कोरोनाला घाबरू नका...!

    दिनांक :02-Oct-2020
|
देहाची तिजोरी
 
कोरोनासंदर्भात अनेक प्रश्न जनमानसात आहेत. प्रश्नांची उत्तरे मिळाली की, अनाठायी भीती कमी होते. त्या अनुषंगाने निवडक पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, कोरोनाला योग्यपणे हाताळले तर त्यावर मात करता येणे शक्य आहे.
 

corona sanrakshan_1  
 
कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर आता प्रत्येकाला अ‍ॅडमिट का व्हावे लागत नाही?
उत्तर : सुरुवातीच्या काळात सामाजिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णाचे विलगीकरण अथवा त्यास भरती करवून घेत असे. मात्र, आता वैद्यकीयदृष्ट्या प्रत्येकाला भरती करणे गरजेचे नाही. शिवाय रुग्णसंख्येत वाढ होत असताना प्रत्येकाला भरती करून घेण्याएवढ्या पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत.
 
 
कुठल्या रुग्णांना भरती करण्याची आवश्यकता भासते? आपल्याला कधी कळेल की रुग्णाला भरती करायचे आहे?
उत्तर : कोरोनामध्ये 80 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असतात अथवा ते लक्षणविरहित असतात. त्यांना भरती करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्यांना सलग चार-पाच दिवसांहून अधिक ताप असेल, ताप कमी होतच नसेल, व्यक्ती साठ वर्षांहून अधिक वयाची असेल, अशा व्यक्ती ज्यास टीबी, रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास अथवा अन्य दीर्घकालीन आजार असतील; त्यांना भरती करण्याची गरज भासू शकते. सुरुवातीला एक-दोन दिवस गृहविलगीकरणात राहून स्व-निरीक्षण करून, उपचारांनी बरे वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यांच्या सल्ल्यानेच अ‍ॅडमिट होणे, हितावह आहे.
 
 
लक्षणे आल्यावर कुठल्या दिवशी टेस्ट करायची?
उत्तर : बहुतांश रुग्णांना लक्षणे नसतातच. तोंडाची चव जाणे, नाकाचा गंध जाणे, हलका ताप येणे किंवा कणकण वाटणे, सर्दी-खोकला येणे, पोट मुरडून येणे, हगवण लागणे अशा विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. फुफ्फुसात निमोनिया झाला असेल तर दमदेखील लागू शकतो. लक्षणे आल्यानंतर पाचव्या दिवशी चाचणी केली तर चाचणी सकारात्मक येऊ शकते. त्यापूर्वी केलेली चाचणी नकारात्मक येण्याची शक्यता अधिक असते. मात्र, ज्यांना तीव्र लक्षणे असतील, त्यांनी तातडीने टेस्ट करायला हरकत नाही.
 
 
नेमकी कुठली टेस्ट करायची; आरटीपीसीआर की अ‍ॅन्टिजेन?
उत्तर : आपण अ‍ॅन्टिजेन टेस्ट करू शकता. मात्र, अ‍ॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह असेल तर आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागते. स्वॅब टेस्टसाठी नाक व तोंड दोन्ही जागेतून नमूना घ्यायला हवा. कारण एका ठिकाणाहून स्वॅब घेतला तर सकारात्मक (पॉझिटिव्ह) येण्याची शक्यता 62 टक्के असते आणि दोन्ही ठिकाणांहून स्वॅब घेतला तर सकारात्मक येण्याची शक्यता 80 ते 82 टक्के असते. तरीही पंधरा ते सतरा टक्के लोकांमध्ये सकारात्मक असूनही ही टेस्ट नकारात्मक दर्शविते. त्यास फॉल्स निगेटिव्ह असे म्हणतात.
 
 
टेस्ट सकारात्मक आली की काय करायचे? कुणाचा सल्ला घ्यायचा?
उत्तर : टेस्ट सकारात्मक आली की, डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणे गरजेचे आहे. अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांचा, मित्रांचा अथवा ओळखीच्या लोकांचा सल्ला घेतो. मात्र, तो सल्ला घेणे ग्राह्य नाही. त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचाच सल्ला घेतला पाहिजे.
 
 
एक व्यक्ती कोरोना सकारात्मक आल्यानंतर घरात असलेल्या ज्येष्ठ व अन्य आजारी व्यक्तींचीही तातडीने टेस्ट करायची का?
उत्तर : घरातील एका व्यक्तीची चाचणी (टेस्ट) सकारात्मक आली, तर घरातील सगळ्यांची चाचणी करणे गरजेचे नाही. कोरोनाग्रस्त व्यक्तीचे प्राथमिक कर्तव्य ‘विलगीकरणात जाणे’ हे आहे. घरातील अन्य लोकांपासून दूर राहणे, मुखाच्छादन घालणे, खोकला व शिंका करताना अधिक दक्षता घेणे आणि माझ्यापासून अन्य लोकांना होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरी म्हातारे लोकं असतील आणि चाचणी सकारात्मक येण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात आले असाल आणि त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली असेल, तर टेस्ट करवून घेतलीच पाहिजे.
 
