मंगरूळ दस्तगीरची मंगला माता देवी

    दिनांक :20-Oct-2020
|
फिरारे 
 
हिंदू धर्मात कोणताही सण हा एकप्रकारे उत्सवच असतो. दोन उत्सव दहा-दहा दिवसांचे रहात असून हे दहाही दिवस अत्यंत आनंदात, श्रद्धेने आणि धार्मिकतेने साजरा करण्यात येतात. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणपती उत्सव. दुसरा म्हणजे श्री दुर्गा नवरात्रोत्सव. या उत्सवात जागरण, गरबा इत्यादी पारंपरिक कार्यक्रमांसोबत इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात. श्री देवीचे रूप अनेक आहेत आणि प्रत्येक देवीचे माहात्म्य वेगवेगळे आहे. काही ठिकाणी तर साक्षात स्वयंभू देवीच अवतीर्ण झाल्याची माहिती आपण ऐकत असतो.
 

f_1  H x W: 0 x  
 
नागपूरपासून जवळपास 200 किमी अंतरावर असलेले अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर हे गाव. या गावात एक स्वयंभू साक्षात देवीचे मंदिर आहे. ही देवी श्री मंगला माता देवी म्हणून श्रद्धाळू-भक्तांंमध्ये ओळखली जाते. योगायोगाने जवळपास दोन वर्षांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगरूळ दस्तगीर येथे जाण्याचा योग आला. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगरूळ दस्तगीर येथे जाण्याचे ठरले त्या कार्यक्रमाचे त्या परिवाराने श्री मंगला माता देवीच्या मंदिरातच आयोजन केले होते. त्यामुळे आमच्या मनात या देवीच्या दर्शनासाठी जी उत्सुकता होती ती त्या परिवाराने आम्हाला सोबत नेऊन पूर्ण केली.
 
मंगरूळ दस्तगीर हे गाव तसे लहानच परंतु, अतिशय सुंदर आणि नेटकं असं वसलेलं आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर एका वेशीवर एक भव्य मंदिर दिसून येते. दुरूनच या मंदिराची भव्यता पाहिली की प्रत्येकाचेच पाऊल या मंदिराच्या दिशेने आपसूकच पडते. या मंदिरात पोहोचलो की त्या ठिकाणी इतके प्रसन्न वाटते की त्यामुळे पाय परत वळवण्याची इच्छाच होत नाही. आजूबाजूचा परिसरही सुंदर आणि नीटनेटका तसेच निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाच हा परिसर सोडून जायची इच्छा होत नाही.
 
श्री मंगला माता देवीच्या इतिहासासंबंधी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. येथील ग्रामस्थ व भक्तांना या देवीबद्दलचा इतिहास फारसा माहीत नाही, असे लक्षात आले. काही भक्तांनी, ही देवी सुमारे 400 वर्षांपूर्वी अवतरलेली असावी, असे सांगितले. देवी भागवतात 90 व्या स्कंदात श्री मंगला माता देवीचा उल्लेख आढळतो, एवढी एकच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, असे सांगण्यात आले. काही भक्तांनी ही देवी भोसलेकालीन असावी, असा अंदाज बांधला. ही देवी स्वयंभू असून फार वर्षांपूर्वी एका झोपडीत असल्याची आणि ती काही जणांना दिसली होती. परंतु, त्याकाळी या देवीकडे दुर्लक्षच झाले.
 
आजूबाजूला बर्‍याच दूरपर्यंत लोकवस्ती नसल्यामुळे ती बराच काळ उपेक्षितच राहिली. ज्यांनी या देवीला पाहिले त्यांनीसुद्धा इतरांना सांगण्याची तसदी न घेतल्यामुळे ती या गावकर्‍यांच्या विस्मरणात गेली असावी. कालांतराने ज्या झोपडीत श्री देवी विराजमान होती ती झोपडीच निघाल्यामुळे या देवीला उघड्यावरच राहण्याची वेळ आली. नंतर या देवीजवळ एक प्रकारे उकिरडाच तयार झाल्यामुळे या देवीकडे दुर्लक्षच झाले.
 
1942 साली रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे या गावाला भेट देण्यासाठी आले असता त्यांना या गावात एक स्वयंभू देवी असल्याचे आणि त्या स्थळाला भेट देण्याचे ठरविले. श्री गुरुजी हे आध्यात्मिक क्षेत्रातीलच महत्त्वाची आणि शक्ती प्राप्त व्यक्ती होती. श्री गुरुजी या परिसरात आल्यानंतर देवीच्या जवळच असलेल्या एका झाडाखाली बसले आणि काही वेळातच ते ध्यानस्थ झाले. या ध्यानातून त्यांना या देवीच्या शक्तीची प्रचीती आली. ध्यानातून उठवल्यानंतर गुरुजींनी, या ठिकाणी असलेली देवी ही साक्षात असून आजपर्यंत ही देवी उपेक्षित कशी राहिली? असा प्रश्न करून, या देवीसाठी मंदिर उभारून विकास व्हायला हवा, अशी इच्छा व अपेक्षा ग्रामस्थांसमोर व्यक्त केली.
 
