कोराडीची महालक्ष्मी जगदंबा...

    दिनांक :06-Oct-2020
|
फिरारे
 -माला पारिसे
सर्व मंगल मांगल्य । शिवे सर्वार्थ साधिके ॥
शरण्ये त्र्यंबके गौरी । नारायणी नमोस्तुते ॥
 
विदर्भातील कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा. एकूण बावन्न शक्तिपीठांपैकी एक असलेले कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर नागपूरपासून पंधरा किमी दूर अंतरावर उत्तरेला तलावाच्या काठावर वसलेले आहे. एकूण सातशे वर्षे पुरातन हे मंदिर आहे. मातेची मूर्ती स्वयंभू असून जागृत आहे. अश्विन नवरात्रात फार मोठी यात्रा येथे भरते. कोराडीमध्ये अगदी मंदिराच्या शेजारीच औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. विद्युत केंद्र पंधराशे एकर जागेवर असून येथे विस्तीर्ण जलाशय आहे.
 
bg_1  H x W: 0
 
तलावाच्या काठाने जाताना जांभळी-गुलाबी रंगाची कमळफुले तलावाची शोभा वाढविताना दिसतात. मंदिराच्या मागच्या बाजूस गोमुख आहे. त्यालाच गुप्तगंगा म्हणतात. तिथून वाहणारी शीतल जलधारा कुठून येते ते कळत नाही. कोलार नदी कोराडीपासून जवळ आहे. तसेच जवळच सुरादेवी येथे राणा माता मंदिर तीन किमी अंतरावर आहे. सर्व दिवस भाविकांची सतत वर्दळ असते. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक महामंडळातर्फे या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून 25 जून 2007 ला दर्जा देण्यात आला. आजही कोराडी परिसरात रांगोळीचे दगड मिळतात. येथील रांगोळीला सर्वत्र मोठी मागणी आहे. नवरात्रीच्या काळातही रांगोळीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय येथे होतो.
 
येथे देवीची तीन रूपे पाहायला मिळतात. सूर्याच्या बदलत्या तेजाप्रमाणे मातेचे रूप बदलत जाते. सकाळी माता बालरूप तिच्या मुखमंडलावर साकारते, तर दुपारला ती युवती दिसते. सूर्यास्तानंतर तिचे जर्जर वृद्ध रूप पाहायला मिळते. एका हातात तलवार, दुसर्‍या हातात डमरू, तिसर्‍या हातात त्रिशूल तर चौथ्या हातात धनुष्य धारण केलेली माता अतिशय सुंदर दिसते. तिचे टपोरे डोळे, नाकातील मोठा मुखडा, पायातील तोडे, मोठमोठे कानातले, गळ्यातील विविध आभुषणे, अशाप्रकारे अलंकृत झालेली मातेची मूर्ती विलोभनीय दिसते.
 
पाच एकरात पसरलेल्या पुरातन मंदिराचे बांधकाम हे प्राचीन असल्याचे लक्षात यायचे. कोरीव खांब़ाचे नक्षीकाम तसेच वापरण्यात आलेला दगड हेमाडपंथी बांधकामाची आठवण करून द्यायचे. राजवट बदलत गेली. मंदिरामध्ये सतत बदल होत गेले. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 2016 मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नातून 250 कोटी रुपयांची योजना जीर्णोद्धारासाठी मान्य करून घेतली. 2017 पासून मंदिराचे काम सुरू झाले आहे. 250 किलो चांदी तसेच 50 किलो सोने वापरून जगदंबा मातेचे गर्भगृह मढविण्यात आले आहे. सभामंडप अलंकृत करण्यात आलेले आहे.
 
अशा या सातशे वर्षे पुरातन मंदिरात दरवर्षी नवरात्रामध्ये 12000 अखंड ज्योती नऊ दिवस लावल्या जायच्या; पण वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याऐवजी एकच अखंड ज्योत 2019 पासून लावण्यात येते. तसेच गेल्या 200 वर्षांपासून चालू असणारी पशुबळीची परंपराही बंद करण्यात आलेली आहे.
 
महालक्ष्मी जगदंबा ही नावाप्रमाणेच जगदंब स्वरूपातील महाक्ष्मी आहे. मातेचा एक प्राचीन इतिहास असल्याचे लक्षात येते.
कोराडीला प्राचीन काळी जाखापूर नावाने ओळखले जात होते. तेव्हा जाखापूर झुलन राजाच्या नियंत्रणात होते. झुलन राजाला सात मुले होती. जानोबा, नानोबा, बानोबा, खैरोबा, बैरोबा, अँग्रोबा, दत्तासुर. राजाला कन्यारत्न नसल्यामुळे राजा नाखूष होता. कन्याप्राप्तीसाठी राजाने खूप जप, तप, हवन, यज्ञ केले आणि देवतांना खूष करून कन्याप्राप्तीचे वरदान प्राप्त केले. झुलन राजा आणि त्याची राणी गंगासागर यांना मुलगी झाली.
 
