भारत माझं घर, गुंफण बंधुत्वाची!

    दिनांक :21-Nov-2020
|
ईशान्य वार्ता
- सुनील किटकरू
आमच्या ऐन उमेदीच्या काळात संघ शाखेतील कबड्डी स्पर्धा, एकत्रीकरण, सहल, शिबिराने तेव्हाचे वातावरण भारून गेले होते. या मंतरलेल्या काळात मग देशासाठी काही केले पाहिजे, आपले हिंदुराष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी मनामनांत राष्ट्रज्योत पेटविण्यासाठी अनेकांनी प्रचारकाचा मार्ग पत्करला. त्यात उल्हास औरंगाबादकर, जोशीबंधू (शैलेश, गिरीश, मंगेश), वैद्यकीय सेवेत जयंत देवपुजारी, धनंजय सगदेव, आसामात सुनील कुलकर्णी, तर थोडे आधीच नंदू जोशी, रमेश शिलेदार तिथे गेले होते. रवी अय्यर विदेश विभागात गेले, तर रामनगरचा समीर क्षीरसागर केनियात गेला. आजचे अखिल भारतीय अधिकारी सुनील देशपांडे, रवींद्र भुसारी, तर विवेकानंद केंद्राचे आजीवन कार्यास प्रवीण दाभोळकरांनी वाहून घेतले. गोपाल रत्नमजी तामिळनाडूला गेले. संजय जोशी भाजपात गुजरातला गेले, तर शशी जोशी, रवी संगीतराव, चंदू हलकंदर प्रचारकासमान कार्य करीत आहेत. त्या काळातच दक्षिण, उत्तर, पूर्व बंगाली, तामिळ सर्व भाषक स्वयंसेवक शाखेत येत. भारताला आपले घर समजून सर्वांनी स्वत:चे राहते घर सोडले होते.
 

18no-kitkaru-lekh-photo_1 
 
सर्व स्वयंसेवक एकमेकांच्या घरी जात, जातिपातीचा लवलेशही नव्हता. एकमेकांच्या अडीअडचणीस धावून येत. मध्यमवर्गीय घरातील श्याम पत्तरकिने, मिलिंद शिरपूरकरसारखी मुलं सदर, उत्तर नागपुरात प्रचारक, विस्तारक म्हणून जायला लागली. श्रीकांत चितळे, अविनाश संगवई, रवी कासखेडीकर, रवी जोशी आम्हा सर्वांना सांभाळून घेत. आमच्या नगरातच विनायकराव फाटक, विलासजी फडणवीस, श्रीरामजी जोशी राहात असल्याने त्यांचा एक प्रभाव होता. संघ शाखेच्या स्वाभाविक अभिसरणाने एकात्म भाव असलेली एक पिढी घडली. देवेंद्र फडणवीस, संजय बंगाले, भाजपाचे धरमपेठचे दोन माजी प्रचारक गोविंदराव आठवले, मनोहरराव आठल्ये शाखेत येत. सेवा वस्त्यांमध्ये कार्य केल्याने कदाचित मला अरुणाचलात पाठविले. ती माझी रंगीत तालीमच होती. तेथील वस्त्यांत डाव (तलवार) घेऊन फिरणारी माणसं, तेथील अस्वच्छ वस्त्या, मांसाहार, आठवडा आठवडा स्नान न करणारी मंडळी, अत्यंत रागीट व तेवढीच प्रेमळ व येस किंवा नोमध्येच संवाद करणारा निशी जनजाती समाज होता.
 
 
संघशाखा, सेवाकार्य विस्तार होत असतानाच मूलश्रद्धा पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री गेगांग अपांग यांच्या निवासस्थानी तांब्याचे सूर्यचंद्राचे लॉकेटचे विमोचन झाले. अपांग यांना महाराष्ट्रीयन लोकांबद्दल मोठा आदर होता. ते म्हणत, ‘‘ये मर्‍हाटे है शिवाजी के वंशज, कही भी रहेंगे, देश के लिये मर जायेंगे पर झुकेंगे नही.’’ स्थानिक लोकांची मागणी असल्याने गावात आबोतानी विद्या निकेतन नावाची विद्या भारतीची शाळा सुरू झाली. आबोतानी म्हणजे या जनजातींचा मूळपुरुष उद्रघारनास. पाठीवर मूल वाहून नेत रामकृष्ण मिशनमध्ये शिक्षक राहिलेले शंतनू शेेंडे जे पुढे विद्याभारतीचे मंत्री झाले तसेच नावाप्रमाणेच व्यक्तिमत्त्व असलेले कृष्णचंद्र गांधी उपस्थित होते. ठाकूर रामसिंहजींचे इटानगर डिग्री कॉलेजात व्याख्यान ठेवले होते. ते खूप गाजले. विषय राममंदिर होता. अडीच तास प्रश्नोत्तरांसह रामसिंहजी वृद्धावस्थेतही बोलत राहिले. त्यांच्या प्रभावाने इतिहास संकलन समितीचे कार्य करण्यास मोईबांग बेगी, पुरा तादो सर पुढे आले. संघटन मंत्री विनायकजी कानिटकरदेखील होते. विश्व हिंदू परिषदेच्या गुवाहाटी येथील धर्मसंमेलनास अरुणाचलचे चार पुजारी घेऊन गेलो. शेवटची सीट मिळाल्याने सतत उडत होते, हसत होते. सकाळी गुवाहाटीत उतरल्यावर त्यांची आगळीवेगळी वेशभूषा पाहून शेकडो लोक त्यांना पाहण्यास, फोटो काढण्यास गर्दी करीत. कसेबसे निसटून आम्ही संमेलनस्थळी पोहोचलो. पुजार्‍यांच्या तडाखेबाज भाषणांनी सभा गाजली. अरुणाचलात पुजार्‍यांच्या माध्यमातून विहिंपचे कार्य सुरू झाले. पुजारी जर धर्मांतरित झाले तर समाजाला पलटवणे सोपे जाते, अशी विरोधी पंथीयांची योजना होती.
 
