परतवाड्याच्या कोविड केंद्रावर शिक्षकांची गर्दी

    दिनांक :21-Nov-2020
|
- 7 शिक्षकांचा कोरोना अहवाल सकारात्मक
- 290 शिक्षकांची कोरोना चाचणी
तभा वृत्तसेवा
पथ्रोट,
राज्यातील शाळांच्या वर्ग 9 ते 12 ची घंटा 23 नोव्हेंबरला वाजणार असल्याचे निश्चित झाले. सुरु होणार्‍या शाळा कोविड 19 चे नियम पाळूनच उघडणार असल्याने प्रथम शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक झाल्याने जिल्हाभरात शिक्षकांची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी परतवाड्याच्या कुटीर रुग्णालय कोविड केंद्रावर अचलपूर तालुक्यातील शिक्षकांची मोठी गर्दी फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडवताना दिसून आली. वृत्त लिहेपर्यंत 290 शिक्षकांची कोरोना तपासणी झाली होती. त्यातून 7 जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. भौतिक दुरावा राखण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. वारंवार सूचना देऊनही सौजन्य न दाखवल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.
 
 
teacher_1  H x
 
प्रशासन वांरवार सुरक्षितता, काळजी घेण्याचे आवाहन करत असूनही नियम पाळण्याचे सौजन्य न दाखवल्याने देशाच्या भावी आधारस्तंभ, नागरिक असलेल्या विद्यार्थ्यापुढे काय ज्ञानाचे दिवे उजळवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीत कागदावर नावालाच सहभागी असलेला शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांची काय काळजी घेणार हेही तपासणी केंद्रावर दाखवलेल्या कृतीने उघड झाले. प्रत्यक्ष शिक्षकच कोरोना महामारीस प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवत असतील तर आमचे पाल्य कुणाचा आदर्श समोर ठेवतील, अशी शंका एका शिक्षक पालकाने व्यक्त केली. वरिष्ठ शिक्षण अधिकारी काय भूमिका घेतील अशी पालकांनी विचारणा केली.
 
 
 
परतवाडा कुटीर रुग्णालयाच्या कोविड केंद्रावर एकच तपासणी पथक असल्याने शिक्षकांची तपासणीकरिता झुंबड उडाली. गटशिक्षणाधिकार्‍यांनी गाव वा शाळानिहाय शिक्षकांच्या अँटीजन तपासणीचा निश्चित दिवस ठरवायला पाहिजे होता, असे एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अचलपूर तालुक्यातील दुपारपर्यंत 290 शिक्षकांची अँटीजन तपासणी झाली असता 7 शिक्षकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून तपासणी सुरु असल्याची माहिती तपासणी पथक प्रमुख शभा खान यांनी दिली. सातपैकी सहा शिक्षक एकाच शाळेतील असून त्यात सर्वाधिक महिला आहे. अंजनगाव येथील कोविड केंद्रावर घेतलेल्या शुक्रवार व शनिवारच्या तपासणीत 437 शिक्षकाचे घशातील स्वॅबचे नमुने तर 144 शिक्षकांची अँटीजन तपासणी केली असता 2 अहवाल सकारात्मक असल्याची माहिती ता. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे यानी दिली.
 
 
पोलिसांना बोलवावे लागले
याबाबत बोलताना कुटीर रुग्णालयातील कोविड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिराज अली म्हणाले की, कोरोना चाचणी केंद्रावर तपासणीकरिता आलेल्या शिक्षकांना भौतिक दुरावा राखण्याचे आवाहन वारंवार करुनही न ऐकल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.