पाकचेच अहित!

    दिनांक :17-Oct-2020
|

pak_1  H x W: 0 
 
 
भारताने बोलणीसाठी तयारी दाखविली असून, तसा निरोप पाठविल्याचा पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आल्याने पाकिस्तानची छी: थू: झाली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कुठल्याही पातळीवर बोलणी करायची नाही, असे भारताने अनेक वेळा ठासून सांगितले आहे आणि त्यावर भारत कायम आहे. त्यामुळे पाकिस्तानशी बोलणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाकिस्तान हा दिवाळखोर देश झाला आहे. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा पाकिस्तान दिशाहीन झाला आहे. पाकिस्तानात सध्या इम्रान खान पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या गच्छंतीची वेळ आता जवळ आली आहे. पाकिस्तानात आजवर आलेले कुठलेही सरकार त्याचा कार्यकाळ लष्कराच्या मर्जीशिवाय पूर्ण करू शकलेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे इम्रानच्या सरकारचा अंतही जवळ आला आहे. तसे चित्र त्या देशात दिसू लागले आहे. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानात अराजक माजण्याची चिन्हे आहेत. अशा वातावरणात भारतासंदर्भात जनतेची दिशाभूल केली, तर महागाई आणि अन्य समस्यांवरील लक्ष इतरत्र वळवता येईल आणि आपली राजसत्ता टिकवून ठेवता येईल, हा इम्रान समर्थकांचा होरा असावा कदाचित. पण, भारताने अगदी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानचा दावा खोडून काढला असल्याने पाकचे पितळ उघडे पडले आहे. शिवाय, पाकिस्तानात सगळे विरोधी पक्ष इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांनी इम्रान खान यांचे सरकार उलथवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एक सामूहिक पत्रकार परिषद घेत ‘डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ नामक अभियान सुरू करत असल्याची घोषणा केली होती. या विरोधकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांसारखे प्रमुख विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेचे महत्त्व हे विशेष असेच होते आणि आहे. इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आले त्या वेळी देशवासीयांना असे वाटले होते की, आता लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय सत्ताकारण चालेल. पण, झाले उलटेच! गाजावाजा करून सत्तेत आलेले इम्रान खान हेसुद्धा लष्कराच्या हातचे बाहुले असलेले पंतप्रधान ठरलेत. लष्कराच्या संमतीशिवाय त्यांचे पानही हलत नाही, असे दिसून आले. शिवाय, दहशतवाद आणि कट्टरतावाद वाढीस लागला तो वेगळाच. इम्रान खान यांच्या सत्ताकाळात आपल्याला मोकळा श्वास घेता येईल, महागाई कमी होईल, भ्रष्टाचार कमी होऊन देशाचा विकास होईल, अशी जनतेला अपेक्षा होती. पण, झाला भ्रमनिरास! भारतद्वेषापोटी इम्रान खानने स्वत:च्या देशाला चीनच्या दावणीला बांधल्यामुळे आणि सौदी अरबसारख्या मित्राकडून लाथा खाल्ल्याने पाकिस्तानची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे जनता इम्रान खान यांच्यावर नाराज आहे. ती नाराजी विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून समोर आली आहे.
  
 
इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकार उलथून टाकायचे आणि सत्तेवरील लष्कराचा प्रभाव संपुष्टात आणायचा, हा एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांचा मनोदय आहे, हेही स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील एकही क्षेत्र असे नाही, ज्यात लष्कराचा हस्तक्षेप नाही. लष्कराच्या विरोधात बोलण्याची हिंमतही राजकीय नेते करीत नाहीत. पण, पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन आवाज उठविला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. लष्कराची नाराजी पत्करायला हिंमत लागते. ती हिंमत विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकवटली आहे. त्यामुळे पुढल्या काळात कधीही इम्रान खान यांचे सरकार पडले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची सूत्रे, अध्यक्ष या नात्याने भलेही शाहबाज शरीफ यांच्या हाती असतील, पण माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हेच त्या पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ते लंडनमध्ये आहेत आणि विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले होते. मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि गेल्या वर्षभरापासून ते उपचारासाठी लंडनमध्ये आहेत. एवढे दिवस ते गप्प होते. पण, आता त्यांनी मौन सोडून इम्रान खानविरुद्ध आघाडी उघडली आहे. ही बाब साधीसरळ निश्चितच नाही. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम हीसुद्धा एक धाडसी नेत्री आहे. तिनेही पाकिस्तानातील राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि या प्रयत्नात ती पुढल्या काळात यशस्वी होईल, अशी चर्चा आहे. ती योग्य की अयोग्य, याचा फैसला तिथली जनताच करेल. गतकाळात लष्कराने अनेक सरकारं पाडली आहेत आणि प्रत्येक सरकारच्या कामात प्रचंड हस्तक्षेपही केला आहे. शिवाय, प्रत्येक पंतप्रधानाला लष्कराने छळले आहे, अशी घणाघाती टीका नवाझ शरीफ यांनी केली आहे. पाकिस्तानातील नेते सहजासहजी लष्कराविरुद्ध बोलण्याचे धाडस करीत नाहीत. पण, नवाझ शरीफ यांनी हे भयंकर वास्तव पुन्हा एकदा जगापुढे मांडण्याची हिंमत दाखवली, याचा अर्थ कुणाला काय घ्यायचा तो त्याने घ्यावा. पण, इम्रान खान यांच्यासाठी आणि पाकिस्तानी लष्करासाठीही तिथली परिस्थिती सामान्य राहिलेली नाही, हे एकूण घटनाक्रमावरून स्पष्ट झाले आहे.
 
