माणसाने माणसाशी...

    दिनांक :17-Oct-2020
|
आनंदवाटा
- रवींद्र देशपांडे
‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही उबुंटू चित्रपटातील प्रार्थना आपण कितीतरी वेळा ऐकली आहे. खरेतर ही अगदी साधी अपेक्षा आहे. पण, जेव्हा समाजात ही साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही तेव्हा मात्र विचारी मनाला प्रश्न पडतात. खरेच ही अपेक्षा साधी आहे? प्रत्यक्षात ही अपेक्षा अत्यंत अवघड आणि आचरणात येण्यास फारच कठीण दिसते. आपण स्वत:ला मानवतावादी, समतावादी, पुरोगामी आणि काय काय विशेषणे वापरतो, पण प्रत्यक्षात व्यवहार पाहिला की मन विषण्ण होते. त्यामुळे ‘माणूस बनणे’ हेच आपल्यापुढचे खरे आव्हान आहे, असे वाटते. ते अवघड असले तरी आवश्यक आणि अपरिहार्य आहे.
 
 
man_1  H x W: 0
 
एकदा एक मित्र आपल्या कारने ऑफिसला निघाला होता. निघायला त्याला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे त्याचा वेग जरा जास्तच होता. कार्यालयाची वेळ असल्यामुळे रस्त्यावर गर्दीही होती. नेमका त्याच्या समोर असलेला कारचालक गाडी खूपच हळू चालवत होता. मनातून मित्र फारच रागावला होता. या चालकाला चांगले झापले पाहिजे, असे विचार त्याच्या मनात सुरू होते. या माणसामुळे ऑफिसला उशीर होणार, असा त्रागाही मनात सुरू होता. त्याची गाडी ‘त्या’ कारच्या अगदी जवळ गेली आणि अचानक त्याचे लक्ष त्या कारच्या मागे लागलेल्या स्टीकरकडे गेले. त्यावर लिहिले होते, ‘फिजिकली चॅलेन्जड्, बी पेशण्ट्.’ अचानक त्याच्या मनातला राग पार नाहीसा झाला. त्याची जागा सहानुभूतीने घेतली. हॉर्न वाजवून त्याला आपण दुखावले, अशी अपराधी भावनाही त्याच्या मनात निर्माण झाली. त्याला ऑफिसला उशीर झाला, पण ते त्याने सहजपणे स्वीकारले. हा वागणुकीतला बदल स्टीकरमुळे झाला. पण, प्रत्येक वेळी माणसाच्या कपाळावर अशी लेबल्स लागलेली नसतात. माणसाशी वागताना आपल्याला अशा लेबल्सची गरज पडावी का? ते पाहून आपण ठरवणार कसे वागायचे ते? जाती, पंथ, भाषेचे लेबल्स तर जन्मत:च चिटकवली जातात. कधी आपणच लेबल लावतो आणि तसा व्यवहार करतो. डावा, उजवा, मनुवादी, पक्ष, विचारधारा, वाघ, सिंह अशा स्टीकर्सचा बाजार मांडलाय् आपण.
 
 
आपल्याला माणूस दिसतच नाही. अर्थात, याला दुसरीही एक बाजू आहे. माणूस कळल्यानंतर वागणुकीत बदल होतो. सगळ्यात महत्त्वाचे आहे, माणूस म्हणून आपण दुसर्‍याचा विचार करू शकतो. दुसर्‍याच्या भावना, विचार आपण समजून घेऊ शकतो. दुसर्‍याला कसे वाटत असेल, याचा अनुभव आपण घेऊ शकतो. इंग्रजीमध्ये ज्याला ‘स्टॅण्डिंग इन समवन एल्स शुज’ किंवा ‘सीईंग थ्रू समवन एल्स ऐज’ असे म्हणतात. एक मुलगा आपल्या वडिलांना आपल्या सोबत भरभर चला, असा आग्रह करत असतो. हळू चालतात म्हणून दोषही देत असतो. मुक्कामाला पोहोचल्यानंतर चुकून तो वडिलांच्या जोड्यात पाय घालतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की खिळे मारून मारून दुरुस्त केलेला तो जोडा आहे. त्याचे एकदोन खिळे पायाला टोचतात. त्या वेळी त्याला वडिलांनी आपल्याकरता काय काय सहन केले, याची जाणीव होते. त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना केल्याशिवाय खरी जाण येत नाही. आणि निसर्गत:च ही क्षमता माणसाला प्राप्त झाली आहे. एखादे कुत्र्याचे पिलू गाडीखाली आले की, आपल्याला दु:ख होतेच. यालाच सहअनुभूती, समानुभूती, परानुभूती, सम वेदना, संवेदना, आस्था, करुणा... अशी अनेक नावे दिली जातात. ही समरसतेची भावनाच माणूसपणाची ओळख आहे. आत्मविकासाच्या वाटचालीचा तो प्रारंभबिंदू आहे. त्यामुळेच तर माणूस विशाल होतो, व्यापक होतो, मोठा होत जातो. समरसता हा विचार नाही, ती अनुभूती आहे. आचरण आहे. ज्ञानेश्वर एका ओवीत म्हणतात,
 
