मदरसे बंद करण्याची अधिसूचना पुढील महिन्यात

    दिनांक :17-Oct-2020
|
- हेमंत बिस्वा शर्मा यांची माहिती
गुवाहाटी, 
आसाम सरकारच्या मदतीवर चालणारे सर्वच मदरसे आणि संस्कृत शाळा बंद केल्या जाणार असून, याबाबतची अधिसूचना नोव्हेंबर महिन्यात जारी केली जाईल, अशी माहिती आसामचे शिक्षण मंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आज शनिवारी दिली.
 
 
himanta-biswa-sarma_1&nbs
 
मदरसा शिक्षण मंडळ बरखास्त केले जाईल आणि सरकारच्या मदतीवर चालणारे सर्व मदरसे माध्यमिक शाळांमध्ये परावर्तित केले जातील. सर्वच नियमित विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
 
 
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. मात्र, त्यानंतर या माध्यमिक शाळांमध्ये नियमित अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. संस्कृत पाठशाळा या कुमार भास्कर वर्मा संस्कृत विद्यापीठाला हस्तांतरित केल्या जातील. भारतीय संस्कृती, सभ्यता आणि राष्ट्रवादाचे शिक्षण आणि संशोधन केंद्रांमध्ये संस्कृत पाठशाळा परावर्तित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
 
 
आसाम माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत (एसईबीए) या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळावे, हे सुनिश्चित करण्यासाठी आसाम सरकारने उपरोक्त पाऊल उचलले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एसईबीएची मॅट्रिक परीक्षा न देणार्‍या मदरसे आणि संस्कृत शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी परीक्षा घेतली जाईल. तथापि, जे विद्यार्थी मंडळाच्या परीक्षेला उपस्थित झाले आहे, त्यांच्याबाबत समानतेचे धोरण स्वीकारण्यात येईल, कारण अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी, हे धोरण आवश्यक आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
 
 
पुढली वर्षी आसाममध्ये विधानसभेची निवडणूक होत असल्याने, यावर डोळा ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला का, असे विचारले असता, ते म्हणाले की, हा निवडणुकीचा मुद्दा कसा असू शकतो, कारण आम्ही फक्त सरकारी मदरसेच बंद करीत आहोत, खाजगी नाही.