पाकिस्तानात दोन दहशतवादी हल्ले

    दिनांक :16-Oct-2020
|
- 20 सुरक्षा जवान ठार
इस्लामाबाद, 
पाकच्या बलुचिस्तान आणि वझिरीस्तानच्या आदिवासी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा लष्करी जवानांसह 20 सुरक्षा जवान ठार झाले आहेत. त्यामुळे चीनच्या सीपेक योजनेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
 
pakistan attek_1 &nb
 
ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा भागात पाकिस्तानी जवानांच्या सुरक्षेत जाणार्‍या तेल व गॅस उत्पादन कर्मचार्‍यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात 14 सुरक्षा जवान ठार झाले. हा हल्ला बलुच दहशतवाद्यांनी केला असल्याचा संशय आहे, तर दुसरीकडे बुधवारी संध्याकाळी वझिरीस्थानमध्येही पाकिस्तानी जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कॅप्टनसह सहा जवान ठार झाले. तर, एकजण जखमी झाला आहे. हा हल्ला आयईडी स्फोटांद्वारे घडवण्यात आला.
 
 
पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ओरमारा भागात ‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस डेव्हलपमेंट’ कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसह ग्वादारहून कराचीला जात होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात कर्मचारी सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तानमधील बलुच राजी अजोई संगर या बंदी घातलेल्या संघटनेने घेतली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात काही बलुच संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
 
त्यातील काही संघटनांवर काही वर्षांपासून बंदी घातली गेली आहे. वजिरीस्तानमध्ये बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला. हा हल्ला शक्तोई भागात झाला. उत्तर वझिरीस्तान आणि दक्षिण वझिरीस्तान भागात हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने बंदी घातलेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान’ या संघटनेने घेतली आहे. अनेक लहान दहशतवादी संघटना, गट ‘तेहरीक-ए-तालिबान’ या संघटनेत एकत्र आले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तान लष्करावर त्यांनी हल्ले सुरू केले आहेत.