नोकरी गमावलेल्यांना निम्मे वेतन मिळणार

    दिनांक :17-Oct-2020
|
-44 कोटींची तरतूद
नवी दिल्ली, 
कामगार राज्य वीमा महामंडळ अर्थात ईएसआयसी अंतर्गत नोंदणीकृत कामगारांनी कोरोना टाळेबंदी काळात नोकरी गमावली असल्यास केंद्र सरकारकडून तीन महिन्यांचे निम्मे वेतन दिले जाणार आहे. ही मदत अटल विमा कल्याण योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
money_1  H x W:
 
विशेष म्हणजे, ज्या कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली असेल, अशांनाही लाभ मिळवता येणार आहे. सरकारकडून या योजनेच्या प्रचार आणि प्रसाराची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती श्रम मंत्रालयातील एका अधिकार्‍याने माध्यमांना दिली.
 
 
सूत्रांनुसार, कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या कामगारांचा आर्थिक मदत करण्याच्या हेतूने ही योजना राबवली जात आहे. सध्या यासंबंधी दररोज 400 दावे प्राप्त होत असून, त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. याशिवाय ईएसआयसीचे जे सदस्य डिसेंबर 2020 पर्यंत नोकरी गमावतील, त्यांनाही लाभ मिळणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत वाढीव सवलत देय असेल. त्यानंतर ही योजना 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 दरम्यान मूळ पात्रतेच्या अटीसह उपलब्ध असेल.
 
 
दरम्यान, ज्या कर्मचार्‍यांचे उत्पन्न कमी आणि मर्यादित असते अशांसाठी ईएसआयसी योजना उपलब्ध आहे. ज्या उद्योग वा कारखान्यात 10 पेक्षा अधिक कामगार असतात, ते यासाठी पात्र ठरत असतात. शिवाय पगार 21 हजारांपर्यंत असणे गरजेचे आहे. देशात सध्या 3.5 कोटी कुटुंब सहभागी असून, सुमारे 13.5 कोटी लोकांना वैद्यकीय सुविधा मिळते.