जी अतिशय सुंदर. तिचे मुखमंडल नववधूसारखे आकर्षक, डोळे चकाकणारे, भयंकर तेज, अलौकिक माथा, आकर्षक चेहरा, आकर्षक कान, मोठे डोके. अद्भुत आकर्षक हास्य असणारी कन्या पाहून राजाला वाटले ही देवी आहे किंवा दैवीशक्ती आहे. अद्भुत सौंदर्य, तेजोवलय जणू देवीने रूप बदलून मुलगी झाली असावी, असे वाटले. शहरात सर्वत्र आनंदिआनंद पसरला होता. चंद्राची कला जशी वाढते तशीच ही कन्या वाढत होती. तिच्या दैवी सौंदर्याची चर्चा संपूर्ण महालामध्ये होत होती. राज्यात सर्वत्र सुख नांदत होते. सर्व नागरिक खूष होते.
 
राजाच्या नगरासमोर किराड राज्य होते. किराड राजाची मुलगी आपल्या मैत्रिणीच्या साहाय्याने काही सेना घेऊन जंगलात गेली. झुलन राजाच्या सैनिकांनी अनोख्या लोकांना बघितले आणि त्यांना दरबारात पेश केले. त्या वेळी राजाची मुलगी जेकुमई दरबारामध्ये हजर होती. झुलन राजाने तिचा सल्ला घेतला आणि सगळ्यांना सन्मानपूर्वक परत पाठविले. किराड राजाची मुलगी हे सगळं पाहात होती. तिने आपल्या पित्याला झुलन राजाच्या मुलीच्या म्हणजेच जेकुमईच्या सौंदर्याविषयी सांगितले तेव्हा किराड राजाला आपल्या मुलासाठी तिचा हात मागण्याचा विचार आला.
 
त्यामुळे त्याने आपला निरोप झुलन राजाला पाठविला; पण झुलन राजाने स्पष्ट नकार कळविला. त्यामुळे किराड राजा दुखावला गेला आणि त्याने युद्धाचा प्रस्ताव पाठवला. या राजाने झुलन राजाला सांगितले की, एकतर आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा युद्धाला सज्ज व्हा. त्या वेळी राजसभेत राजकुमारी जेकुमई उपस्थित होती. प्रस्ताव ऐकून जेकुमईने देवदूताला सांगितले की, कोराडी आणि सुरदेवई युद्धासाठी तयार आहेत. सुरदेवई म्हणजेच आताचे सुरादेवी. त्या वेळी राजा झुलन आपल्या मुलीकडे पाहातच राहिला.
 
राजाने संदेश दिला की, माझी मुलगी ही फक्त मुलगी नसून माझं भाग्य आहे. त्यानंतर दोन्ही बाजूचे राजा आपापल्या सैनिक तसेच सामर्थ्यासह सज्ज झाले. त्यामध्ये राजा किराडला झुलन राजाने पराभूत केले. त्याच्याकडून कबूल करून घेतले की, तो प्रजेवर अत्याचार करणार नाही. राजा आपल्या नगरात वापस गेला. माँ जेकुमई दिव्य होती. त्यानंतर माता बाहेर आली. जिथे जाखापूर स्थित आहे ते शक्तिपीठ एकमात्र स्थान. त्यानंतर मातेचा भाऊ दत्तासुर मातेच्या दर्शनासाठी निघाला. वाटेत सूर्यास्त झाला आणि तो तिथेच स्थिर झाला.
 
आज हे क्षेत्र दत्तासुर टेकडीच्या नावाने ओळखले जाते. मातेचे तीन बंधू आईसोबत तिच्या शेजारी बसले आणि तेही मूर्ती झाले. ते स्थान म्हणजेच जाखपूर. अशाप्रकारे देवीविषयी पौराणिक कहाणी ऐकायला मिळते.
एका दंतकथेप्रमाणे, सुरादेवीची राणामाता आणि जगदंबा महालक्ष्मी माता या बहिणी आहेत. झोपल्या असताना लहान बहीण समोर निघते आणि ती कोराडी येथे मूर्ती बनते. ती न दिसल्यामुळे तिची मोठी बहीण तिच्या मागोमाग निघते, तर मोठी बहीण सुरादेवी येथेच मूर्ती बनते.
 
याशिवाय इतरही अनेक कथा ऐकायला मिळू शकतात. 
- 8275794048