माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला गौप्य स्फोट

    दिनांक :17-Oct-2020
|
लाहोर, 
इम्रान खान यांची सत्ता आणण्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असून, पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या हातचे बाहुले आहेत, असा आरोप माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी केला आहे.
 
 
navaz_1  H x W:
 
पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी 11 विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटने (पीडीएम) गुजरानवाला येथे आयोजित केलेल्या शक्तिप्रदर्शनात त्यांनी लंडन येथून आभासी स्वरूपात संवाद साधला.
 
 
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी 20 सप्टेंबर रोजी पीडीएम आघाडीची घोषणा केली. यावेळी इम्रान सरकारविरुद्ध एका कृती आराखड्यांतर्गत तीन टप्प्यातील चळवळीची घोषणा केली. यात सुरुवातीला देशव्यापी सार्वजनिक बैठका, निदर्शने आणि मोर्चे काढले जाणार आहेत. सर्वांत शेवटी जानेवारी 2021 मध्ये इस्लामाबादवर भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
 
 
लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी माझे सरकार घालवले. 2018 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी गडबड करून अकार्यक्षम इम्रान खान यांना देशावर लादलेे. जनरल बाजवा हेच मुख्य गुन्हेगार असून, त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल, अशी टीका यावेळी शरीफ यांनी लष्करी नेतृत्वावर केली.
 
 
इम्रान खान यांचे सरकार देशावर लादल्यामुळे लोकांचे होणारे हाल आणि त्यांच्या दुःखासाठी बाजवाच थेट जबाबदार आहेत. माझे सरकार पाडण्यासाठी आयएसएआयने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, असा आरोप करताना त्यांनी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हामीद यांनी इम्रान खान यांना कशी मदत केली, याची माहिती दिली.
 
 
पाकिस्तानात बाहुले सरकार स्थापन करण्याबाबत हामीद यांनाही उत्तर द्यावेच लागेल. सभेतील उपस्थित लोकांना विचारतो की, अकार्यक्षम इम्रान खान यांचे सरकार कुणी स्थापन केले, याचे उत्तर देण्यास घाबरू नका, असे त्यांनी सांगितले.