संदीप जोशींचा विजय निश्चित : खा. तडस

    दिनांक :21-Nov-2020
|
तभा वृत्तसेवा
आर्वी,
संदीप जोशींनी जनहिताच्या कामांसाठी संघर्षातून राजकारणाची सुरूवात केली. त्यांची महापौर असताना केलेली कामगिरी दमदार आहे. सार्वजनिक कार्यासोबत त्यांचे क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आ. दादाराव केचे यांनी विधानसभेतील अनेक प्रश्न सोडविले आहेत आणि अजूनही सोडवत आहेच पण काही प्रश्न विधान परिषदेच्या माध्यमातून सोडवावे लागणार आहे. त्यामुळे सर्वात मोठा आणि भाजपाचे वर्चस्व असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशींना पाठवून विधानसभेची उर्वरित प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, असा विश्वास खा. रामदास तडस यांनी व्यक्त केला.
 
 
sandeep_1  H x
 
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खो. री. प.चे उमेदवार संदीप जोशी यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्थानिक आयनॉक्स सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आ. दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी, खा. रामदास तडस, प्रदेश सचिव राजेश बकाने, महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे सरचिटणीस सुधीर दिवे, जिप अध्यक्ष सरीता गाखरे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
 
सुधीर दिवे म्हणाले की, संदीप जोशी यांनी राजकीय जीवनाची सुरुवात वार्डाचे अध्यक्ष म्हणून केली असुन भाजपाच्या महामंत्री पदावर तीन वेळा आणि मागील चार पंचवार्षिकपासुन नागपुर महानगर पालिकेत नगरसेवक ते महापौरपद त्यांनी भुषविले आहे. विशेष म्हणजे त्यांचे आई आणि वडील शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाणीव असल्याचे ते म्हणाले. अशा या हरहुन्नरी उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
आ. दादाराव केचे म्हणाले की, संदीप जोशी तडफदार उमेदवार असुन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम केलेले अनुभवी उमेदवार पदवीधर मतदारसंघाला लाभले आहे. हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस ते आजपर्यंत भाजपाचा बालेकिल्ला राहीला आहे आणि तो यावेळीही अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले, 6 खासदार, 33 आमदार, 6 विद्यापीठे, 5 मोठी शहरे, 66 तालुके असा हा 2 लाख 6 हजार मतदारांचा नागपूर पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी न भुतो अशी कामे केली. बिघाडी सरकारचे निर्णय म्हणजे जनते करीता अगऊचा व्यापच ठरत आहे. कोरोना काळात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज देयक माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेने जनतेच्या हाताला काम नसल्याने जनता आनंदी झाली. परंतु तिघाडी सरकार मध्ये तारतम्य नसल्याने युटर्न मारत 300 युनिटचे बिल माफ करण्याची घोषणा केली.
 
 
 
बारामतीकरांनी 300 युनिटची घोषणा 100 युनिटवर आणली. कोरोना काळात जनतेला आर्थिक टंचाई असतांना सरासरीने अव्वाच्या सव्वा रकमेची बिले पाठविली. देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा दम देणारे अजब सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार विदर्भावर अन्याय करणारे सरकार आहे. सरकार स्थापन होऊन एक वर्ष लोटले तरी ही एकही काम नव्याने विदर्भात सुरू नाहीत. जी कामे प्रगतीपथावर आहेत आणि होणार आहेत ती सर्व कामे भाजपाचे सरकार असतानाच आहे. सुरू कामांचे पैसे देखील तिघाडी सरकारने वापस नेल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन प्रशांत वानखेडे यांनी केले तर आभार विजय बाजपेयी यांनी मानले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, संदीप काळे, हनुमंत चरडे, अनिल जोशी, वरूण पाठक, अविनाश देव, सुनिल गफाट, कमल कुलधरीया, विनय डोळे उपस्थित होते.