जीवसृष्टीचा प्राण...

    दिनांक :18-Oct-2020
|
 पर्यावरणाचे अंतरंग
 
- धनंजय बापट
 
पानीयं प्राणिनां प्राणा विश्वमेव च तन्मयम्।
न हि तोयाद्विना वृत्तिः स्वस्थस्य व्याधितस्य वा॥
 
अर्थात- पाणी हा जीवसृष्टीचा प्राण होय. स्वस्थ जिवाचे तसेच आजारी मनुष्याचेही पाण्याविना भागू शकत नाही.
उपरोक्त श्लोक हे आपले सांस्कृतिक संचित. आपले पारंपरिक शहाणपण इतके व्यापक होते. अन्नपचन, शरीर संचालन, शारीरिक ऊर्जा देणारे पाणी. पृथ्वीवरील सजीवाची व्युत्पत्ती पाण्यापासून झाली. कोणताही सजीव पाण्याविना अस्तित्वात येऊ आणि राहू शकत नाही. एकूण पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनासंदर्भातही पाणी आणि त्यातही शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध असणे, ही बाब महत्त्वाची आहे. पृथ्वीवर 71 टक्के पाणी आणि 29 टक्के जमीन आहे.
 
wasundhara _1  
 
पाणी हा एकमेव पदार्थ असा आहे की, द्रव, घन किंवा बाष्प स्वरूपात कितीही दाब वाढवला तरी त्याचे गुण (प्रॉपर्टीज) बदलत नाहीत. मानवी शरीरातदेखील 70 टक्के पाणीच असते. याचा अर्थ, पृथ्वीची एकूण रचना असो वा मानवी देहाची संरचना, दोहोंत पाण्याचे प्रमाण फार मोठे व महत्त्वाचे आहे. ‘पाणी तेथे जीवसृष्टी’ हे सूत्र आपल्या पूर्वसुरींनी कधीचेच मान्य केले आणि पारंपरिक पद्धतीने आपण या ज्ञानाचे पुढच्या पिढ्यांसाठी वहनही केले. गेली काही दशके मात्र पाण्याच्या संदर्भात जागतिक पातळीवर गंभीर चिंतन होऊ लागले आहे.
 
71 टक्के पाणी असलेल्या पृथ्वीवर पाण्याची समस्या उद्भण्याचे कारण असे की, त्यांपैकी फक्त एक टक्का पाणी पिण्यासाठी योग्य आहे. तरीसुद्धा गेल्या पन्नास वर्षांत पेयजलाची फारशी उणीव जाणवली नाही. मग गेल्या पन्नास वर्षांत असे काय घडले की आपण, पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, अशी चर्चा करू लागलो?
 
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी थोडेसे मागे जावे लागेल. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात पाणी समस्येची सुरुवात झाली. वाढती लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक अन्नाचे उत्पादन, अधिकाधिक प्रमाणात शेती करण्याचा प्रयत्न, औद्योगिकीकरण, जलप्रदूषण इत्यादी मुद्दे यासंदर्भात विचारात घ्यावे लागतात. मानवी जीवन विकसित होत असताना आणि लोकसंख्येचा भार वाढत असताना नैसर्गिक संसाधनांवर भार पडणे स्वाभाविक आहे. परंतु, पाण्यासारखे महत्त्वाचे संसाधन एकतर्फी ओरबाडणे आपल्याला महागात पडते आहे.
 
त्याच्या पुनर्भरणाचा आणि व्यवस्थापनाचा आपण विचारच केला नाही आणि नेमकी तीच गोष्ट आपल्याला भोवते आहे. तरीही सर्वसामान्यांच्या वर्तनात याचे गांभीर्य आलेले दिसत नाही. पाण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी वॉटरमॅन राजेंद्र सिंह किंवा जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्यासारख्यांवर सोडून बहुतांशी लोक पाण्याची उधळपट्टी करीतच आहेत. वास्तवात व्यक्तिगत नेमके भान असे असले पाहिजे की, मी स्वतः पाणी वापरतो ना?, मग त्याचे पुनर्भरण आणि व्यवस्थापन मी माझ्यापासूनच का सुरू करू नये?
 
