नवरात्रोत्सव आणि कोरोना संकट

    दिनांक :17-Oct-2020
|
नवरात्र विशेष
- दिगंबर शं. पांडे
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिताः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
 
 
 
devi_1  H x W:
 
भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्रतम स्थान आहे. मातृशक्ती हे भगवंताचे साक्षात स्वरूप असून विविध देवीच्या स्वरूपातून त्याचा आविष्कार झाला आहे. ‘मातृशक्ती’ ही केवळ स्त्रीची शक्ती नसून ती संपूर्ण मानवजातीची, समाजाची व विश्वाची जननी आहे. सत्त्व, तम, रज गुणांनी त्रिगुणात्मक आदिशक्ती आहे. त्यामुळे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मक देवींना अनन्यसाधारण पूजत्व प्राप्त झाले आहे. या तीनही शक्ती मानवी जीवनाच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहे. साधनांची जडता शक्तिमान करणे, कृतीला-निर्मितीला सात्त्विकतेचे अधिष्ठान देणे आणि जीवनस्थ चंचलतेला प्रभूपदी स्थिरावणे, हेच या त्रिगुणात्मक शक्तीचे विश्वकार्य आहे. जीवनात आनंद पारेषित व्हावा ही मनीषा असणार्‍यांनी देवीची उपासना करणे हेच एकमेव सहजसुलभ साधन आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीच्या माध्यमातून मातृशक्ती फार मोठं कार्य करीत आहे. त्यामुळे संपूर्ण सृष्टीच नियमन करणार्‍या आदिशक्तीची उपासना करण्याचा प्रघात प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत आहे. देवीची अनेक रूपे व नावे आहेत. भारताच्या भिन्न-भिन्न प्रदेशात विविध नावांनी देवीची आराधना होत आहे. पुराणकारांनी या सर्व अमोघ तत्त्वांना, चैतन्याला देवी दुर्गेच्या ठिकाणी एकमय केले व दुर्गेला शिवाच्या पत्नीपदावर बसविले. भारतीय संस्कृतीच्या विकासाला देवी तत्त्वाने फार मोठा हातभार लावला आहे. देवीचे स्वरूप विशिष्ट जाती-जमातीसाठी सीमित नसून ते मानवनिर्मित जातीधर्माच्या बंधनाच्या मर्यादा उल्लंघून पैलपार गेले आहे.
 
 
सर्वव्यापक, सर्वसमावेशक झाले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस देवीचे नवरात्र मोठ्या उत्साहाने, भक्तिभाव, श्रद्धा व निष्ठेने संपन्न होत असतेे. महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तश्रृंगी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, चंद्रपूरची काली माता, अमरावतीची एकविरा, कोराडीची महालक्ष्मी, नागपूरची आग्याराम देवी या मातृशक्ती पीठातून, सार्वजनिक प्रतिष्ठानातून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. करतात. रंगीबेरंगी वस्त्रालंकाराने विभूषित असंख्य माता-भगिनी खणा-नारळाने ओटी भरून मांगल्याचं मागणं मागतात. भावभक्तीच्या सेवा मातेच्या चरणी समर्पण करून जीवन कृतार्थतेचा आत्मानंद घेतात. सुखी, समाधानी, उन्नत जीवनाचा जोगवा मागतात. सेवेच्या, कर्तव्याच्या व समर्पणाच्या गंधाने मंदिर परिसर अक्षरशः पुलकित होतो.
 
 
मानवी जीवावर उठलेला कोरोना प्रकोप व सुरक्षिततेच्या प्रतिबंधात्मक आचारसंहितेमुळे यावर्षी सर्व देवालये बंद आहेत. देवी-देवता बंदिस्त आहेत. त्यामुळे या विहंगम महोत्सवांना, सोहळ्याला अवकळा आली आहे. भाविक आत्मसुखाला मुकणार आहेत,या संकटकाळी भक्तगण हा त्याग प्रसन्नतेने, संयमाने स्वीकारणे जनहित, समाजहित व राष्ट्रहिताचे आहे. देवी भावांची भुकेली आहे. ती हे मानवी संकट जाणून आहे. मानवजातीचे कल्याण साधणारी ती विश्व नियंता जननी आहे. मंदिरात न जाता, गर्दी न करताही ती प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देणार आहे. भक्तांचा भाव जाणणारी ती मनहरणी आहे. मानवी जीवनाला कोरोनाचा संभाव्य धोका विचारात घेऊन भाविकांनी भावनांना बांध घालावा, मंदिरात धाव न घेता भक्तिभावे तिची घरीच पूजाअर्चा करावी. उपासना, साधना करावी आणि तिचा कृपाप्रसाद प्राप्त करावा. प्रपंचातील सुख-दुःखाच्या संवेदनांनी तत्पदग्ध, निराश झालेल्या मानवी जीवनात प्रेमप्रवाहाचा, कृपादृष्टीचा अखंड वरदहस्त राहावा, हेच मां भगवतीच्या चरणी विनम्र मागणं मागू या. महिषासूर मर्दिनी माते आता तू जागृत हो आणि या कोरोना मानवी संहाराच्या राक्षसाचे मर्दन कर, हीच तव चरणी प्रार्थना! 
 
9403343239