भगवत् नामस्मरणानेच जिवाची मुक्तता

    दिनांक :03-Oct-2020
|
मोक्षार्थ
 
bhagavat geeta_1 &nb
 
कितीतरी योनीतून जीवाचा प्रवास झाल्यावर मनुष्य जन्म हा मोठ्या कष्टाने पूर्वसंचित कर्मामुळे प्राप्त होतो. हे शास्त्रविधान आहे. वेद, श्रृती, पुराणात हेच सांगितले असल्यामुळे त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. जन्ममरणाचे हे चक्र अविरतपणे चालू असते, परंतु 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म मोठ्या पुण्याईनेच मिळतो.
 
  
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहायऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥
 
भगवत् गीतेत सांख्ययोगात भगवान अर्जुनाला हेच सांगतात.
जन्म आला म्हणजे मरण आहेच आणि मरण आहे तर पुनः जन्म आहे. यात वादच नाही. फक्त मनुष्य जन्मच असा विशेष आहे की, ज्यामध्ये विवेक हा विशेष गुण भगवंतांनी दिला आहे. ज्यायोगे हा विवेकाच्या बळावर आपले परम कल्याण साधू शकतो. इतर प्राण्यांना विवेक नसल्यामुळे त्यांना परम कल्याण साधता येत नाही. समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात...
 
 
पशुदेही नाही गती। ऐसे सर्वत्र बोलती।
म्हणौन नरदेहाची प्राप्ती। परलोकाची॥
 
नरदेहालाच परम गतीची सोय भगवंताने केली आहे.
श्रीमद् भागवतामध्ये कथा येते, राजा परीक्षिताला कळते की सात दिवसात त्याला तक्षक दंश करून त्याचा मृत्यू येणार आहे. तेव्हा त्याला वाटतं की या सात दिवसांत माझा मृत्यू हा मोक्षामध्ये कसा परिवर्तित होईल? मृत्यूला न घाबरता मोक्षपद कसे मिळेल? अंतिम क्षण कसा गोड होईल? म्हणून तो भगवान शुकदेवाकडे जातो. तेव्हा शुकदेव महाराज त्याला सात दिवसांत भागवत कथेचे श्रवण करवतात. त्याला भागवत सांगतात. भगवान शुकदेव राजा परीक्षिताच्या माध्यमातून समस्त मनुष्यांना हा उपदेश सांगतात. ते म्हणतात, मनुष्य जन्माचा श्रेष्ठ लाभ असा आहे की, ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की, मृत्यूसमय भगवंताचेच स्मरण अवश्य व्हायला हवे. खट्वाङग राजालाही कळले होते की, फक्त दोन घटकांनी त्याला मरण येणार आहे, तेव्हा त्याने सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचे अभयपद प्राप्त करून घेतले होते. म्हणून शुकदेव महाराज परीक्षित राजाला सांगतात की, तुझ्याजवळ तर सात दिवस शिल्लक आहेत. पारलौकिक कल्याणासाठी हा कालावधी भरपूर आहे. आपल्याजवळ तर भरपूर वेळ असतो. आपणही भरपूर काही करू शकतो. श्री शुकदेव महाराज सांगतात, मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. वैराग्याच्या शस्त्राने शरीर व त्याच्याशी संबंध असणार्‍या विषयीची ममता नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
 
 
अन्तकाले तु पुरुष आगते गतसाध्वसः।
छिन्द्यादसङशस्त्रेण स्पृहां देहेऽनु ये च तम्॥
 
 
मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करून पवित्र एकांतस्थानी विधिपूर्वक आसन घालून बसावे. नंतर ॐ या एकाक्षर मंत्राचा मनःपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करून प्रणवाचे विस्मरण होऊ नये याची काळजी घ्यावी. बुद्धीच्या साहाय्याने, मनाच्या द्वारा, इंद्रियांना त्याच्या विषयांपासून परावृत्त करावे. कर्मवासनांनी चंचल मनाला भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावण्याचा प्रयत्न करावा.
 
 
स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशाप्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासनारहित झालेल्या मनाला पूर्णरूपाने भगवंतांमध्ये असे तल्लीन करावे की, ते पुनः दुसर्‍या कोणत्याही विषयांचे चिंतन करणार नाही. त्यावेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय्’ मनापासून म्हटल्याने भगवत् प्रेमाच्या आनंदाने भरून जाते, तेच भगवान विष्णूचे परमपद होय. अंतिम क्षणाला भगवंताचेच स्मरण असेल तर यमाचे दूत पळून जातात. त्यांची हिंमत होत नाही. विष्णूंचे दूत त्या सूक्ष्म शरीराला घेऊन जातात. स्थूल देह तर याच पृथ्वीवर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो. ज्या मनुष्याचे चित्त फक्त स्वतःच्या जीवनातील वासनेतच गुरफटलेले असते. त्याला हे सगळं कसं शक्य होईल? त्याचे मन संसारातील बायका-पोरांतच गुंतलेले असते. माझे घर; माझा संसार, यातच वासना असतात. तेव्हा यमाचे दोन दूत येऊन त्या लिंगदेहाला घेऊन जातात. पुढे नरकयातनेतून त्या जीवाला मोठ्या कष्टातून जावे लागते. याचे संपूर्ण वर्णन श्रीमद् भागवतामध्ये बरेचदा आले आहे.
 
 
याठिकाणी सर्वसाधारण व्यक्ती संशय उत्पन्न करेल की, मरणासन्न मनुष्याला हे जमणार नाही. तो व्याधीने जर्जर झाल्यावर त्याला प्रणवाचा जप व भगवंताचे ध्यान कसे शक्य आहे? बरोबर आहे. पण, आपण सर्वसाधारण मनुष्य सकाळच्या वेळी योगासन, प्राणायाम तर करतोच. आता कोरोनामध्ये प्राणवायूचा स्तर राखण्याच्या हेतूने बरेच लोक अनुलोम-विलोम, कपालभातीसारख्या शुद्धीक्रिया करतात. जे नियमित योगासन-प्राणायाम करतात त्यांची प्रतिकारशक्ती दांडगी असते. ते नियमांचे पालन करतात. ते कोरोनापासून मुक्त असतात. दररोज योगासन-प्राणायाम करणारे पुढे एक पाऊल पुढे जाऊन ध्यानधारणेकडे जातात. त्यांना हळूहळू ध्यानातून भगवत् स्मरणाचा अभ्यास होतो. ही क्रिया एकदम शक्य नाही. राजा परीक्षित किंवा खट्वाङग राजाशी आपण बरोबरी करू शकत नाही. परंतु, त्यांच्यामुळे आपल्याला जो मार्ग प्राप्त झाला आहे, त्या मार्गातून हळूहळू साधना करून घेऊ शकतो. आपली सकारात्मकता आणि निरंतरता नक्की लाभ देईल. यात शंका नाही. या साधनेचा अभ्यास करण्याचा मी पण प्रयत्न करतो आहे. यात नुकसान नाहीच. भागवताचे पठण करता करता, या मुद्यावर लक्ष केंद्रित झाले. इतरांना याचा लाभ व्हावा हा विचार मनात आला. शेवटचा क्षण प्रत्येकाचा गोड व्हावा. जीव देह सोडून जाताना त्याला पुढे उत्तम गती प्राप्त व्हावी. जीवाच्या परम कल्याणासाठीच हा नरदेह प्राप्त झाला. त्याचे सार्थक व्हावे. म्हणून हे लेखन करण्याची बुद्धी भगवंतांनीच दिली, असे म्हणायला हरकत नाही. 
 
नरेश काशिनाथ पांडे/8007392888