भारत : विश्वातील एक महत्त्वपूर्ण राष्ट्र!

    दिनांक :18-Oct-2020
|
मंथन
  
 - आशुतोष चंद्रकांत ठोंबरे
 
आज विश्वात कोरोना काळ म्हणून 2020 हे वर्ष ओळखले जात आहे. 2020 हे वर्ष तसे पाहिले तर भारतीयांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे जगात बहुतेकांनी भारतीय संस्कृती अवलंबिली आहे. सोबतच भारत हा पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सदस्य निवडला गेला आहे.
 
bharatmata_1  H
 
किमान 1500 वर्षांपूर्वी भारत हे जगातील सर्वाधिक व्यापार करणारे एकमेव राष्ट्र होते. केवळ जीवनावश्यक वस्तूंची निर्यात नव्हे, तर जीवनमान उंचविणार्‍या प्रत्येक बाबींची भारतातून निर्यात होत असे. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत हे विश्वामध्ये निर्यातक्षम राष्ट्र म्हणून प्रसिद्ध होते. जगातील एकतृतीयांश अर्थव्यवस्था भारताची होती. साहित्यापासून विद्यापीठापर्यंत आणि शांतिसंदेशापासून शौर्यापर्यंत सर्व बाबतीत भारत हा उच्चतम स्थानावर होता. कृषिविषयक व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ गाभा होता. आज ज्या वर्णव्यवस्थेला भारतीय जनता गलितगात्र समजते, त्याच वर्णव्यवस्थेच्या बळावर भारत विश्वगुरू होता.
 
‘हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र अभिवादन’ हे विचार भारतीय जनमानसात प्रवाहित होत होते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या लौकिकामुळे ग्रीक, शक, कुशाण आणि हुण भारताकडे आकर्षित झाले. हळूहळू ते भारताच्या राष्ट्रीय जीवनात मिसळून गेले. त्यांनीही भारतीय इतिहासात आपले स्थान निर्माण केले. भारतीय कालगणनेला नवीन दिशा दिली. परंतु, कधीही आपली वेगळी ओळख दाखवली नाही. मधल्या काळात स्वत:ला भारतीय विचारांचे पाईक समजणार्‍या काही लोकांनी सप्तबंदी लादल्या होत्या. या सप्तबंदींबद्दल स्वा. सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे. या सप्तबंदींमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधोगतीकडे वाटचाल करू लागली. परंतु, या काळात जगाच्या इतर भागात आवश्यक तशी विकासगंगा न वाहिल्याने भारतीय अर्थव्यवस्था जगात उच्च स्थानावर होती.
 
1754 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान मांडायला सुरुवात केली आणि खर्‍या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था अधोगतीकडे झुकली. जी अर्थव्यवस्था जगाला सहज उपयोगी पडणारी वस्तू देत असे, ती अर्थव्यवस्था कच्च्या मालाचे उगमस्थान म्हणून नावारूपास येऊ लागली. भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विद्या साधनांना निकृष्ट दर्जाचे म्हणून हिणवणे सुरू करण्यात आले. भारतातील शिक्षणपरंपरा आणि आचारपद्धती हे केवळ थोतांड आहे, हे विचार फक्त भारतातच नव्हे, तर जगातही रुजविले गेले. मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली 1833 मध्ये भारतीय शिक्षणव्यवस्था बदलली गेली. शिक्षणव्यवस्था बदलून आंग्लांनी भारतीय जनमानसावर सनातनी विचारांचा प्रभाव पडू दिला नाही. थोडक्यात, भारतीय आचारपद्धती, अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळत गेली. 1947 ला आंग्लांनी भारत सोडला तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती.
 
