नवरात्रीचे नवरंग...

    दिनांक :16-Oct-2020
|
प्रासंगिक
 - डॉ. शैलजा म. रानडे
 
नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीच्या पूजनाचा उत्सव. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीन देवतांचे पूजन नऊ रूपात, नवदुर्गा स्वरूपात केले जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे. बुद्धी, शक्ती आणि मुक्ती प्रदान करणारी. तिची पूजा-अर्चा, जागर, गोंधळ अशी भक्ती व्यक्त करणारी अनेक साधने. कुमारिकापूजन, श्रीसूक्त पाठ, सप्तशतीपाठ, होम-हवन, कुंकुमार्चन अशा विविध उपासनांनी देवीला प्रसन्न केले जाते.
 
देवी भागवतामध्ये देवीची रूपे वर्णन करताना ‘स्त्रिया समस्ता तव देवि रूपा।’ असे म्हटले आहे. हे देवी, सर्व स्त्रिया या तुझीच रूपे आहेत. तेव्हा अशा देवीस्वरूप असणार्‍या स्त्रियांना विविध रंगांची वस्त्रे परिधान करून, अलंकार घालून मिरविण्याची संधी मिळते. प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत नऊ रंग आपली हजेरी लावून जातात. त्यानिमित्ताने जरीकाठाच्या साड्या बाहेर काढल्या जातात. त्या विविध रंगांबरोबर मनात भक्तीचे भाव फुलत जातात. प्रत्येक दिवसाचा रंग ठरलेला. जसा मनुष्याचा स्वभाव असतो तसा रंगांचासुद्धा स्वतःचा स्वभाव असतो. खास वैशिष्ट्य असते.

g_1  H x W: 0 x 
 
करडा रंग : नवरात्राच्या पहिल्या दिवशी करड्या रंगाचे महत्त्व. हा रंग म्हणजे तटस्थ. पूर्णपणे पांढरा नाही आणि पूर्णपणे काळापण नाही. कोणतीही स्थिती ही मूळात पूर्ण नसते. म्हणून हा रंग काळ्या-पांढर्‍याचे मिश्रण दाखवतो. दिवस-रात्र, जन्म-मरण यांचा जणू हा संधिकाल. साधकाला दोन्ही स्थितींच्या संमिश्रतेची जाणीव देणारा. त्यामुळे ‘सुखदुःख समे कृत्वा, लाभालाभ जयाजयौ।’ ही द्वंद्वे सहजपणे स्वीकारता येतात. त्यामुळे साधकाला मन शांत ठेवता येते.
 
नारिंगी रंग : नवरात्राचा दुसरा दिवस म्हणजे द्वितीयेला नारिंगी रंगाचे महत्त्व. लाल आणि पिवळा यांच्या छटा घेऊन तयार झालेला हा रंग उगवत्या सूर्यनारायणाच्या रूपाशी जुळणारा. त्यामुळे सृजनशीलतेचे प्रतीक असलेला. अग्नीच्या ज्वालांशी साम्य ठेवणारा, त्यामुळे सौम्य, तरीही प्रखर. मनोवृत्ती कशी असावी याचे जणू उदाहरण म्हणजे नारिंगी रंग. परिस्थिती पाहून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सौम्य व्हा आणि दुर्जनांचा प्रतिकार करताना अग्नीप्रमाणे प्रखर व्हा, असा संदेश देणारा हा नारिंगी रंग जणू सृजनात्मकतेचे द्वार साधकाला उघडून देतो.
 
श्वेत रंग : नवरात्राच्या तिसर्‍या दिवशी श्वेत रंग महत्त्वाचा. शांती, पावित्र्य, धर्म. जेव्हढी म्हणून सत् नीतितत्त्वे आहेत त्यांचा सूचक श्वेत रंग. विद्येची आराध्य देवता सरस्वती ‘या शुभ्रवस्त्रावृता’ म्हणून गौरविली जाते. मांगल्यतेचा दर्शक श्वेत रंग धारण करण्यामुळे साधक मानसिकदृष्ट्या शुद्ध होतो. जीवनाचे हे सुंदर वस्त्र मलिन होऊ नये, कलंकित होऊ नये यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. या रंगामुळे दृष्टीला आणि मनालासुद्धा शांतीचा आनंद प्राप्त होतो.
 
लाल रंग : नवरात्राच्या चौथ्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे. लाल रंग हा मुळातच भडक, तेजस्विता दर्शक. ऊर्जा आणि तेजाचे प्रतीक. जीवनात समृद्धीचे, सौभाग्याचे चिन्ह मानले गेलेले कुंकू लाल रंगाचे. शुभकार्यात आवर्जून आपले स्थान सिद्ध करणारी मेंदीपण लाल रंगाची. जसे मांगल्याचे प्रतीक म्हणजे लाल रंग, तसेच क्रांतीचे प्रतीक म्हणजेपण लाल रंगच. मनुष्य रागाने बेभान झाला तरी डोळे, चेहरा लाल होणार आणि लज्जित झाला तरी गालावर लाल रंग फुलणार. असा हा आत्मशक्ती, आत्मभान दाखविणारा लाल रंग आहे.
 
गडद निळा : पंचमीच्या दिवशी महत्त्वाचा ठरतो तो निळा रंग. अथांग सागराचा निळेपणा, असीम आकाशाचा निळेपणा, नीलवर्ण असणारे प्रभू रामचंद्र आणि घनश्याम असणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या रूपाने श्रेष्ठत्व प्राप्त झालेला निळा रंग. गांभीर्याचे प्रतीक. जणू आपल्याला सांगतो, शांत राहा. दुसर्‍याशी तुलना करू नका. असा हा निळा रंग धारण करण्यामुळे मनामध्ये चैतन्यशक्ती निर्माण होते.
 
पिवळा रंग : नवरात्राच्या षष्ठीला पिवळा रंग महत्त्वाचा ठरतो. पिवळा रंग समृद्धीचा रंग. पूजासाहित्यामध्ये पिवळ्या रंगाची हळद महत्त्वाची. विवाहाच्या वेळी नववधूला मामाकडून नेसविली जाणारी साडीपण पिवळ्या रंगाची. नकारात्मक विचारांना दूर ठेवून आत्मविश्वास, मांगल्य निर्माण करणारा हा रंग आपले मनसुद्धा पवित्र करतो.
 
हिरवा रंग : नवरात्राचा सातवा दिवस हिरवा रंग घेऊन येतो. ‘शालू हिरवा, पाचूनी मरवा, मुहूर्त जवळी आला’ अशा सुंदर गीतांची आठवण करून देणारा. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ या काव्यपंक्तीचे स्मरण देणारा. शेतामध्ये वार्‍यावर डुलणार्‍या हिरव्यागार धान्यलक्ष्मीचे दर्शन घडवून देणारा. उद्योगशील व्हा, सफलतेसाठी प्रयत्नशील व्हा, असा संदेश देऊन मनाला हिरवेगार, ताजेतवाने ठेवणारा हा रंग.
 
मोरपंखी रंग : नवरात्राच्या आठव्या दिवशी अष्टमीला मोरपंखी रंग वापरला जातो. पिसारा फुलवून आपल्या सौंदर्याच्या दिमाखात नृत्य करणारा मोर, त्याच्या चमकणार्‍या मोरपिसांमुळे सर्वांची मने खेचून घेतो आणि सर्वांच्या मनाला आनंद देतो. हा रंग धारण केल्यामुळे नवीन नवीन उर्जास्रोेतांकडे साधक आकृष्ट होतो. हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांचे भाव देणारा हा रंग.
 
जांभळा रंग : नवव्या दिवशी जांभळा रंग. जो धारण केल्यामुळे साधक परमेश्वराला त्याच्यासाठी सुगम परिस्थिती निर्माण करण्यासाठी धन्यवाद देण्यास समर्थ होतो. जीवनामध्ये सर्व परिस्थितीत आनंदी राहण्यास समर्थ होतो. असे हे नवरात्रीचे नवरंग चैतन्य, ऊर्जा प्रदान करणारे, मनाला आनंद आणि शांती देणारे आहेत.
- 9420370840