देशात मोठ्या प्रमाणात वाढली सायकलची मागणी

    दिनांक :17-Oct-2020
|
-खरेदीसाठी ग्राहकांना करावी लागतेय् प्रतीक्षा
नवी दिल्ली, 
देशातील सायकलविक्रीत गेल्या पाच महिन्यांत जवळपास दुप्पट वाढ झाली असून, बहुतांश शहरांमध्ये ग्राहकांना मनपसंत सायकल खरेदी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती विश्लेषकांनी दिली. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने सायकलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
 
 
bicycle_1  H x
 
भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा सायकल उत्पादक देश असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना ‘ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’च्या (एआयसीएमए) आकडेवारीनुसार मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण 41 लाख 945 हजार सायकलींची विक्री झाली आहे. एआयसीएमएचे महासचिव के. बी. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळात सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतिहासात प्रथमच सायकलींच्या बाबतीत असा कल दिसून आला आहे.
 
 
ठाकूर यांच्या मते, गेल्या पाच महिन्यांत सायकलींच्या विक्रीत 100 टक्के वाढ झाली आहे. बहुतांश शहरांमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीच्या सायकलची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून प्रतीक्षा करावी लागत आहे. एआयसीएमएने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात देशव्यापी टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे एप्रिल महिन्यात एकाही सायकलची विक्री झाली नाही. त्यानंतर मे महिन्यात देशात एकूण 4,56,818 सायकलींची विक्री झाली. जून महिन्यात सायकलींची विक्री दुपटीने वाढून 8,51,060 वर पोहोचली. सप्टेंबर महिन्यात सायकलविक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती 11,21,544 वर पोहोचली. मागील पाच महिन्यांमध्ये एकूण 41,80,945 सायकलींची विक्री झाली आहे.