पॅरिस कराराबाबत बायडेनमुळे नव्या आशा

    दिनांक :20-Nov-2020
|
- जागतिक हवामानासंबंधी उद्देश पूर्ण होणार
बर्लिन, 
अमेरिकाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पॅरिस करारासंबंधी अनुकूलता दाखवल्यामुळे महत्त्वाकांक्षी उद्देश पूर्ण होण्याच्या आशा वाढल्या आहेत, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक विभागाच्या प्रमुख पॅट्रिसिया एस्पिनोसा यांनी केले आहे.
 
 
biden jo_1  H x
 
पाच वर्षांपूर्वी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अंमलात आलेल्या करारानुसार चालू शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानावाढीला 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक न होऊ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञांनुसार, हे लक्ष्य प्राप्त करण्याचे जगाचे प्रयत्न बरेच मागे आहेत. विशेष म्हणजे तापमानात यापूर्वीच एक अंशाची वाढ झाली असल्याने पुढील 30 वर्षांपर्यंत यशस्वी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे.
 
 
अशातच ज्यो बायडेन यांनी आपल्या वक्तव्यातून नव्या आशा निर्माण केल्या आहेत. विशेष म्हणजे चीननेही सन 2060 पर्यंत टप्प्याटप्प्याने विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय जपान आणि दक्षिण कोरियानेही 10 वर्षांपूर्वी यासंबंधी घोषणा केल्याचे पॅट्रिसिया एस्पिनोसा यांनी नमूद केले.
 
 
त्या म्हणाल्या की, सध्या कोरोना विषाणू महामारीच्या दिवसांत ज्यो बायडेन यांनी सकारात्मक भूमिका घेणे हे निश्चितच एक असाधारण पाऊल आहे. काही महिन्यांपूर्वी असे कुणालाही जाणवले नसेल की अमेरिकाच्या वतीने असा विश्वास दिला जाईल. दरम्यान, या देशाचेच विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी पॅरिस करारापासून अमेरिकाला दूर करण्याची घोषणा केली होती, तर मागील 4 नोव्हेंबरला हा देश अधिकृत रीत्या त्यापासून वेगळा झाला आहे.