विविध सांस्कृतिक, संस्कृतिसंवर्धन करणारी गीतांची आवश्यकता वाटल्याने त्यातून संस्कार भारतीचा जन्म झाला. अनेक स्थानिक जनजाती कलाकार, गीतगायक पुढे आले. या धर्मावर द़ृढ श्रद्धा असावी, त्याचे महत्त्व सांगणारी, अर्थाची गीते होती. त्याचा समाजमनावर कॅसेटच्या माध्यमातून खूपच प्रभाव पडला. डूयूतामु, हारीतारासारख्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांमध्ये कार्य वाढावे म्हणून अभाविपचे काम जोमाने सुरू केले. कारण पूर्वांचलात युवाशक्ती फारच सक्रिय व निर्णय देणारी, कलाटणी करणारी आहे. कल्याण आश्रमचे द्वारकाचार्य व सुब्रतो सेनच्या पुढाकाराने डोनीपोलो मंदिर चळवळ जोमाने वाढत गेली. बर्‍यापैकी मतांतरणास आळा बसला. सुरुवातीस स्वयंसेवक यात समोर लढाऊ बाण्याने येऊन सर्वांची हिंमत वाढवत असत. अरुणाचलात गेल्यानंतर साधारण एक-दीड वर्षाने मी घरगुती कार्यक्रमास आलो असताना, तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी किती शाखा सुरू झाल्या, असे न विचारता अरुणाचलवासी स्वत:ला भारतीय मानतात का? हा प्रश्न प्रामुख्याने विचारला होता.
 
 
प्रचारकी जीवन आटोपून नागपुरात परत आलो. ईशान्य भारताबद्दल असलेले सर्वत्र अज्ञान, तेथील समस्यांची विकरालता पाहता येथून काही करता येईल का? याचे विचारचक्र सुरू होते. ईशान्येतील माणसं, विद्यार्थी येथे आहेत, का याचा शोध सुरू केला. व्हीएनआयटीत दरवर्षी काही राखीव जागांवर तेथील मुलं येतात. त्यांचा पत्ता काढून त्यांना भेटणे सुरू केले.
 
 
काही विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन, आयुर्वेद कॉलेजात भेटले. चेहरेपट्टीमुळे चिनी, नेपाळी हिणविल्या गेल्याने गट करून राहणारी ही मुलं होती. आम्ही भारतीय म्हणून किती जणांना समजवणार! शिक्षणासाठी त्यांची भावंडं नागपुरात येण्यास तयार होती. मग त्यांच्या प्रवेशाचे, खोल्या शोधण्याचे काम सुरू झाले. पाहता पाहता सोशलवर्क ते मेडिकल, बी. ए. असे पाचशेच्या वर विद्यार्थी झाले. कधी यांचे चेहरे पाहून रात्री पोलिस पकडीत तर फोन... ‘‘भय्या आयेंगे क्या? पुलिस मार रही है इतने रात को क्यों घुमते हो...’’ ताबडतोब उठून जाणे, पोलिसांना समजावणे, त्यांची सुटका करणे. तंबी देणे, रात को मत घुमा करो. कधी कॉलेजात मारामार्‍या, त्या प्राचार्यांना भेटून सोडवणे. तर कुठे मिझो मुलांचे पोस्टमन मनिऑर्डर चिरमिरीशिवाय देत नसत. त्याला भेटा, सांगा, बाबा रे यांना कशाला त्रास देतो, हे आपलेच भारतीय आहेत. नागालॅण्डच्या जमीरला आर्वीस सोडण्यास गेलो. तो एकटा असा चपटा चेहर्‍याचा भेदरलेला होता.
 
