दीपिका, जॅकलिनच्या नावाने काढले मनरेगाचे वेतन

    दिनांक :17-Oct-2020
|
- मध्यप्रदेशातील खळबळजनक प्रकार
खरगोन, 
मध्यप्रदेशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अर्थात् मनरेगा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मनरेगाच्या ‘जॉब कार्ड’वर चक्क अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि जॅकलिन फर्नांडिसचे छायाचित्रे असल्याचे समोर आले आहे.
 

manrega_1  H x  
 
खरगोन जिल्ह्यातील झिर्निया पंचायत विभागातील पिपरखेडा नाका या दुर्गम खेड्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. मनरेगाच्या लाभार्थ्यांच्या रोजगार पुस्तिकेच्या यादीत या अभिनेत्रींची छायाचित्रे ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या अभिनेत्रींनी जून आणि जुलै महिन्याचे वेतन घेतले असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावकर्‍यांनी या सर्व प्रकाराला पंचायत सचिव आणि अधिकार्‍यांना जबाबदार धरले आहे. मनरेगाच्या कामावर कधीच गेलो नसताना माझ्या नावावरील रोजगार पुस्तिकेवर दीपिकाचे छायाचित्र आहे. ही गोष्ट धक्कादायक असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले.
 
 
तातडीने चौकशी करण्याचे आदेश
एका कुटुंबाच्या रोजगार पुस्तिकेवर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा फोटो अपलोड केला आहे. खरगोनच्या जिल्हाधिकारी अनुग्रह पी. यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना या घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक रोजगार पुस्तिका तपासली जाईल आणि त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.