सायकलरिक्षा ओढण्याचे बळ उरले नाही

    दिनांक :18-Nov-2020
|
शैलेश भोयर
नागपूर,
कधी काळी तीन चाकी सायकल रिक्षा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे साधन होती. आज तो रिक्षा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोजक्या लोकांकडे असला तरी त्यात बसून प्रवास करण्याची प्रवाशांना लाज वाटते. त्यामुळे प्रवासी मिळणेच कठीण झाले असून, रिक्षा चालकात प्रवाशांना ओढण्याचे बळही उरलेले नाही. जगणे आणि कुटुंबाला जगविण्यासाठी ते रिक्षा पायदळ पायदळ ओढताना दिसतात; पण औषधालाही प्रवासी मिळत नसल्याने आर्थिक मदतीसाठी त्यांच्यावर लोकांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. त्यांना भिकारी म्हणता येणार नाही, तथापि काळ आणि वेळ कधी काय करून घेईल, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
 
 
riksha_1  H x W
 
जीवनाच्या रहाटगाडग्यात सुख आणि दुःख ही काळाची दोन रूपे आहेत. सुखाची वेळ कधी निघून जाते कळत नाही अन् दुःखाची वेळ जाता जात नाही. आज त्यांचा दुःखाचा काळ आहे. कधीकाळी त्यांच्या पंखात बळ होते. भाकरीच्या शोधात त्यांनी घर सोडले होते. सारी शक्ती एकवटून बळ साठविले होते. परंतु एक वादळ आले अन् जीवनाचे चक्रच बदलले. जगण्यासाठी पद्धतीही बदलली. काळाशी दोन हात करताना काहींच्या शरीरातील बळच निघून गेल्याने त्यातील काही भीक मागताना दिसत आहेत.
 
 
 
८० च्या दशकात घरोघरी भीक मागायला जाणाèयांची संख्या मोठी होती. काळानुसार जीवनमान बदलले आणि घरी येणाèया भिकाèयांनी रस्त्यावर जागा मिळविली. म्हणजे वस्तीतील भिकारी आता चौकाचौकात एकत्र आले. आता भिकाèयांना भाजी पोळी नको तर सोबतीला पैसे हवेत. सारेच भिकारी असे नाहीत. भिकारी म्हणजे दुसèयांच्या दयेवर जगणारे. परंतु आता भीक मागणारे सारेच मुळात भिकारी नाहीत. तेही कधीकाळी चांगल्या घरचे होते. त्यांचेही कुटुंब, नातेवाईक, मुले-बाळे आहेत. काळ आणि वेळ त्यांच्यासाठी मारक ठरला आणि ते रस्त्यावर आले. त्यांची रक्ताची नाती अस्तित्वात असली तरी त्यांना रस्त्यावरचे जीवन जगावे लागत आहे.
 
 
 
आता शहरातील रस्त्यावर चौकाचौकात भीक मागण्याची पद्धत उपराजधानीत आहे. अपंगाचे सोंग घेऊन चौकात भिक मागणाèयांची जमात साèयांनाच ठावूक आहे. त्याचप्रमाणे वाहतूक सिग्नलवर चारचाकी थांबताच कारच्या काचा साफ करणारे अलिकडे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यात लहान मुलांचा समावेश असतो. आता तर पंक्चर सायकल आणि पायी चालत जाऊन एखाद्या चौकात थांबणे आणि रस्त्याने जाताना सायकल पंक्चर झाली. दोन्ही चाकं पंक्चर आहेत. जवळ पैसे नाहीत. अंधार पडायला लागला आहे. पंक्चर दुरुस्तीसाठी २० रुपये द्या अशी विनंतीवजा भीक मागणाèयांची संख्या वाढत आहे. अनेकांना असे चेहरे चौकात दिसले असतील.
 
 
 
दुसरे म्हणजे कुटुंबासह गावाला जाणारे. आमची पर्स चोरीला गेली. रात्र झाली. घरी कसे जायचे? जवळ पैसे नाही. लहान लहान मुले आहेत. पत्नी आहे. रात्र कुठे घालवायची? पोटात अन्नाचा कण नाही, मदत करा, अशी काळानुरूप बदललेली पद्धतही रूढ होत चालली आहे. त्याचप्रमाणे पती-पत्नी सोबत निघतात. वृद्ध पती अर्धांगवायुने ग्रस्त. त्याला धड चालताही येत नाही. त्याला घेवून पत्नी रस्त्याने जाते आणि रुग्णालयात जायचे म्हणून भीक मागते. काळ आणि वेळ बदलला तशी भीक मागण्याची पद्धतही बदलली. हे सगळे जगण्यासाठीच.
 
रक्ताचे नाते असूनही तो रस्त्यावर
पत्नी, मुले आणि कुटुंब असले तरी आज तो रस्त्यावर आहे. कधी काळी इतरांप्रमाणे तोही कुटुंबासह आनंदी होता. काळाने सर्वकाही हिरावून घेतले आणि आत्ता तो याच शहरातील रस्त्यावर भीक मागतोय्. बाहेरगावचे काही वृद्ध शहरात वास्तव्यास आहेत. दिवसभर भीक मागतात. महिन्याकाठी गावाला जातात आणि कुटुंबाला पैसा पुरवतात.