‘संघ समाज बनेगा!’

    दिनांक :18-Oct-2020
|
रा. स्व. संघ विविध जाळ्यांचेही जाळे आहे. (नेटवर्क ऑफ नेटवर्क्स). समाजातील विविध प्रकारच्या दखलपात्र मुद्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना उचलून धरण्यासाठी किती संस्था अथवा संघटना स्थापन करायच्या, याला काही मर्यादा नाही. त्यामुळे संघविचाराने प्रेरित अशा अनेक आघाडीच्या संघटना स्थापन करता येऊ शकतात. ज्या निरर्थक ठरल्या त्या हटविल्या जातात. आजच्या घडीला, अशा कुठल्याही संघटना निरर्थक नाहीत, परंतु एक अंतर्निहित लवचीकता उत्पन्न होण्याची आवश्यकता आहे. इथे कुठलीही कठोर यादी नाही. या स्वभावामुळे, कधीकधी, परिवारातील संघटनांना संघसृष्टी, असेही संबोधिले जाते. परंतु, खरे म्हणजे, या संघटना, ‘भारतीय दृष्टीतून भारतीय निर्मिती’ अशा आहेत. राष्ट्रहितासाठी रचनात्मक ऊर्जेचे एकीकरण, हा संघाचा मंत्र आहे.
 
 
samaj_1  H x W:
 
ग्रामविकास
सर्व परिवार संघटनांमध्ये भविष्याच्या दृष्टीने ग्रामविकास हा अत्यंत महत्त्वाचा विचारबिंदू व्याप्त आहे. भारतात सुमारे 6 लाख खेडी आहेत, जे आमचे भौगोलिक मूळ घटक आहेत. देश कृषिसंस्कृतिप्रधान असला, तरी ग्रामीण भागाची दुरवस्था कायम राहिली आहे. कृषी उत्पन्न कसे वाढवायचे, ग्रामीण रोजगार कसे विकसित करायचे, पशुधनाचा योग्य वापर कसा करायचा आणि एक आदर्श ग्रामीण जीवन कसे उभे करायचे, हे फार आवश्यक झाले आहे.
खेड्यांमध्ये नागरी सुविधा, शैक्षणिक सोयी, आरोग्य केंद्र आणि आर्थिक उलाढाल निर्माण केल्यानंतरच ग्रामविकास होऊ शकतो. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे चित्रकूट येथील कार्य बघून अनेक स्वयंसेवकांनी ग्रामविकासाचे कार्य हाती घेतले आहे.
 
 
1978 साली सक्रिय राजकारण सोडल्यानंतर नानाजींनी, संघाचे विचारक आणि नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आणि ग्रामविकासासाठी विकेंद्रीकरण यांच्या आधारे, ग्रामीण भागाच्या विकासाचे एक प्रतिमान (मॉडेल) निर्माण केले. त्यांनी आपला प्रकल्प उत्तरप्रदेशातील गोंडा आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सुरू केला. त्यांनी ग्रामविकासासाठी एक एकात्मिक कार्यक्रम विकसित केला. त्यात आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, कृषी, विविध उत्पादने, संसाधनांचे संवर्धन आणि सामाजिक जाणीव यासारख्या अनेक विषयांचा अंतर्भाव होता. लोकांचा पुढाकार आणि सहभाग हा या प्रकल्पाचा मूळ आधार होता.
 
 
मध्य भारतातील खडतर जीवन असलेल्या बुंदेलखंड भागातील चित्रकूटला नानाजींनी ग्रामविकासाचे केंद्रबिंदू बनविले. सध्या हा प्रकल्प 500 खेड्यांमध्ये कार्यरत असून शाश्वतता आणि मूलभूत गरजांच्या प्रतिमानावर तो सुरू आहे. ग्रामविकासासाठी या प्रकल्पात विविध कार्यक्रम घेण्यात येतात. खेड्यातील कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पडीत जमिनींचा विकास करण्यात येतो. लहान शेतकर्‍यांना, उच्च प्रतीचे बियाणे खरेदी करणे शक्य नसल्याने शेतीतून कमी उत्पन्न निघते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच गावाला बियाण्यांच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने, काही निवडक खेड्यांमध्ये बियाणे-निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. काही प्रकल्प, योगी अरविंदांच्या ‘ग्रामसमूह’ संकल्पनेवर कार्य करीत आहेत.
 
