मेळघाटातील सीताफळे पर्यटकांसाठी पर्वणी

    दिनांक :17-Oct-2020
|
- आदिवासी बांधवांना मिळाला रोजगार
नितीन दुर्बुडे
पथ्रोट, 
सीताफळ (कस्टर्ड अ‍ॅपल) हे उष्ण कटीबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे ‘नोना स्क्वामोसा’ नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्‍यांनी ते आशियामध्ये आणले होते. या फळाचे जुने मेक्सिकन नाव अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे.
 
a_1  H x W: 0 x
 
खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. सध्याच्या दिवसात सीताफळ बाजारपेठेत दाखल झाले असून मेळघाटातील डोंगर दर्‍यासह डोंगराच्या पायथ्याच्या परिसरात गावरान सीताफळ आपल्या अविट चवीने पर्यटकांसह स्थानिकाना भुरळ घालत असून आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करुन देत आहे.
 
विदर्भाचे नंदनवन म्हणून परिचित असलेल्या चिखलदरा डोंगर दर्‍यातील सीताफळाची चव पर्यटकाने जर चाखली नाही तर नवलच. चिखलदर्‍याल गोड, चवदार फळाची महती जिल्हाभरासह मुंबई, पुणेसह इंदौरपर्यंत असून या परिसरातील नागरिक आपल्या नातेवाईकापर्यंत न चुकता नित्य नियमाने दरवर्षी पाठवितात हे विशेष. स्थानिक आदिवासी बांधव जंगलातून वन्यपशुंची भीती न बाळगता दाट वनातून डोक्यावरून टोपलीत परिपक्व झालेली फळे चिखलदरा बाजारात आणून कुठलाही मध्यस्थ न ठेवता थेट ग्राहकांना विक्री करतात.
 
अद्यापपावतो कुठलेही वजन माप न करता ‘सरळ गंज’ ज्याला ‘बाटा’ ही म्हटल्या जाते, अशा पद्धतीने विक्री करतात. सध्या चिखलदरा बसस्थानकाकडे जाणार्‍या मार्गावर सीताफळ विक्री करणार्‍यांसह खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे. पायथ्याशी असलेल्या गावातील सीताफळे परतवाडा बाजारात आदिवासी बांधव विक्रीकरिता आणतो आहे. सीताफळाच्या विविध जाती संशोधित झाल्या असून शेतकर्‍यांनी फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेली आकर्षक टपोरी फळे जरी उपलब्ध असली तरी खरा जाणकार ग्राहक गावरान फळाच्या खरेदीसच प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
 
साधारणतः सीताफळ आक्टोबर अखेरीस पिकण्यास सुरवात होते, मात्र यंदा वरुणराजा रोहिणी नक्षत्रातच बरसल्याने झाडावर जूनमध्येच फुलाच्या कळ्या बहरल्या व नियमित पाऊस आल्याने लवकरच फळे परिपक्व झाल्याने काढणीस आली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात अग्रक्रमी स्थान पटकावणारे सीताफळ यंदा लवकरच उपलब्ध झाल्याने आणि अधिक महिन्यामुळे दिवाळीसुद्धा लांबणीवर गेल्याने दिवाळीपूर्वीच हे फळ संपून पूजेकरिता मिळणार की नाही, अशी शंका आहे.