 
सीटी व्हॅल्यूवरून नेमके काय प्रतित होते? एखाद्याची सीटी व्हॅल्यू अधिक आहे तर त्याला कमी धोका आहे का?
उत्तर : आरटीपीसीआर चाचणीत सीटी व्हॅल्यूची नोंद असते. त्यावरून आजाराची तीव्रता कळू शकते. सीटी व्हॅल्यू कमी असेल तर कोविड-19च्या आजाराची तीव्रता अधिक असते आणि सीटी व्हॅल्यू अधिक असेल तर तीव्रता कमी असते. सीटी व्हॅल्यू दहा-पंधरा-वीस पर्यंत असेल तर आजाराची तीव्रता अधिक आहे, असे समजावे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे केवळ मार्गदर्शक तत्त्व म्हणून बघितले गेले पाहिजे. कारण आजार पुढे कसा वाढेल, हे सीटी व्हॅल्यूवरून ठरविणे कठीण आहे.
 
 
डॉक्टर रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात? त्या कुठल्या आणि कुणी व का करायला हव्यात?
उत्तर : आजाराची तीव्रता बघून डॉक्टर काही रक्त चाचण्या सुचवितात. त्यावरून संभाव्य धोका काय असू शकतो, त्याची माहिती मिळू शकते. या चाचण्यांमध्ये सीबीसी, डिफ्रेंशियल काऊंट, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, एलडीएच, फिरॅटिनची पातळीसाठीची चाचणी, सीआरपी चाचणी, डी-डायमर इ. चाचण्यांचा समावेश असतो. सोबत एक्स-रे व सीटी स्कॅन देखील डॉक्टरांद्वारे सुचविण्यात येतात. या चाचण्या करणे अनिवार्य नाही. मात्र, पाच-सहा दिवसांनी जर आजार कमी झाला नाही, तर हे आधीच्या चाचण्या आणि नंतरच्या चाचण्या या दोघांच्या तुलनेवरून निष्कर्षाप्रति पोहचता येते. त्यामुळे चाचण्या करायला हव्यात.
 
 
डॉक्टर कुणाला सीटी स्कॅन करायला लावतात? प्रत्येकाने सीटी स्कॅन केला पाहिजे का?
उत्तर : ज्यांना कुठलाही त्रास नाही, जे लक्षणविरहित आहेत; त्यांनी सीटी- स्कॅन करण्याची गरज नाही. मात्र, खोकला-ताप-दम अथवा अन्य काही लक्षणे दिसत असतील तर एक्स-रे करायला हवा. एक्स-रे मध्ये निमोनियासदृश्य लक्षणे दिसली तर सीटी-स्कॅन करणे योग्य ठरेल.
 
 
कोरोनावर सध्या कुठली औषधे दिली जात आहेत?
उत्तर : कोरोना बरा करण्यासाठी औषध उपलब्ध नाही. तरी लक्षणांच्या अनुषंगाने उपचार केला जातो. ती औषधे कोरोनावर नियंत्रण मिळवितात. जसे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, डॉक्सिसायक्लिन अ‍ॅन्टिबायोटिक्स, आयव्हरमेक्टिन, व्हिटॅमिन सी, झिंक व बी-कॉम्प्लेक्स, ताप असेल तर फॅबी-फ्ल्यूसारखे अ‍ॅन्टिव्हायरल औषध; शिवाय रॅमडेसिव्हरसारखे अ‍ॅन्टिव्हायरल इंजेक्शन देखील दिले जाते. परंतु, ही औषधे आजारावर नियंत्रण मिळविण्यात सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे ही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
 
 
एखाद्याला गृहविलगीकरणात रहावयाचे आहे; तर त्याने काय काळजी घेतली पाहिजे?
उत्तर : गृहविलगीकरणात असला तरी डॉक्टरांच्या संपर्कात रहायला हवे. लक्षणे नसतील तरी देखील विश्रांती घेतली पाहिजे. अधिक पाणी पिणे, प्रोटिनयुक्त आहाराचे सेवन करणे, स्वतःला शांत ठेवणे, वेळेवर औषध घेणे आणि अन्य आजारांवरील औषधेही नियमित घेणे आवश्यक आहे. सोबतच ताप व ऑक्सिमीटरने ऑक्सिजनचे प्रमाण मोजणे आवश्यक आहे.
 
 
किती दिवस विलगीकरणामध्ये राहावयाचे असते?
उत्तर : कोरोनाचे निदान झाल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात राहायला हवे. कारण, चौदा दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर आपल्यापासून संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. अथवा होणार देखील नाही. काही लोकांमध्ये विलगीकरणाचा कालावधी अधिक असू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावेत.
 
 
कोरोनामुळे आणखी काय साईडइफेक्ट होऊ शकतील?
उत्तर : कोरोनामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो. अन्य कुठले आजार असतील जसे मधुमेह, टीबी, कर्करोग, उच्चरक्तदाब इ. तर त्या आजारांची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे या आजारांकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोरोनामुळे आलेला अशक्तपणा कमीत कमी पंधरा दिवस ते महिनाभर अथवा त्याहून अधिक काळ देखील राहू शकतो. कोरोनासाठीच्या औषधांमुळे किंबहुना दुष्परिणाम होऊ शकतील. त्यासंबंधी डॉक्टर योग्य माहिती देतील.
 
 
कोरोना होऊन गेला तर पुन्हा कोरोना होणार का? आणि कोरोना नंतर काय काळजी घेतली पाहिजे?
उत्तर : कोरोना झाल्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता कमी असते. कारण शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झालेली असते. मात्र, आता अशा प्रकारच्या केसेस निघाल्या आहेत की, पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. या तुरळक केसेस आहे. पण घाबरू नका; पुन्हा कोरोना होण्याची शक्यता फार कमी असते. मात्र, मुखाच्छादन (मास्क), सॅनिटायझर आणि भौतिक दूरतेचे नियम पाळायला हवेत. 
डॉ. अशोक अरबट
अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन