कोरोनावरील लस मार्चपर्यंत

    दिनांक :17-Oct-2020
|
नवी दिल्ली, 
सर्वकाही सुरळीत झाले आणि सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर देशाला मार्चपर्यंत कोरोनावरील लस मिळू शकेल, अशी माहिती जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकार्‍याने दिली आहे. सीरमतर्फे देशभरात ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॉझिनेका कंपनीच्या कोरोना लसीची चाचणी घेतली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिली. प्रशासनाने लवकर मंजुरी दिल्यास, भारताला मार्चपर्यंत कोरोना लस मिळू शकते. अनेक कंपन्या या लसीवर काम करीत आहेत. भारतातही हे संशोधन वेगाने सुरू आहे. देशात दोन कोरोना लसींची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. आणखी एका लसीची दुसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे तसेच अन्य कंपन्याही लसीवर संशोधन करीत आहेत, असे ते म्हणाले.
 
 
corona las_1  H
 
कोरोनावरील उपचारांसाठी मलेरिया, एचआयव्हीवरील औषधे वापरण्यात येत आहेत. यावर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांच्यानुसार पुढील वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीपर्यंत कोरोना लस तयार व्हायला हवी. कोणत्याही लसीच्या चाचणीत चढउतार येतात. जानेवारी 2021 पर्यंत आम्ही अंतिम चाचण्यांचे अहवाल पाहू. त्यामुळे दुसर्‍या तिमाहीपर्यंच एसआरएस-सीओव्ही-2 विरोधात लस तयार व्हायला हवी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
 
डॉ. जाधव यांनी ‘इंडिया व्हॅक्सिन अव्हेलॅबिलिटी’ आभासी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, आम्ही दरवर्षी 70 ते 80 कोटी डोस बनवू शकतो. देशाची 55 टक्के लोकसंख्या ही 50 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र, उपलब्धता आणि जोखीम या आधारावर आधी ही लस आरोग्य कर्मचार्‍यांना दिली जावी. यानंतर इतरांना देण्यात यावी. आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत 6 ते 7 कोटी डोस तयार करीत आहोत. मात्र, परवाना मिळाल्यानंतरच ही लस बाजारात येईल. यानंतर आम्ही सरकारच्या संमतीने आणखी मात्रा तयार करू.
 
 
वयोगटानुसार लसींना मंजुरी
दरम्यान, कोरोना लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारने तयारी सुरू केली असून, एकापेक्षा जास्त कोरोना लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात ज्या लसींची चाचणी सुरू आहे, त्या दोन किंवा तीन मात्रांच्या लसी आहेत. संशोधकांनुसार एका मात्रेच्या लसीपेक्षा दोन किंवा तीन मात्रेची लस अधिक परिणामकारक आहे. यामुळे वयोगटानुसार परिणामकारक असलेल्या वेगवेगळ्या लसींना मंजुरी दिली जाऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.