मग त्याच्या वसतिगृहातील मुलांची मीटिंग घेतली. याला सांभाळा, आर्वी सोडून हा गेला नाही पाहिजे. काय आश्चर्य, तीन वर्षांनंतर शेकडो विद्यार्थी त्याला निरोप देण्यास आले होते. जमीर ईसाई आहे. परंतु, गणेशोत्सव पाहून म्हणाला, ""Yes, there can be salvation through Ganesh God.'' दोन वर्षांपूर्वी नागालॅण्डला गेलो तर दोन दिवस सतत जीपमधून फिरवीत होता. इंजिनीयर होऊन नोकरी न करता समाजसेवा करतो. भ्रष्टाचार पाहून मात्र विरक्ती आली, असे म्हणाला. मणिपूरचा सुशील एक दिवस अमरावतीहून अपघात झालेला एक विद्यार्थी इस्पितळात ताबडतोब भरती करायचा म्हणून आला. त्या विद्यार्थ्याला दगडाने ठेचले होते. इथे आणेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. विलासजी फडणवीसांच्या सहकार्याने शवविच्छेदन करून विमानाने त्याचे पार्थिव इम्फालला पाठविण्यात आले. त्याचा मोठा भाऊ घ्यावयास आला होता. ओळख झाली, ‘‘आप हमारे कुछ भी नही लगते लेकिन आपने सारा मेरे भाई के लिये किया...’’ असे म्हणून रडायला लागला. ‘‘अरे, हम सब एकही देश के भाई भाई तो है.’’ म्हणत त्याचे सांत्वन करावे लागले. अशा असंख्य घटना आज डोळ्यांसमोर तरळतात. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक महोत्सव, पालक-विद्यार्थी योजनेनंतर सुरू झालेले ‘भारत मेरा घर’ योजनेत व्यग्र झालो. माझी पत्नी पूर्वाश्रमीची नीता बर्वे नागालॅण्ड, नाशिकच्या जनजाती क्षेत्रात पूर्णकालीन म्हणून होती. तिने एके दिवशी म्हटले, ‘‘हे काम करत राहाल तर अर्थाचे काय?’’ मी म्हणालो, ‘‘प्रचारक असताना सातशे रुपये महिना माझा खर्च होता. आतातर त्यापेक्षा पाचपट कमावतो. होऊन जाईल!’’ तितक्यातच ती म्हणाली, ‘‘नागालॅण्डच्या दहा जणी एका संस्थेच्या कामासाठी आल्या आहेत. घरी घेऊन या. आपल्या घरी राहतील, जेवतील, नागपूर भ्रमण करावयाचे आहे.’’
 
हा असा राबता अजूनही सुरूच असतो. ही मुलं परत गेल्यावर उच्च स्थानी आहेत. कुणी कल्याण आश्रमाचे निधी संकलन करतात, तर लोरामनेे भारतीय मजदूर संघाची शाखा सुरू केली. डॉ. तासर उत्कृष्ट कोविडयोद्धा म्हणून पुरस्कृत झाला, तर मणिपूरची लिन्योई, अपहरण होणार्‍या मुलांच्या सुटकेसाठी एका स्वयंसेवी संस्थेत काम करते. आसामचा राकेश बरुआ सुटीत जाताना माझ्या घरीच गाडी ठेवून जायचा! तर बलबीरसिंग, ‘‘भय्या, हमारे घर समझाओ. मुझे इंजिनीयरिंग नही जमती. मै हेअर ड्रेसिंग का काम सिखना चाहता हूं...’’ घरच्यांना समजावले. आज बलबीर आमीर खानचा हेअर ड्रेसर आहे. सारे जग त्याने पादाक्रांत केले. गणपतीप्रमाणे आईलाच प्रदक्षिणा करून ध्येय साधण्यासारखे होते. इथे राहूनच इथल्या समाजासोबत मलोमिलनाचा, राष्ट्रीय ऐक्याचा, बिनखर्चाचा हा सफल उपक्रम होता. संघशाखेच्या कार्यपद्धतीचा माणसामाणसांना सात्त्विक प्रेमाने जोडण्याचा हा यशस्वी राजमार्ग होय. हीच मुलं आपल्या भागात जाऊन खर्‍या अर्थाने संरक्षण करीत, संविधानातील प्रास्ताविकेत सांगितलेला बंधुभावच राष्ट्रीय एकात्मतेची खात्री देऊ शकतो. तो बंधुभाव ‘भारत माझं घर’ समजून आचरण्याचा प्रयत्न केला. काश्मीर, अंदमान, निकोबार, लडाख येथील बांधव आपलेच आहेत. जंगलातील आपलेच बंधू हातात बंदूक घेऊन देशांतर्गत युद्ध करवतात तेव्हा वाटते, हा बंधुत्वाचा झरा आमच्या समाजात आटला तर नाही? या भारत नामक घरातील प्रत्येक परिवारातील सदस्यास हे आपले घर केव्हा वाटेल? तेव्हा रॉबर्ट फ्रॉर्स्टच्या ‘अरण्ये दाट, निबिड आणि मोहमयी आहेत, परंतु मलाही वचने पाळायची आहेत, दिवस अखेरपर्यंत खूप चालायचे आहे. जीवनाच्या अंतापर्यंत चालायचे आहे...’ या ओळी मला कर्तव्याचे स्मरण करवतात. 
(लेखक ईशान्य भारताचे जाणकार आहेत)
9890489978