मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार

    दिनांक :21-Nov-2020
|
तभा वृत्तसेवा
मुंबई,
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस सर्व २२७ जागांवर लढेल, असे सूचक वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केले आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच घेईल. त्यांनी आदेश दिले तर २२७ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे गायकवाड म्हणाले.
 
 
congress_1  H x
 
२०२२ मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपाने, आपण निवडणूक स्वबळावर लढण्याच्या केलेल्या घोषणेनंतर आता काँग्रेसने देखील तोच सूर आळवला आहे. यात सावधता बाळगताना, आमची अद्याप घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसशी चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीचे एकत्र जमले नाही, तर काँग्रेस एकटी लढेल, अशी भूमिका गायकवाड यांनी मांडली.
 
 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर भाजपाचा झेंडा फडकविण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेसह अन्य पक्ष सुद्धा खडबडून जागे झाल्याचे यानिमित्याने दिसत आहे. गायकवाड यांनी काँग्रेसच्या मांडलेल्या स्वबळावरच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली असून, यात ऐन वेळेवर बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.