आजपासून मेट्रोची प्रवासी सेवा प्रारंभ

    दिनांक :16-Oct-2020
|
- मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष योजना
- डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली पाहणी
- पहिल्या टप्प्यात सीताबर्डी ते लोकमान्यनगर मार्ग
नागपूर,
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सुरक्षेच्या मानकांचे पालन करत, नागपुरातील महा मेट्रोची प्रवासी सेवा आज पासून 16 ऑक्टोबर सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रवासी आणि मेट्रो कर्मचारी तसेच अधिकार्‍यांचा प्रवास सुरक्षित असावा या करीता अनेक महत्वाच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. या संदर्भात आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली आणि तिथे असलेल्या सर्व सोयी-सुविधांची पाहणी केली.
 
metro_1  H x W: 
 
सरकारने घोषित केलेल्या अनलॉक नियमावली प्रमाण, मेट्रो प्रवासी सेवा टप्प्या-टप्प्याने सुरु करायची आहे. म्हणूनच सुरवातीला एक्वा मार्गिके दरम्यान प्रवासी सेवा उद्या पासून सुरु होणार आहे. सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे. तसेच येत्या रविवार पासून ऑरेंज मार्गिकेवर सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याच प्रमाणे प्रवासी सेवा सुरु होत आहे. यात मास्क घातल्याशिवाय प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासले जाईल. यात काहीही तफावत आढळल्यास स्टेशन नियंत्रक या संबंधीची माहिती आरोग्य विभागाला देईल.
 
metro_1  H x W: 
 
प्रत्येक प्रवाश्याला सॅनिटायझर दिले जाईल आणि मेट्रो गाडीत प्रवेश करण्या आधी त्याने हात स्वच्छ धुणे अपेक्षित आहे. मेट्रो गाडीत असलेल्या सर्व प्रवासी उतरल्या नंतरच नव्याने प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांना डब्यात प्रवेश दिला जाईल. प्रवाश्यांनी लिफ्ट किंवा इतर उपकरणांच्या बटनांना, तसेच एस्केलेटरच्या बारला स्पर्श करू नये अशी अपेक्षा आहे. ज्या प्रवाश्यांचे तापमान 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल किंवा ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल अश्या प्रवाश्यांना प्रवास करण्यास मनाई असेल. भौतिक दूरतेच्या मानकांचे पालन करण्याकरिता स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्मसह मेट्रो गाडीत त्या संबंधी दिशा-निर्देश दिले आहेत. प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जाईल. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा या करीत हे पाऊल उचलले गेले आहे. महा मेट्रो ऍपचे त्यांनी वापर करावे हे त्यांना सूचविले जाईल. महा मेट्रो तर्फे डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावे याकरिता प्रोत्साहन दिले जाणार असले तरीही नगद पैसे देत तिकीट देखील घेता येईल. अश्या प्रकारे जमा झालेली रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जाईल. येणारी तसेच जाणारी रोख-रक्कम वेगली ठेवली जाईल.