7 महिन्यांनंतर खुली होणार चित्रपटगृहे

    दिनांक :16-Oct-2020
|
- केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे मार्गदर्शक सूचना जाहीर
नवी दिल्ली, 
मोकळीक-5 अंतर्गत देशात आजपासून चित्रपटगृह सुरू होत आहेत. कोरोना काळात सरकारच्या वतीने अनेक सवलती लागू झाल्या आहेत. या अंतर्गत चित्रपटगृह पुन्हा सात महिन्यानंतर खुली होत आहेत. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर केली असून याचे कठोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
 
 
thiater_1  H x
 
देशातील 10 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशातील मल्टिप्लेक्स आजपासून उघडत आहेत. गुरुवारपासून 487 चित्रपट पडद्यावर दिसू लागतील. मात्र, चित्रपट गृहातील पूर्वीच्या प्रेक्षकांच्या तुलनेत केवळ अर्धे प्रेक्षक चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील. गृहमंत्रालयाने 50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. ज्यांचे वय 6 वर्षांपेक्षा अधिक आणि 60 वर्षांपेक्षा कमी आहे, त्याच प्रेक्षकांना चित्रपटगृहात प्रवेश देण्यात येईल. तसेच प्रवेश करतेवेळी आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक आहे.
 
 
चित्रपटगृहात एक आसन सोडून प्रेक्षकांना बसवण्यात येणार आहे. आत प्रवेश करताना मुखाच्छादन घालणे बंधनकारक आहे. तसेच शारीरिक दूरता पाळणेही महत्त्वाचे आहे. आत हवा खेळती राहण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच वातानुकूलनाचे (एसी) तापमान 23 अंशांपेक्षा जास्त ठेवावे लागेल. चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारच्या खाण्या-पिण्याच्या वस्तू आत आणण्यास पूर्ण बंदी असेल. तसेच तिकीट खरेदीची संपूर्ण प्रक्रिया आभासी माध्यमातून होईल. प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर तिकिटे मिळू शकणार नाहीत.
 
 
प्रवेश द्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग वेळोवेळी स्वच्छ करावा लागेल आणि प्रत्येक खेळानंतर चित्रपटगृह स्वच्छ केले जाईल. तसेच सर्व प्रेक्षकांना निर्जंतूक द्रव (सॅनिटायझर) देण्याची जबाबदारी चित्रपट गृहाच्या व्यवस्थापनाची असेल, असेही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शिकेत म्हटले आहे.