 
2018 साली पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराने प्रचंड हस्तक्षेप केला होता, त्यातून नवाझ शरीफ यांच्या पक्षाचाही पराभव घडवून आणला होता आणि आपल्या हातचे बाहुले बनविण्यासाठी इम्रान खान यांना निवडून आणले होते. या हस्तक्षेपाविरुद्ध नवाझ शरीफ आणि इतरांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, काही न्यायाधीशांनीही दुर्लक्ष केले आणि शरीफ यांच्यासारख्या नेत्यांनाच तुरुंगात डांबण्याचा निर्णय दिला. नवाझ शरीफही असेच काही बोलले आहेत. पण, एक सत्य त्यांच्या बाबतीतले जाणून घेतले पाहिजे. 1980 पासून स्वत: नवाझ शरीफ हेही लष्कराच्या जवळचे होते आणि लष्करी अधिकार्‍यांना आवडणारे नेते होते. 1999 पर्यंत सगळे काही सुरळीत होतेे. पण, त्या वर्षी शरीफ यांनी जेव्हा जनरल मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरून हटविण्याचा प्रयत्न केला होता, त्या वेळी डाव उलटला आणि लष्करानेच नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून लावली, नवाझ शरीफ यांना सत्तेतून बेदखल केले आणि स्वत: परवेझ मुशर्रफ यांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली होती. जसे नवाझ शरीफ कधीकाळी लष्कराच्या जवळ होते, तसे जवळपास प्रत्येकच पंतप्रधान कधी ना कधी लष्कराच्या प्रेमात राहिला आहे. त्यामुळे आज जे विरोधक लष्कराचा हस्तक्षेप संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत, त्यांचा तो उद्देश कितपत सफल होतो, हे येणारा काळच सांगेल. शेवटी अधिकार जनतेकडे आहे. जनता ज्याला मतदान करणार, तो सत्तेवर येणार. नवाझ शरीफ आणि भुट्टो घराण्याचा इतिहास तपासला, तर विरोधकांनी सुरू केलेल्या ‘डेमोक्रॅटिक अभियाना’ला जनता कसा प्रतिसाद देते, यावरच सगळे अवलंबून असणार आहे. विरोधक इम्रान खानवर टीका करत असताना दुसरीकडे, इम्रान खान यांनीही विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. आपण विरोधकांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यानेच ते आपल्याविरुद्ध एकवटले आहेत, हा इम्रान खान यांचा तर्क आहे आणि तो खरा असेल, तर योग्य निर्णय करायला जनता समर्थ आहेच. पाकिस्तानी अर्थव्यवस्था संकटात आहे, भीषण संकटात आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान कटोरा घेऊन भीक मागत फिरत असताना, विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध मोहीम उघडली आहे. दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने आणि भारताने हा मुद्दा अनेक व्यासपीठांवरून अनेकदा उपस्थित केला असल्याने ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ अर्थात, एफएटीएफच्या काळ्या यादीत टाकले जाण्याची टांगती तलवारही पाकिस्तानवर आहेच. त्यातूनही पाकला स्वत:ची सुटका हवी आहे आणि इम्रान खान त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असताना अचानक विरोधकांनी म्यानातून तलवारी उपसल्याने इम्रान खान यांची अवस्था बिकट झालीच आहे, जनतेची स्थितीही केविलवाणी झाली आहे. महागाईचे चटके बसत आहेत, भ्रष्टाचाराने व्यवस्था सडली आहे. इम्रान खान यांच्याकडून भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान भिकेला लागला आहे. अशा वाईट अवस्थेतील पाकिस्तान, चिनी प्रभावामुळे भारताच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न करतो आहे, यात त्याचेच अहित आहे.