श्री शिलानंद सरस्वती महाराज हे एक तपस्वी होऊन गेलेत. श्री शिलानंद सरस्वती महाराज हे माहूर येथे राहणारे. जवळपास 12 वर्षे माहूरच्या गडावर तपश्चर्या केली. त्यांची आध्यात्मिक बैठक इतकी जबरदस्त होती की त्यांना हितशत्रूंचा त्रास व्हायला लागला. एक वेळ तर श्री शिलानंद सरस्वती महाराजांच्या काही हितशत्रूंनी त्यांना विष खाऊ घालून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराजांची आध्यात्मिक शक्ती इतकी प्रबळ होती की हितशत्रूंनी त्यांना खाऊ घातलेले विष सहज पचविले. माहूरच्या साक्षात श्री रेणुका देवीनेच हे विष पचविण्याची शक्ती दिली असावी, असे त्यांच्या भक्तांना वाटते.
 
याच काळात श्री शिलानंद सरस्वती महाराजांना श्री रेणुका देवीचेच साक्षात रूप असलेली श्री मंगला माता देवी मंगरूळ दस्तगीर या गावी उपेक्षित असल्याचा साक्षात्कार झाला. श्री शिलानंद सरस्वती महाराज माहूर येथून लगेच सरळ मंगरूळ दस्तगीर येथे आले. जवळपास 25 वर्षे येथे राहिले. या काळात महाराज दरवर्षी श्री देवी भागवताचे आयोजन करीत असत. श्री शिलानंद महाराज या ठिकाणी आल्यापासून या देवीजवळ वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व्हायला लागले. महाराजांनी या ठिकाणी देवीचे नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर श्रद्धेने तसेच पारंपरिक पद्धतीने चालू केले.
 
याच काळात नगर जिल्ह्यातील सोनई येथील श्री हरिहरानंद महाराजरचित पराम्बिका उपासनाचे पारायण तसेच श्री सुक्ताचे 40 आवर्तन दररोज होत असतं. संपूर्ण भारतात या देवीचे भक्त असून त्यापैकी अनेक जण या नवरात्रोत्सवादरम्यान दर्शनाकरिता येत असतात. भाद्रपद द्वादशीला स्वामी श्री शिलानंद सरस्वती महाराज यांचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. तसेच दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला 100 जोडप्यांच्या हस्ते श्री मंगला माता देवीला अभिषेक करण्यात येतो.
 
श्री मंगला माता देवी ही अनेक कुटुंबांची कुलदैवत म्हणून पुजल्या जाते. श्री मंगला माता देवीने गावातील आसपासच्या कुटुंबात साक्षात्काराचा अनुभव दिलेला आहे. देवीचे काही भक्त, श्रद्धाळू यांना कृपाशीर्वाद देऊन प्रचीती आली. त्यापैकी एक म्हणजे या गावापासून जवळच असलेल्या जळगाव या छोट्या गावातील एका लहान मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्याकाळी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे त्या परिवाराने शेजारच्या गावातील डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी मुलाला दाखल करून घेतल्यानंतर अनेक प्रयत्न केले परंतु प्रकृतीत फारसा बदल होत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी घरी घेऊन जाऊन सेवा करावी आणि ईश्वराकडे प्रार्थना करून त्याचे नामस्मरण करावे, असे सांगितले.
 
घरी आणतेवेळी बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यातच देवीचे मंदिर लागत असल्याने तिथे काही वेळ थांबून देवीजवळ प्रार्थना केली. आश्चर्य असे की, जो मुलगा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकही शब्द बोलत नव्हता त्या मुलाच्या मुखातून, आई मला भूक लागली, हा शब्द बाहेर पडताच त्या परिवाराला बरे वाटले. या श्री मंगला माता देवीने आपली प्रार्थना ऐकली आणि या मुलाला व परिवारावर येणार्‍या संकटापासून वाचविले. पहिल्या दिवशी त्या मुलाच्या घरातून देवीला येणारे वस्त्र घालूनच देवीच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात होते.
 
अशाप्रकारे अनेकांना विविध मार्गात, विविध रूपांत या देवीने दर्शन घडविले. प्रचीती घडविली. अशा साक्षात देवीचे मोठे आणि प्रशस्त मंदिर तयार व्हावे, असे ग्रामस्थांचा आणि भक्तांचा विचार सुरू झाला. अनेक भक्तांनी हा विचार उचलून धरला. बांधकामाकरिता मंदिराच्या व्यवस्थापनाजवळ पैसा नव्हता. मंदिराच्या कोषात फक्त 217 रुपये होते. स्वप्न फार मोठे होते. याच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मंदिर व्यवस्थापनाचे मार्गदर्शक रावसाहेब फडणवीस, देशपांडे यांनी हिंमत न हारता, हे ईश्वरी कार्य आहे. हे देवीच्या कृपेने, इच्छेने पैसा आपोआप जमा होऊन मंदिर उभारले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
 
आजच्या मंदिराचे भव्य स्वरूप पाहिले म्हणजे लक्षात येते की त्यांचा विश्वास सार्थकी लागला. या देवीच्या भक्तांना या मंदिराच्या जीजिर्णोद्धारबद्दल जसजसे माहीत होत गेले तसतसे मंदिर व्यवस्थापनाजवळ पैसा येत गेला. या मंदिराचे आजपर्यंत 30 लाखाचे काम पूर्ण झाले आहे. याच परिसरात एक सभागृह तयार करण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या भक्तांंच्या सोयीसाठी अनेक योजना आहेत. त्याही योजना श्री मंगला माता देवीच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होतील, यात शंका नाही.
 
रवींद्र पांडे/9325457052