समस्येच्या तळाशी...
लोकसंख्येतील वाढ हा घटक जगासमोर निर्माण झालेल्या अनेक समस्यांशी जोडला गेला आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यात आपण यश मिळवले, तर पाणी प्रश्नाच्या संदर्भात आशादायक चित्र निर्माण होऊ शकेल. दुसरा मुद्दा आहे, शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचा. त्यातही दुबार पीक पद्धतीचा. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी ही पद्धत गरजेची आहे. मात्र, तिचा अंगीकार करताना पाण्याचे पुनर्भरण आणि व्यवस्थापनाचीही आवश्यकता आहे. तसेच ठिबक आणि तुषार सिंचन हा शेतीसाठी पाणी बचतीचा सर्वोत्तम पर्याय आहे.
 
आज भारतात फक्त 2.3 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणि फक्त 3.3 टक्के क्षेत्र तुषार सिंचनाखाली येते. शासनाने मदत केली तरच हे प्रमाण वाढेल. त्यासाठी सब्सिडीसारखे प्रोत्साहनपर उपाय केले पाहिजेत. पुढच्या पंचवार्षिक योजनेत किमान 10 टक्के क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली येईल, यासाठी सरकारने नियोजन केले पाहिजे. शेतीसाठी केल्या जाणार्‍या जलवापरासंबंधी आणखी एक मुद्दा आहे. तो असा की, आपल्याकडे सिंचनासाठी जी काही कालव्यांची पद्धत विकसित झाली आहे, ती खुली आहे. या कालवे प्रकारात गळती, बाष्पीभवन यामुळे खूप पाणी वाया जाते. यावरील उपाय म्हणून पाईप सिस्टमचा वापर अंगीकारला पाहिजे, जिची उपलब्धता सध्या जवळजवळ शून्य टक्के आहे.
 
औद्योगिकीकरणासाठी...
नैसर्गिक संसाधनांचे विक्रमी दोहन आणि शोषण मानवजातीने केले. औद्योगिक कामांमध्ये वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेतील सफाई-धुणे, सुटे भाग थंड किंवा गरम करणे, त्यांच्या आकारात बदल करणे, वाहतूक, या सर्व गोष्टींसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, या उपयोगाहून गंभीर प्रश्न आहे या प्रक्रियेमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याच्या विल्हेवाटीचा. औद्योगिक प्रकल्पांचे दूषित पाणी चांगल्या पाण्यात मिसळते. एक लिटर दूषित पाणी इतर ठिकाणचे आठ लिटर्स पाणी प्रदूषित करते. त्यामुळेच औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर पडणार्‍या पाण्यावर प्रक्रिया होणे ही गरज आहे. ते कायद्याने सक्तीचे आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. परंतु, यासंदर्भातील अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ आणि भ्रष्ट आहे, हे येथे स्पष्टपणे नोंदवले पाहिजे.
 
घरगुती वापर
घरगुती पाण्याचा वापर हा तसा या समस्येचा अत्यंत छोटा भाग आहे. परंतु, यातही आपल्याला पाण्याची बचत करता येणे शक्य आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हे सूत्र नागरिकांनी, आम्ही किंवा मी म्हणून अंगीकारले, तर घरगुती पाण्याच्या वापरातही आपण जलसंवर्धनाचे प्रयोग करू शकतो. अंगण किंवा वाहने यांच्या सफाईसाठी मर्यादित पाण्याचा वापर करणे, गळणारे नळ बंद करून ठेवणे, असे कित्येक उपाय आपण करू शकतो. त्यातून आपल्याला सदैव पाणी बचतीचे भान राहील आणि मुलांवरही तसे संस्कार होतील.
 
पैसा वाचवणे हे पैसा कमावण्यासारखेच आहे, असे म्हणतात. तसेच पाण्याच्या संदर्भात म्हणता येईल. पण, या दोन बाबीत फरक असा की, पैसा निर्माण करता येतो. तो कमावता येतो. नोटा छापता येतात. पाणी तयार करता येत नाही. ते कमावता येत नाही. पृथ्वीवर उपलब्ध असलेले वापरयुक्त पाणीच आपल्याला पुन:पुन्हा वापरायचे आहे. एकुणात, पृथ्वीचा भूजल स्तर फार वेगाने खालावतो आहे. कारण साधे आहे. ते असे की, ज्या वेगाने आपण पाण्याचा वापर करतो, त्या वेगाने त्याचे पुनर्भरण करीत नाही. जिथे पाणी अडत नाही, तिथे ते टिकत नाही आणि त्यामुळे ते उपलब्ध होत नाही.
 
