश, मयंक, गेलच्या फलंदाजीमुळे पंजाबचा दुसरा विजय

    दिनांक :16-Oct-2020
|
शारजाह,
कर्णधार लोकेश राहुल, मयंक अग‘वाल व अपेक्षेनुसार ख्रिस गेलने केलेल्या बहारदार फलंदाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल सामन्यात कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 8 गड्यांनी धमाकेदार विजय नोंदविला. बंगळुरूच्या 171 धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबने 2 बाद 177 धावा काढून आपला विजय साकार केला. पंजाबचा हा आठव्या सामन्यातील दुसरा विजय ठरला असून ते गुणतालिकेत चार गुणांसह तळाच्या स्थानी आहे.
 
LOKESH RAHUL_1   
 
विजयासाठी 172 धावांचे आव्हान स्विकारून पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल व मयंक अग‘वालने 78 धावांच्या सलामी भागीदारीने दमदार सुरुवात केली. मयंक युजवेंद्र चहलच्या फिरकीला बळी पडला. त्याने 25 चेंडूत 4 चौकार व 3 षट्कारांह 45 धावांची भर घातली. त्यानंतर लोकेश राहुलला ख्रिस गेलची साथ मिळाली. गेलला खेळपट्टीवर स्थिरावण्यास थोडा वेळ लागला, मात्र त्यानंतर दोघांनी बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राहुलने मोहम्मद सिराजला, तर गेलने वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी दोन षट्कार ठोकले. दरम्यान कर्णधार व गेलने आपले अर्धशतक पूर्ण करीत संघाला विजयाच्या दिशेने नेले.
 
CHRIS GAYLE (1)_1 &n 
निकोलस पूरनचा विजयी षट्कार
अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या षट्कात पंजाबला केवळ दोन धावांची गरज होती. युजवेंद्र चहलच्या फिरकीने पंजाबला चांगलेच रोखून धरले. ख्रिस गेलने एक धाव काढली, परंतु नंतर दुसरी धाव काढताना बाद झाला तेव्हा शेवटच्या एका चेंडूवर पंजाबला एक धाव काढण्याची गरज होती व त्या चेंडूवर निकोलस पूरनने षट्कार ठोकीत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लोकेश राहुलने 49 चेंडूत 1 चौकार व 5 षट्कारांसह नाबाद 61 धावांची खेळी केली, तर ख्रिस गेलने 45 चेंडूत 1 चौकार व 5 षट्कारांसह 53 धावांचे योगदान दिले. लोकेश व गेलने दुसर्‍या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरन 6 धावांवर नाबाद राहिला.
 
MAYANK AGRAWAL_1 &nb 
 
प्रारंभी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गत सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा एबी डीव्हिलियर्स वगळता प्रत्येक फलंदाजांनी धावांचे योगदान दिले व छोट्या-छोट्या भागीदारी करून संघासाठी मर्यादित षटकात 6 बाद 171 अशी धावसं‘या उभारून दिली व पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवले.
 
 
अ‍ॅरोन फिंच व देवदत्त पडिक्कलने 38 धावांची सलामी भागीदारी करीत बंगळुरूच्या डावाची उत्तम सुरुवात केली. देवदत्तने 12 चेंडूत प्रत्येकी 1 चौकार व षट्कार ठोकीत 18 धावा काढल्या. नंतर फिंचने विराट कोहलीसोबत 24 धावांची भागीदारी करीत संघाला 62 धावांपर्यंत पोहोचवले. फिंचने 18 चेंडूत 20 धावा केल्या. पुढे कोहलीने वॉशिंग्टन सुंदरसोबत आणखी एक 24 धावांची छोटी भागीदारी केली. फिरकीपटू मुरुगन अश्विनने फिंच व सुंदरला बाद केले. पुढे कोहली व शिवम दुबे ही जोडी खेळपट्टीवर रमली व त्यांनी चौथ्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. दोन षट्कारांसह 23 धावा ठोकणार्‍या शिवमला ख्रिस जॉर्डनने बाद केले. पुढे कोहलीला साथ द्यावयास आलेला भरवशाचा खेळाडू एबी डीव्हिलियर्स मोहम्मद शमीच्या भेदक मार्‍यापुढे टिकाव धरू शकला नाही. एबीपाठोपाठ कोहलीही शमीच्या गोलंदाजीला बळी पडला. कोहलीचे दोन धावांनी अर्धशतक हुकले. त्याने 39 चेंडूत 3 चौकारांसह सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. तोपर्यंत बंगळुरुने 17.5 षटकात 6 बाद 136 धावा रचल्या होत्या. पुढे ख्रिस मॉरिस व इसुरु उडानाने नाबाद 35 धावांची भागीदारी करीत संघाला मर्यादित षटकात 6 बाद 171 धावांचा टप्पा गाठून दिला. मोहम्मद शमी व मुरुगन अश्विनने प्रत्येकी 2 बळी टिपले.
 
 
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 20 षटकात 6 बाद 171.
- अ‍ॅरोन फिंच त्रि.गो. अश्विन 20, देवदत्त पडिक्कल झे. पूरन गो. अर्शदीप सिंग 18, विराट कोहली झे. राहुल गो. मोहम्मद शमी 48, वॉशिंग्टन सुंदर झे. जॉर्डन गो. अश्विन 13, शिवम दुबे झे. राहुल गो. जॉर्डन 23, एबी डीव्हिलियर्स झे. हुड्डा गो. मोहम्मद शमी 02, ख्रिस मॉरिस नाबाद 25, इसुरु उडाना नाबाद 10, अवांतर 12.
गडी बाद क्रम : 1-38, 2-62, 3-86, 4-127, 5-134, 6-136.
गोलंदाजी : ग्लेन मॅक्सवेल 4-0-28-0, मोहम्मद शमी 4-0-45-2, अर्शदीप सिंग 2-0-20-0, रवी बिश्नोई 3-0-29-0, मुरुगन अश्विन 4-0-23-2, ख्रिस जॉर्डन 3-0-20-0.
 
किंग्ज इलेव्हन पंजाब : 20 षटकात 2 बाद 177.
लोकेश राहुल नाबाद 61, मयंक अग‘वाल त्रि.गो. चहल 45,
ख्रिस गेल धावबाद (पडिक्कल/डीव्हिलियर्स) 53, निकोलस पूरन नाबाद 06, अवांतर 09.
गडी बाद क्रम : 1-78, 2-171.
गोलंदाजी : ख्रिस मॉरिस 4-0-22-0, नवदीप सैनी 4-0-21-0, युजवेंद्र चहल 3-0-35-1, इसुरू उडाना 2-0-14-0, मोहम्मद सिराज 3-0-44-0, वॉशिंग्टन सुंदर 4-0-38-0.