'आम्हीच' केला होता काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न

    दिनांक :17-Oct-2020
|
इस्लामाबाद,
26 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी लष्कराने बारामुल्लाचा ताबा घेतला, त्यावेळी 14 हजारांपैकी केवळ 3 हजार सैनिक जिवंत होते. महाराज हरिसिंग यांनी भारत सरकारला मदतीची याचना केली, त्यावेळी आम्ही श्रीनगरपासून केवळ 35 मैलांच्या अंतरावर होतो. काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न आम्हीच केला होता, अशी कबुली पाकिस्तानचे सेवानिवृत्त मेजर जनरल यांनी ‘रेडर्स इन काश्मीर’ नावाच्या पुस्तकात दिली आहे.
 
 
pak-army 1_1  H
 
जम्मू-काश्मीरसाठी ऑपरेशन गुलमर्ग राबविण्यात आले आणि हा प्रांत बळकविण्यात आमचा हात असल्याची कबुली पाकिस्तानने कित्येक दशकांनंतर आता दिली आहे. पाकिस्तानच्या आक्रमकतेची तपशीलवार माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. याचा कट लाहोर आणि रावळपिंडी येथे शिजला होता, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.
 
 
1947 सालातील सप्टेंबरच्या सुरुवातीला काश्मीर ताब्यात घेण्यासाठी योजना तयार करा, असे मियान इफ्तिखारुद्दीन या मुस्लिम लीगच्या तत्कालीन नेत्याने सांगितले होते. यावर ‘आर्म्ड रिव्होल्ट इनसाईड काश्मीर’ नावाची तपशीलवार योजना मी तयार केली. पाकिस्तान उघडपणे आक्रमकपणा दाखवेल, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे आम्हाला वाटत होते. काश्मिरींना आतून मजबूत करण्याची आमची योजना होती. त्याच वेळी काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला प्रवेश करू न देण्याची योजनाही आखली होती.
 
 
या कटात वरिष्ठ नेतृत्व देखील सहभागी असल्याचे पुरावे त्यांनी पुस्तकात दिले आहेत. तत्कालीन पंतप्रधान मिर लियाकत अली खान यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मला लाहोर येथे बोलावण्यात आले होते. पहिले माझी भेट सरदार शौकत हयात खान यांच्यासोबत झाली. त्यावेळी ते पंजाब प्रांताचे मंत्री होते. त्यांच्या हाती माझ्या योजनेची प्रत होती.
 
 
आखलेल्या योजनेवर 22 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू झाली. 24 ऑक्टोबर रोजी डोगरा रेजिमेंटने माघार घेतलेल्या मुझफ्फराबाद आणि डोमेलवर पाकिस्तानी लष्कराने हल्ला केला. दुसर्‍या दिवशी पाकिस्तानी पथक श्रीनगरच्या दिशेने निघाले. 27 ऑक्टोबर रोजी भारताने काश्मीरमध्ये जवान पाठवले आणि पाकिस्तानला रोखले, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लाहोर येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भारतीय लष्कराने परतवलेल्या पाकिस्तानी हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली, असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.