पाणी अडवा-पाणी जिरवा-पाणी वळवा
जलबचतीच्या अन्य उपायांसह पाणी अडवणे व जिरवणे हा दिल्ली ते गल्ली जलसंवर्धनाचा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय, आणखी एक मार्ग म्हणजे अतिरिक्त पाणी गरजेच्या ठिकाणी वळते करण्याचा. एका नदीच्या पुराचे किंवा अतिरिक्त पाणी ज्या नद्यांमध्ये जलस्तर कमी असेल, अशा नद्यांच्या पात्रांकडे वळवणे हे त्यातील सूत्र. यातून पुराचा प्रश्न कमी होईल आणि पाण्याची उपलब्धता वाढेल. राज्य सरकारांनी छोटे बंधारे, शेत बंधारे, नाल्यांचे खोलीकरण इत्यादी उपाय गतिमान पद्धतीने हाती घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ‘जलयुक्त शिवार’ ही अत्यंत चांगली योजना राबवण्यात आली. त्या योजनेला मोठे यश मिळाले. मोठ्या धरणांना लागणारा खर्च आणि वेळ हे मुद्दे लक्षात घेऊन जलसाठ्यांचे विकेंद्रीकरण, हे या योजनेचे सूत्र होते. राजकारण बाजूला ठेवून आणि योजनेत गरजेप्रमाणे बदल करून ती सातत्याने सुरू ठेवणे महाराष्ट्राच्या हिताचे ठरेल.
 
छतावरचे पाणी
जलसंवर्धनाच्या संदर्भात रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावरील पाणी जमिनीत जिरवण्याच्या तंत्राचा खूप उदोउदो केला जातो. या तंत्राला बर्‍याच मर्यादा आहेत. नुसते शोषखड्डे तयार करून अपेक्षित प्रमाणात पाणी जिरवता येणे अशक्य आहे. छतावरचे पाणी विहिरीत अथवा कूपनलिकेत टाकले तर निश्चितच फायदा होतो. परंतु, आज विहिरीच्या पाण्याची स्थिती काय आहे? एकीकडे रस्त्यांवर, रस्त्यांच्या बाजूला आणि अंगणातदेखील काँक्रीट-फरशी टाकायची आणि दुसरीकडे रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या बाता करायच्या, हा मोठा विनोद आहे.
 
जमिनीत पाणी जिरायचे असेल, तर जमिनीचा काही भाग आपण मोकळाच ठेवला पाहिजे. आज नागपूरसारख्या शहरात स्टॉर्म वॉटर ड्रेनचा सुळसुळाट दिसतो. परंतु, त्यांच्या तळाशी मात्र पक्के काँक्रीट आहे. मग पाणी जिरणार कसे? रस्त्यांच्या कडेला या पावसाचे पाणी वाहून जाणार्‍या बंद नाल्यांना ठरावीक अंतरावर शोषखड्डे का असू नयेत? त्यांच्या तळाला ठरावीक अंतरावर छिद्र का असू नये? पण, अशा स्मार्ट उपाययोजनांवर कुणाचेच लक्ष नाही. मलनिस्सारण वाहिन्या व टाके जुने झाले आहेत. बहुतांशी चेंबर्सचा तळ निघून गेला आहे.
 
त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होते आहे. त्यामुळे प्रसंगी पेयजलाचा किंवा घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा एक मार्ग विनाकारण बंद होतो आहे. त्याचा ताण प्रक्रिया केलेल्या पिण्याच्या पाण्यावर. गावांसाठीचे पाणी शहरांत आणि शहरांतले प्रदूषित पाणी नदी-नाल्यातून गावाकडे (गोसेखुर्द), अशी ही गुंतागुंत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करणारी आहे. मुळात भूतदया हे जसे मूल्य आहे, तसे जलसंवर्धनदेखील आपल्या मूल्यांमध्ये समाविष्ट केले पाहिजे. पाण्याचे पुनर्भरण आणि व्यवस्थापन हा आपल्या संस्काराचा आणि शिक्षणाचा भाग झाला पाहिजे. अन्यथा, आजवर जे जीवसृष्टीच्या निर्मिती आणि कल्याणासाठी प्रवाहित होत राहिले, तेच पाणी मानवी संघर्षात वाहणार्‍या रक्ताच्या पाटांसाठी कारणीभूत ठरेल! 
 
9422101516
(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)