 
अधिक दुग्धोपादनासाठी उच्च प्रतीच्या गायींचे संवर्धन गौशाळेच्या मार्फत करण्यात येते. बुंदेलखंड परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष ही फार मोठी समस्या आहे. ही समस्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या शाश्वत पाणलोट व्यवस्थापनाच्या कार्यक्रमातून दूर करण्यात येत आहे. आर्थिक कार्यक्रमांशिवाय, चित्रकूटमध्ये तंटामुक्त समाज आणि कोर्ट-कचेरीमुक्त खेडे निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
 
 
अनेक प्रतिष्ठित संस्थांनी चित्रकूट आणि दीनदयाल संशोधन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे. यात भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर), खादी व ग्रामोद्योग कमिशन (केव्हीआयसी)सारख्या अनेक प्रतिष्ठित सरकारी संस्था, तसेच टाटा, अपीजय आणि वाडिया ग्रुप यांसारख्या प्रसिद्ध उद्योगसमूहांच्या लोककल्याणकारी विश्वस्त संस्थांचाही समावेश आहे. राष्ट्रसेवा आणि ग्रामविकास कार्यासाठी नानाजींना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
गौसेवा
हजारो वर्षांपासून आपली मान्यता आहे की, गौ-आधारित अर्थव्यवस्था ग्रामीण जनता आणि शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यास महत्त्वाची आहे. म्हणून, संघाच्या दृष्टीने गौसेवा फार महत्त्वाची आहे आणि ती अधिकाधिक विकसित करण्यात येत आहे. गेल्या 25 वर्षांपासून, गोआधारित उत्पादनांवर नागपूरजवळील देवलपार येथील व विश्व हिंदू परिषदेद्वारा संचालित प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. गौसेवेच्या प्रयत्नांमध्ये गौशाळाची निर्मिती व व्यवस्थापन हे विषयही जोडण्यात आले आहेत.
 
 
सूक्ष्म अर्थव्यवस्था
संघात सशक्त अशी स्वयंसहायता गट परंपरा आहे. सहकार भारती सहकार क्षेत्रात कार्यरत असून, मुख्यत: सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्राला वित्तपुरवठा करण्याचे कार्य करते. सहकार भारतीचे म्हणणे आहे की, बँकांनी केवळ मोठमोठ्या ठेवीदार व मोठ्या उद्योगांनाच अर्थपुरवठा न करता, ग्रामीण क्षेत्रातही तो केला पाहिजे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील नागरी सहकारी संरचनेवर संघविचारांचा प्रभाव आहे. समाजाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या तसेच पहिल्या पिढीतील लघु उद्योजक निर्माण करणार्‍या नागपूर नागरिक सहकारी बँक, ठाणे जनता सहकारी बँक, चिखली नागरी सहकारी बँक तसेच गुजरातमधील राजकोट नागरिक सहकारी बँक इत्यादी सामाजिक दायित्वाची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.
आजच्या आवश्यकता समजून घेत त्यांना प्रतिसाद देणे, विभिन्न अनुभवांपासून धडा घेणे आणि भविष्यातील गरजांचा वेध घेणे, हे संघपरिवारातील संघटनांतील समान आचरणसूत्र आहे.
 
 
प्रतिपुष्टी यंत्रणा (फीडबॅक मेकॅनिझम)
या संघटनांमध्ये प्रतिपुष्टी गोळा करण्याची सशक्त यंत्रणा आहे. संघटनांमध्ये भूमिका वेगळ्या असण्याचेही कधी प्रसंग येतात. पश्चिम घाट संवंर्धन आणि बीटी कॉटनचा प्रयोग, या मुद्यांवरील संघटनांच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात होत्या. परंतु, अधिक शास्त्रीय पुराव्यांची वाट बघण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजगारनिर्मितीसह विकास हा मुद्दादेखील हाताळण्याची गरज आहे.
 
