जावरा परिसरात दोन वाघांचा मुक्त संचार

    दिनांक :21-Nov-2020
|
- महसूल विभागाची माहिती
- सतर्क राहण्याचे आवाहन
तभा वृत्तसेवा
तिवसा,
दोन वर्षांपूर्वी तिवसा तालुक्यात एका वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. ती भीती अद्यापही नागरिकांमधून गेली नसून त्यानंतर आता पुन्हा तालुक्यातील जावरा परिसरात दोन वाघांचे दर्शन झाल्याचा व त्यापासून नागरिकांनी सतर्क राहण्याचा एक संदेश महसूल विभागाने सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे .मात्र या पथकाला आढळून आलेले ते वाघ आहेत की बिबटे, याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसून अनेक चर्चेला तालुक्यात उधाण आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
tig_1  H x W: 0
 
तिवसा तालुक्यातील जावरा ते वरुडा भाग हा जंगल क्षेत्रात येतो. या भागात बिबट, रोही, तडस आदी वन्य प्राणी अनेकदा या भागातील नागरिकांना आढळून आले, मात्र या भागात शुक्रवारी रात्री 12 वाजताचे सुमारास अवैध रेतीची वाहतूक करणार्‍यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने गेलेले महसूल विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय पंधरे व चालक किशोर राठोड यांना जावरा ते वरुडा रस्त्यावर दोन वाघ दिसून आल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली असून याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार वैभव फरतारे यांनी सोशल मीडियावरील संदेशातून केले आहे.
 
 
महसूल विभागाच्या पथकाला हे दोनही वाघ रस्त्याच्या कडेला आढळून आले असता त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. क्षणात काय करायचे, काही सुचेनासे झाले. शासकीय वाहनातून महसूल विभागाच्या पथकास गाडीतून वाघांचे दर्शन होताच त्यांनी त्यांच्यावर गाडीचा लाईट भिरकावताच सदर दोन्ही वाघांनी तेथून पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास महसूल पथकाला आढळून आलेले दोन प्राणी वाघ की बिबट, याबाबत चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. मात्र त्याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसून ज्या भागात मुक्त संचार आढळून आला त्या भागात वरुडा, जावरा, दापोरी, करजगाव, सातारगाव, फत्तेपूर, सारसी अशी 8 ते 10 गावे आहेत. या गावातील शेतशिवारात अनेक शेतकर्‍यांची शेती आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकरी गहू, हरभरा पेरणीसाठी शेतात रात्रीला ओलित करण्यासाठी जातात, तर अनेक शेतमजूर हे शेतातच सोकारी करण्यासाठी मुक्कामी असतात. अश्यातच या परिसरातील शेतकरी, मजूर व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महसूल तसेच वनविभागाने केले आहे.