 
ऐसेनि बा समरसे। दृष्टी जै उल्हासे।
ते भक्ति पै ऐसे। आम्ही म्हणे॥
असे समरस झाल्यानेच दृष्टी व्यापक होते. आम्ही त्यालाच भक्ती म्हणतो, असे माउली म्हणतात.
अन्याय, अत्याचार, विषमता, सामाजिक विसंवाद, संघर्ष यामागे समरसतेचा अभाव, हेच मुख्य कारण आहे. उपभोगवादी जीवनशैलीमुळे आलेला कमालीचा स्वार्थ, आत्मकेंद्रितता, संकुचितता, सत्तांधता, राजकारण, विचारधारांची कट्टरता यामुळे सहृदयपणे दुसर्‍याचा विचार करणारे माणूसपणच दुर्बल होत आहे. शत्रू असल्यासारखे आपण एकमेकांवर तुटून पडतो. माणूसपणावरचा आपला विश्वास कमी झाला. मूल्यसंस्कार करून समाजात परिवर्तन करता येते. समरस समाजच खर्‍या अर्थाने सक्षम व संघटित समाज असतो. समतेसह सर्व समस्यांवर मार्ग काढण्याची अंगभूत क्षमता अशाच समाजात असते, हे आपण विसरत चाललो आहोत. सत्ता हेच आज सर्वांचे सर्वस्व झाले आहे. त्यामुळे वाट्टेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतात. आपली सत्ता गेली म्हणजे आता फार मोठा अनर्थ होणार, अशी ओरडही अनेक लोक करतात. माणूस म्हणून, समाज म्हणून आपल्याला अपयशी व्हायचे नसेल, अविवेकी विचारापासून मुक्ती हवी असेल, तर समरसतेच्या आधारावर उभी असलेली जीवनशैली स्वीकारावी लागेल.
 
 
व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील अंधार नाहीसा करणारा प्रकाश म्हणजे समरसता. प्रकाश सप्तरंगी असतो. तसेच समरसताही सप्तरंगांचे इंद्रधनुष्य आहे. त्यात अंतर्भूत असलेल्या सर्व संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. समरस समाजाकरिता हे सप्त ‘स’कार आवश्यक आहेत. संवेदनशीलता असल्याशिवाय माणूस दुसर्‍यांचा विचारच करू शकत नाही. हे केवळ बुद्धीच्या स्तरावर समजून घेणे नसते. भावनेच्या स्तरावर जाणवणे असते. अनेकदा विचारांची व वर्तनाचीही बीजं भावनिक अनुभवातच असतात. ‘मला काय त्याचे’ ही तटस्थ, उदासीन वृत्ती समाजजीवनाला मारक असते. संवेदना ही एक मानवी क्षमता आहे. ती निर्माण करता येते, जोपासता येते. त्यामुळेच सामाजिक जबाबदारीचे भान येते. असा माणूस आपल्या संकुचित वर्तुळातून बाहेर पडतो. संपर्क करतो. संपर्क हा दुसरा ‘स’कार आहे. दोन माणसं जवळ आल्याशिवाय त्यांच्यात समरसता निर्माण होऊच शकत नाही. आपल्या संस्कृतीने माणसांना जोडणारी अनेक साधनं निर्माण केली. बदलत्या काळात नवी संपर्क साधने उभी करता येतात. पण, स्नेह हा संपर्काचा आधार असला पाहिजे. अन्यथा संपर्काला निर्जीव कर्मकांडाचे स्वरूप येते. जेथे स्नेह असतो तेथे उच्च-नीचता, भेदभाव असूच शकत नाही. माझ्या माणसावरच मी अन्याय, अत्याचार कसा करणार? जेथे समरसता असते तेथे संवाद असतोच. संवादातून प्रत्येक समस्येवर मार्ग निघतो. संघर्षाऐवजी समन्वय साधता येतो. संवाद नसल्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात.
 
