माजी आमदाराच्या कारस्थानाला उच्च न्यायालयाने दिली चपराक : भय्यासाहेब काळे

    दिनांक :21-Nov-2020
|
तभा वृत्तसेवा
आर्वी,
काँग्रेसचे माजी आ. अमर काळे यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याचा फायदा घेत केलेल्या नियमबाह्य कारवाईचा प्रयत्न केला. माजी आमदारांनी कटकारस्थान करू नये असा इशाराच कृ. उ. बा. स. आर्वीचे सभापती भय्यासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेतून दिला. 9 ऑक्टोबर 2015 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे मार्फत सभापती म्हणून पदभार स्वीकारला. त्यानुसार 8 ऑक्टोबर 2020 रोजी संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्या अनुषंगाने 2 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जिल्हाधिकारी वर्धा व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा यांचेकडे मुदतीत निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
 
 
kale_1  H x W:
 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने 10 जुलैच्या शासन आदेशानुसार महाराष्ट्रातील मुदत पूर्ण झालेल्या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने 8 ऑक्टोबर 2020 च्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बाजार समिती संचालक मंडळाला मुदत वाढ मिळण्यास विनंती प्रस्ताव सादर केला होता. त्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा यांनी बाजार समिती निवडणुकीला 6 महिने मुदतवाढ दिली होती. परंतु, कोणतीही पुर्व सुचना न देता 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी स्वतः कार्यालयात येऊन बाजार समितीचे प्रभारी सचिव यांना मी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारत असल्याबाबतचे सांगितले. या प्रकारामुळे संचालक मंडळाला आश्चर्याचा धक्का बसला. आदेश नियमबाह्य असल्याने बाजार समितीचे संचालक संदीप काळे यांनी प्रशासकीय आदेशासंबंधात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्याकडे दाद मागितली. त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी प्रशासकीय आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सर्व संचालकांनी पुन्हा पदभार स्विकारला आहे.
 
 
 
 
भय्यासाहेब काळे म्हणाले की, वर्षानुवर्षे बाजार समिती माझ्या गटाच्या पारदर्शक कारभारामुळे ताब्यात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा गटावर विश्वास आहे. बाजार समितीचा कारभार चालवत असताना संस्था कर्जात जाऊ दिली नाही. बाजार समिती पुर्ववत कार्यरत झाल्याचे संपूर्ण श्रेय संदिप काळे यांचे आहे. प्रकृतीच्या कारणानं यापुढे स्वतः निवडणूक लढविणार नाही. परंतु, पॅनल लढविणारच. बाजार समितीचे संचालक संदिप काळे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत केल्याने सुडबुद्धीने पेटून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी त्यांचे सरकार असल्याचा नियमबाह्य गैरफायदा घेत सेलू, वर्धा, देवळी पुलगाव बाजार समितीची मुदत संपली असताना त्यांच्यावर काहीही कारवाई न करता फक्त आर्वी, आष्टी व कारंजा बाजार समितीवर अन्यायकारक संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश थोपवल्याचा आरोप संदीप काळे यांनी केला. विकासाचा समर्थक आहे.
 
 
 
मतदान कोणाला करायचे हा भारताच्या संविधानाने दिलेला माझा अधिकार आहे. त्यामुळे निष्कामी उमेदवारला मतदान करण्यापेक्षा जो जनहीतार्थ विकासाची कामे करीत विधानसभेचा सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने काम करत आहे त्यांना मी मतदान केले. दुसर्‍यांच्या कामात लुडबुड करण्यापेक्षा माजी आमदारचे सरकार असल्याचा फायदा घेत प्रगतीची लोकहीताची कामे करावी असा टोला त्यांनी लगावला. माझ्या निर्णयावर ठाम असून सहकार क्षेत्रात राजकारण आणू नका. बाजार समितीच्या तथा शेतकरी हिताच्या योजना राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची साथ हवी. समाजकारण जास्त करा आणि जनतेला त्रास होईल या दृष्टीने सुरू असलेले राजकारण कमी करा असा सल्ला संदीप काळे यांनी दिला.