एलपीजी गॅस सिलेंडरबाबत वाचा नवीन नियम

    दिनांक :17-Oct-2020
|
-चोरी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी नवीन यंत्रणा
नवी दिल्ली, 
जर तुम्हाला तुमचे एलपीजी सिलेंडर घरपोच मिळत असेल तर 1 नोव्हेंबरपासून लागू होणार्‍या नवीन नियमांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्या सिलेंडरची चोरी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी नवीन यंत्रणा आणणार आहेत. या पृष्ठभूमीवर ‘होम डिलिव्हरी’ सेवा मिळणार्‍या ग्राहकांसाठी  तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) लागू करू शकतात.
 

lk _1  H x W: 0 
 
 
 
 
1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना  त्यांचे एलपीजी सिलेंडर्स घरपोच मिळण्यासाठी ‘वन टाईम पासवर्ड’ सांगावा लागेल. राजस्थानातील जयपूरमध्ये यापूर्वीच पथदर्शक प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) सुरू आहे. आता प्रथम 100 स्मार्ट शहरांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. ज्या ग्राहकांना  एलपीजी सिलेंडरची ‘होम डिलिव्हरी’ हवी आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एक कोड नंबर मिळेल. जेव्हा संबंधित ग्राहक सिलेंडरची डिलिव्हरी करणार्‍या व्यक्तीस ओटीपी कोड प्रदान करेल तेव्हाच त्याला एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात येईल.
 
 
ज्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक  नाही असे ग्राहक  डिलिव्हरी करणार्‍या व्यक्तीद्वारे ‘रिअलटाईममध्ये अ‍ॅप’च्या माध्यमातून ग्राहक कोड मिळण्यास पात्र ठरतील. ग्राहकांना  त्यांचे तपशील जसे की नाव, पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक  अद्ययावत केले पाहिजेत. हे तपशील न दिल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास गॅस सिलेंडर मिळविण्यात अडचणी वाढू शकतात. तथापि, ही प्रणाली व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी लागू होणार नाही. या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवानंतर ही नवी यंत्रणा टप्प्याटप्प्याने देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे, वृत्तात म्हटले आहे.