जम्बो रुग्णालय सज्ज, परवानगीची प्रतीक्षा!

    दिनांक :17-Oct-2020
|
*'कोविड' रुग्णासाठी होणार खांटांची व्यवस्था
चंद्रपूर,
कोविड रुग्णासाठी शासकीय दरात ७०० खाटांचे जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय गंगाकाशी व्यवस्थापनाने घेतला असून, येथील शकुंतला लॉनवर हे रुग्णालय उभारले आहे. केवळ परवनागीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळताच पहिल्या टप्प्यात शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक दीप दवे आणि डॉ अनुप वासाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
a_1  H x W: 0 x
 
जिल्ह्यात बधितांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. तो वाढतच आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली. यातून शहरातील १७ खासगी डॉक्टरांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, नागपूर येथील प्रशांत बोरूले यांच्या पुढाकारातून डॉ. अनूप वासाडे यांनी शकुंतला लॉन येथे जम्बो रुग्णालयाची परवानगी महानगरपालिका प्रशासनाकडे मागितली. मनपा प्रशासनानेही रुग्णालयाला तातडीने परवानगी दिली.
 
मात्र, या रुग्णालयावरून चांगलेच वादंग उठले होते. यातून आलेल्या नैराश्याने रुग्णालय व्यवस्थापनाने गाशा गुंडाळण्याचाही निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर मंत्रालयस्तरावर हालचाली करण्यात आल्या. अखेर, गंगाकाशी रुग्णालयाला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचे काम एव्हाना पूर्ण करण्यात आले आहे.
 
शंभर खाटांचे आयसीयू रुग्णालय सज्ज झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून परवानगी प्राप्त होताच रुग्णालय सुरू केले जाणार आहे. डॉ. अनुप वासाडे, डॉ. राय यांच्यासह अन्य डॉक्टरांची चमू येथे सेवा देणार आहे. ४० परिचालिकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या रुग्णालयात सेवा देणार आहेत. शासकीय दरानुसारच रुग्णांकडून पैसे घेतले जाणार असल्याचे डॉ. अनुप वासाडे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला दीप दवे, डॉ. अनुप वासाडे, डॉ. राय, दीक्षित उपस्थित होते.