जेथे भारतीय चलन आणि अर्थव्यवस्था उच्चतम पातळीवर होती, तिची स्थिती स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस आंग्लांच्या हातातील बाहुले, अशी झाली होती. भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांना जागतिक पातळीवर निकृष्ट दर्जा मिळाला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर म्हणजे आजपासून 75 वर्षांअगोदर मित्रदेशांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली, त्यामध्येही भारताला संस्थापक सदस्य बनविले. केवळ स्वत:ची शक्ती पूर्ण जगभर प्रस्थापित व्हावी यासाठी आंग्लांनी ही चाल खेळली असावी.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही वर्षांत दोन बलाढ्य देशांनी भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान देण्याची शिफारस केली होती. परंतु, आपले शांतिपूर्ण नेतृत्व जगासमोर आणण्यासाठी आमच्या नेतृत्वाने ती शिफारस फेटाळली आणि आपल्या आजन्म शत्रू असणार्‍या चीनला ती जागा देऊ केली. खर्‍या अर्थाने भारतीयांच्या पायावर धोंडा मारून घेतला.
 
तत्कालीन भारतीय नेतृत्वाने केलेले हे दोन महापातक अजूनही भारताच्या विकासातील दोन अडसर आहेत. औद्योगिक विकास महामंडळेसुद्धा स्थापित केली, परंतु तटस्थ भूमिकेमुळे आपल्या विकासाला मंद गती मिळाली. उलटपक्षी, विस्तारवादी चीनने आपल्यावर चढाई केली आणि आपल्या आर्थिक विकासाला खीळ बसवली. एवढेच काय, तर पाकिस्तानसारख्या नवीन जन्मास आलेल्या देशाने आपल्याकडे डोळे वटारणेे सुरू केले. भारतीय नेतृत्वाने त्याला चोख उत्तर दिले. परंतु, सर्वांगीण विकासासाठी शीतयुद्धातील एका गटाकडे स्वत:ला वळविणे भारताला आवश्यक वाटू लागले. भारताने तत्कालीन सोव्हिएत युनियनकडे आपल्यासाठी सहायक म्हणून पाहिले.
 
कदाचित यामुळेच अमेरिका आणि भारत या देशांमधील संबंध थोडे खराब झाले. परंतु, आशियातील भारताचे स्थान लक्षात घेता अमेरिकेने भारतावरील दृष्टी दूषित केली नाही. जरी भारताला स्थायी सदस्यत्व नाकारले, तरी प्रत्येक वेळेस अस्थायी स्वरूपात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान देण्यासाठी रशिया आणि अमेरिका बरेचदा एकत्र आले. सोबतच जर्मनी, भारत, ब्राझील आणि जपान या देशांनी वेळोवेळी एका स्थायी सदस्यत्वाची मागणी केली आहे. त्यासंबंधीच्या गटाची स्थापना केली. बांगलादेशच्या निर्मितीमुळे भारताचे जागतिक महत्त्व वाढले. दोन वर्षांच्या आणिबाणी संघर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय लोकशाही प्रस्थापित झाल्याने संयुक्त राष्ट्रसंघात सर्वात मोठा लोकशाहीप्रिय देश म्हणून भारताचे नाव समोर आले. अधिकृत भाषा नसूनही संयुक्त राष्ट्रसंघात भारतीय मंत्र्यांनी अर्थात अटलजींनी हिंदी या राष्ट्रभाषेत भाषण केले, ही भारतीयांची अजोड उपलब्धी होती.
 
1980 च्या दशकात सार्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगात शांतताप्रिय आणि विकासाभिमुख देश म्हणून भारताने दक्षिण आशियाचे नेतृत्व केले. 1989 च्या सुमारास खाडी देशांच्या वादात भारतीय नेतृत्वाने तटस्थ भूमिका घेतली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्नही केले. शांतिसेनेत भाग घेतल्यामुळे भारताने युवा आणि प्रतिभावान नेतृत्वही गमावले. परंतु, तरीही किमान 47 वेळा शांतिसेनेमार्फत शीतयुद्धाच्या कालखंडात विश्वशांतीसाठी प्रयत्न केले.
 
1990 च्या सुमारास शीतयुद्धाची सांगता झाली. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ढासळला आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिसर्‍यांदा रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले, तेव्हाच शेअर बाजारात हर्षद मेहता नावाचे वादळ निर्माण झाले. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर, अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल करू लागली.
 
नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचे त्रिशंकू सरकार भारतात स्थापन झाले. जगासाठी फार मोठी बाजारपेठ उघडली गेली, भारतालाही जगातील मोठी बाजारपेठ मिळाली. हजारो भारतीय वस्तू जगात निर्यात होऊ लागल्या. आयात वस्तूपेक्षा निर्यात वस्तूंचे प्रमाण वाढले. भारतीय बुद्धीसुद्धा जगात सर्वत्र वावरू लागली. आज किमान 175 देशांत भारतीय जनतेचे अस्तित्व प्रस्थापित झाले. जेथे स्वस्त आणि चांगला कामगार हवा होता, अशा क्षेत्रात भारतीय आपले स्थान निर्माण करू लागला. कधीकाळी आंग्ल सत्तेत सूर्य मावळत नाही, असे म्हणणारे आता, ‘जेथे भारतीय तेथे सूर्य मावळत नाही,’ असे म्हणू लागले. पूर्वेकडे पाहा, हे नवीन सूत्र भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिरावू लागले.
 
संपूर्ण जगात भारताकडे आकर्षित होणारे देश तयार झाले. केवळ व्यापार नव्हे, तर शांततेसाठी भारतीयांकडे जग पाहू लागले. भारतीयांनी केलेले प्रत्येक कार्य जगाला मार्गदर्शक ठरले. अणुचाचणी, अणुकरार आणि दहशतवादी कृत्यांच्या विरुद्ध कारवाई, या प्रत्येक बाबी जगाला प्रेरणादायक ठरत गेल्या.
 
जलवायू परिस्थिती असो वा जगातील शांतता असो, सर्वच बाबतीत भारत अग्रेसर आहे. 2011 सालानंतर भारतीय नेतृत्वाने जगात मैत्रिपूर्ण वातावरण तयार केले. प्रत्येक राष्ट्राशी आपले संबंध जोपासले. इस्रायल असो वा पाकिस्तान, प्रत्येकाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. जागतिक योगदिनाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्यजातीला आरोग्याची महती सांगण्याचा उत्तम प्रयत्न केला. आज जगातील 95 टक्के देश भारताचे नेतृत्व मान्य करतात. जगातील प्रथम पाच अर्थव्यवस्थेत भारताचे नाव समोर आले. आजकाल विदेशी माध्यमातूनसुद्धा भारतीयांचे कौतुक होते.
 
जगातील सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठी संघटना भारताचे नेतृत्व करीत आहे. या सर्व पातळीवर भारत आपले शतकापूर्वीचे स्थान हळूहळू मिळवत आहे. परंतु, अजूनही भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य नाही, ही एक खंत आहे. चीनसारखा विस्तारवादी देश भारतीय विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वत:ची व्हिटो पॉवर वापरून भारताला कमजोर बनवतोय.
 
चीनच्या या भूमिकेमुळे पुराणातील भस्मासुराची आठवण येते, ज्याने स्वत:लाच भस्म केले होते. अकारण वाद निर्माण करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न चिनी नेतृत्व करत आहे. एवढे असूनही चिनी व्यापारात भारतीयांचा वाटा जास्त आहे, हे चीनने लक्षात ठेवावे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत राष्ट्रसंघाच्या व्यवस्थेत काही बदल सुचवले आहेत. सोबतच कोरोना काळात भारताने केलेल्या मदतीचा उल्लेख केला आहे. सर्वात जास्त कोरोनामुक्त भारतीयच आहेत आणि भारत या संघर्षात जगाचे नेतृत्व करेल, ही ग्वाहीसुद्धा दिली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, भारत हा लवकरच विश्वगुरू बनेल, असा विश्वास वाटतो. भारतीय विचारानुसार विश्वगुरुत्व म्हणजे मानवी जीवनातील सर्वांगीण विकासासाठी जगाचे नेतृत्व करणे, हेच होय!
8149000870