 
सारांश, भारताच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, परिवारातील संघटनांचे भविष्यकालीन कार्य असेल आणि ते सक्षम व आत्मविश्वासू समाजनिर्मितीच्या दिशेने असेल, असे म्हणता येईल. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये चांगले नेतृत्व उपलब्ध करून देणे, हे उद्दिष्ट आहे. हे फार प्रचंड कार्य आहे आणि ही क्षमता कुणाकडे असेल, तर ती आश्चर्यकारक रीतीने आमच्याकडे म्हणजे संघाकडे आहे. परिवारानील संघटनांचे सुदूर नियंत्रण (रीमोट कंट्रोल) संघाकडे नाही, परंतु कौशल्याची संसाधने आणि ज्या मार्गावर त्यांनी चालावे अशी अपेक्षा असते, त्याची वैचारिक प्रक्रिया संघ उपलब्ध करून देत असतो. अशा रीतीने देशाला आवश्यक असलेल्या नैतिक मनुष्यबळाची संघ पूर्तता करीत असतो.
 
 
या नैतिक मनुष्यबळाचा आयाम प्रदर्शित करणारे अनेक उपक्रम स्वयंसेवकांनी सुरू केले आहेत. कुष्ठरोगी व त्यांच्या मुलांची सेवा करणारे हरिद्वारमधील आशिष गौतम यांचे दिव्य प्रेम मिशन याचे एक सुंदर उदाहरण आहे. लहानपणापासूनचा माझा चांगला मित्र सुनील देशपांडे व त्याची पत्नी अनुपमा, सध्या महाराष्ट्रातील मेळघाट येथील जनजातीय लोकांमध्ये कार्य करीत आहेत. तिथल्या स्थानिकांना बांबूपासून विविध उत्पादने करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामविकासाचे कार्य करणारा अभाविपचा एक जुना कार्यकर्ता- प्रसाद देवधरदेखील असेच एक उदाहरण आहे. विद्या भारतीच्या प्रतिमानाने प्रेरित होऊन अनेक स्वयंसेवक स्वत:च्या शिक्षण संस्था चालवीत आहेत. अशी पहिली शाळा उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथे 1952 साली सुरू झाली होती. त्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी तसेच सुनियोजित विकासासाठी 1958 साली राज्य स्तरीय शिशू शिक्षा प्रबंधन समिती स्थापन झाली. इतर राज्यांमध्येही शिशू मंदिरांचा प्रसार होऊ लागला आणि काही वर्षांतच अनेक शाळा स्थापन झाल्यात. सध्या विद्या भारतीद्वारा 13 हजार 67 शाळा संचालित केल्या जात आहेत आणि त्यात 34 लाख 75 हजार 757 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
 
जसजसा काळ पुढे जाईल, सर्वच क्षेत्रातील संघप्रेरित मंच, अनेकविध रूपांनी प्रकट होत जातील. संघकार्याला पूर्णविराम नाही. सर्वच क्षेत्रातील बदलत्या गरजांनुरूप जबाबदारी स्वीकारत या संघटना आपापल्या विहित कार्यांत अग्रेसर असतात. स्वयंसेवक आणि परिवारातील संघटना मेहनती, अनुशासित आणि प्रयत्नांची कुठलीही कसर न सोडणार्‍या असतात. स्थित्यंतरासाठी समाजाची मानसिकता तयार करण्याच्या कार्याचे आम्ही स्वागत करतो. आदर्शवादाची धरसोड वृत्ती तिथे नसणार, दिसणारे आणि अनुभवता येणारे परिणाम असतील. अशा रीतीने सक्षम झाल्यावर समाज स्वत:च स्वत:ला आवश्यक असलेली यंत्रणा निर्माण करील आणि अशा रीतीने ‘संघ समाज बनेगा’ ही उक्ती प्रत्यक्षात येईल.
 
 
संघ आणि समाजात कुठलेही द्वैत नाही. अशा रीतीने प्रभावित झालेला नवा भारत आपल्या जीवनमूल्यांच्या आधारावर विकसित, सशक्त होईल. ही सार्‍या जगासाठी एक कल्याणकारी शक्ती असेल. आम्ही आमची भाषा बोलू, वसाहतवाद्यांची नाही. हा विचार भविष्यासाठी आशा, विश्वास आणि उत्थानाचा आत्मा आहे.
सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या
‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद