मोहम्मद पैगंबरांचे व्यंग्यचित्र दाखविणार्‍या शिक्षकाची हत्या

    दिनांक :17-Oct-2020
|
- फ्रान्समधील पोलिसांच्या गोळीबारात जिहादी युवक ठार
पॅरिस, 
दहशतवाद आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांच्यातील जागतिक स्वरूपाचा संघर्ष अद्याप सुरूच असल्याचे दर्शविणारी घटना पुन्हा एकदा फ्रान्समध्ये घडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी चर्चा करीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र दाखविणार्‍या शिक्षकाचा गळा जिहादी प्रवृत्तीच्या युवकाने चिरला. या शिक्षकाची भीषण हत्या करण्यापूर्वी आरोपी युवकाने काही धार्मिक घोषणा दिल्याचे सांगितले जाते. या हत्येची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत या युवकाचा खातमा करण्यात आला. या प्रकरणाचा दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे.
 
 
France-Teacher_1 &nb
 
वर्गात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा धडा शिकवताना या 47 वर्षीय शिक्षकाने ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र दाखवले. त्याआधारे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काही मुद्दे मांडले. मोहम्मद पैगंबरांचे व्यंग्यचित्र दाखविल्याच्या रागातून 18 वर्षीय आरोपीने शिक्षकाची क्रूर हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पॅरिस पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर युवकाने पळ काढला. घटनास्थळापासून काही अंतर दूर गेल्यावर त्याने पोलिसांना बंदुकीचा धाक दाखवून शरणागती पत्करण्यास नकार दिला आणि गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हा आरोपी ठार झाला.
 
 
या हत्येनंतर आता फ्रान्समध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन हे हत्या झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही घटना म्हणजे इतिहासाची हत्या आहे. दहशतवाद्यांनी देशाच्या प्रजासत्ताक मूल्यांवर हल्ला केला आहे. फ्रान्सची जनता या दहशतवाद्यांचा फुटीरतेचा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावले.
 
 
चौघांना अटक
या भीषण घटनेनंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हल्लेखोर आरोपीशी संबंधित आहेत. पोलिसांनी या चौघांची सखोल चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची हत्या केल्यानंतर आरोपीला पळून जाण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप आहे.
 
 
हल्लेखोर युवक रशियाचा
शिक्षकाची हत्या करणारा आरोपी रशियातील चेचेन्या भागात राहणारा होता, अशी माहिती पुढे आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर रशियन गुप्तचर संस्था तसेच तेथील पोलिसांनी देखील या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे. रशियाच्या चेचेन्या भागात जिहादी दहशतवादी आणि रशियन सैन्यामध्ये नेहमीच चकमकी झडतात. या भागात शांतता रहावी, यासाठी मोठ्या संख्येने रशियन जवान तैनात करण्यात आले आहेत.
 
 
चार्ली हेब्दोच्या स्मृती ताज्या
इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र प्रकाशित केल्यानंतर 7 जानेवारी 2015 रोजी चार्ली हेब्दोच्या पॅरिस येथील कार्यालयावर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात संपादकांसह 17 जण ठार झाले होते. या हल्ल्यात फ्रान्समधील काही दिग्गज व्यंग्यचित्रकारही ठार झाले. हे व्यंग्यचित्र जीन काबूट यांनी काढले होते. 2015 मध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
हल्ला झाल्यानंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याचा खप 10 हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला होता.