माहूरचे विश्वस्त व पुजार्‍यांनी केली घटस्थापना

    दिनांक :17-Oct-2020
|
माहूर, 
शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता श्रीक्षेत्र माहूर गडावर असलेल्या श्री रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त संस्थानचे विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. पाच ऊस उभारून सप्तधान्य मृत्तिकेत मिसळून कलशाभोवती टाकून कलश पूजन केले.
 
 
y17Oct Renukadevi_1 
 
श्री रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने टाळ, संबळ, चौघडा इत्यादी वाद्यांच्या निनादात परिसर देवतेसभोवती छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पदसिद्ध अध्यक्ष न्या. जगताप, सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, कोषाध्यक्ष तथा माहूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, स्थानिक विश्वस्त व काही पुजारी यांची उपस्थिती होती.
 
 
दरवर्षी नवरात्र काळात अनेक राज्यांतून हजारो भाविक रेणुका गडावर दर्शनासाठी येत असतात. ललिता पंचमीला आपल्या कलेची या दरबारात हजेरी लावतात. अष्टमी, नवमी, दशमीच्या दिवशी हजारो भाविक मंदिरावर आपली उपस्थिती लावतात. भक्तीभावाने विनम‘ होऊन देवीचरणी लीन होतात. यावर्षी मात्र भक्तांविना गडावर होणारे नवरात्र सुनेसुने वाटणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे भाविकांनी गडावर येऊ नये, घरीच नवरात्रोत्सव भक्तीभावाने साजरा करावा. पोलिस प्रशासनाकडून माहूर शहराकडे येणारे तीनही दिशांचे रस्ते अडथळे लावून बंद करण्यात आले आहेत. भाविकांनी याची नोंद घेऊन घरूनच नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन विश्वस्त समितीने केले आहे.