 
समज-गैरसमज निर्माण होतात. संवादाकरिता सहिष्णुतेचा स्वभाव आवश्यक आहे. दुसर्‍याच्या विचारांचा केवळ सन्मान नव्हे, स्वीकार हवा. प्रत्येकाचे विचार त्याच्या अनुभवातून आलेले असतात. माझाच अनुभव खरा, माझेच निष्कर्ष योग्य, हा आग्रह सहिष्णुतेत बसत नाही. समाज संवादी हवा. अनुभवांचे व विचारांचे मनमोकळे आदानप्रदान व्हावे. अन्य दृष्टिकोन असू शकतो, तोही समजून घेतला पाहिजे. त्याकरिता वैचारिक प्रामाणिकपणा हवा. आज आपण फक्त एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यातच आनंद मानतो. आपल्याला नेहमीच विरोधकांची व शत्रूंची आवश्यकता असते. पण, ‘क्रिटिसिझम इज व्हेरी मच इझिअर दॅन क्रिएशन.’ सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत ‘समाधान’ शोधण्यापेक्षा आपलेच उत्तर सर्वाधिक बरोबर आहे, असा आग्रह धरण्याकडेच आपला कल असतो. त्यामुळेच समाजात विसंवाद निर्माण होतो. सकारात्मक परिवर्तन नेहमी सहिष्णुतेच्या माध्यमातूनच होऊ शकते. समरसतेतून नेहमीच सहकार्य, सेवाभाव, साहाय्य उदयाला येते. जो समरस होतो त्याला दुसर्‍याच्या वेदना, दु:ख, समस्या जाणवणारच आणि त्या सोडवण्याचाही माणूस प्रयत्न करणारच. म्हणूनच अनेक माणसं स्वत:चा विचार न करता समाजाकरिता कष्ट घेतात. सेवेकरिता आपला उभा जन्म खर्ची घालतात. अनेकदा ज्यांच्याशी आपण समरस होऊन काम करतो, त्यांना त्याची किंमत नाही, असे आपल्याला वाटते. विश्वास निर्माण होण्यासाठी नेहमीच वेळ लागतो. म्हणूनच संयम, धैर्य समरसतेकरिता आवश्यक आहे. संवेदना, संपर्क, स्नेह, संवाद, सहिष्णुता, सहकार्य आणि संयम हे सप्तरंग वेगळे दिसत असले तरी ते एकात्म असतात.
 
 
माणसाचे मन स्वत:च्या स्वार्थाच्या कोषात अडकलेले असते, हे खरे आहे. पण, या चित्राला दुसरीही एक बाजू आहे. स्वत:च्या कोषातून बाहेर पडून सर्वांचे कल्याण विचारात घेणे, हीसुद्धा मानवी प्रवृत्तीच आहे. या प्रवृत्तीचे पोषण करणे, हेच धर्म आणि संस्कृतीचे कार्य आहे. तीच अध्यात्माची आनंदवाट आहे. महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगात असताना ‘लाईफ’ या अमेरिकेच्या प्रसिद्ध नियतकालिकाची पत्रकार मार्गारेट व्हाईट यांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत तिने, ‘‘तुमच्या जीवनाचे स्वप्न काय आहे?’’ असा प्रश्न विचारला होता. महात्मा गांधी यांनी दिलेले उत्तर, ‘मा कश्चिद् दु:ख भागभवेत’ या आपल्या परंपरेची आठवण करून देणारे होते. ते म्हणतात, ‘‘आय वॉण्ट टू वाइप आऊट एव्हरी सिंगल टिअर फ्रॉम एव्हरी सिंगल विपिंग आय.’ ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले.’ समरसतेचा भाव यापेक्षा काय वेगळा आहे? 
 
8888803411
(लेखक प्रसिद्ध वक्ते व सामाजिक चिंतक आहेत)