शाळा सुरू होणार, मात्र पाल्य किती सुरक्षित?

    दिनांक :21-Nov-2020
|
- ग्रमीण भागातील पालकांमध्ये संभ्रम !
तभा वृत्तसेवा
वडनेर,
सोमवार 23 पासून शाळेची घंटा वाजवण्याविषयी अजूनही तसा संभ्रम आहे. शिक्षणविभागाने पूर्ण तयारी करण्याचे आदेश शाळांना दिल्याने शाळा व्यवस्थापनाने आपले कर्तव्य बजावत पूर्व उपाययोजना करून ठेवल्या. मात्र, आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे कसे? असा प्रश्‍न अनेक पालकांनी उपस्थित केला असुन पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची उदासीनताच दिसून येत आहे.
 
 

school_1  H x W
 
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मार्चपासूनच शाळांना सुट्टी देण्यात आली. परीक्षाही अर्धवट घेण्यात आल्या किंवा परीक्षेविणाच विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले. अजूनपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एकत्र येतात त्यांच्यात भौतिक दुरावा ठेवणे कठीणच आहे. विद्यार्थी एकमेकापासून दूर राहूच शकत नाही तर एका बाकावर एक विद्यार्थी बसविल्यास शाळेची इमारतही कमी पडेल. अशा अनेक अडचणी असूनही शासनाद्वारे शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शिक्षण विभागाने नियम व व अटी निश्चित करीत तसे शाळांना आदेशही दिलेत. थर्मलगन, ऑक्सी मिटर याच्या व्यवस्थेसह प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मुखच्छादन या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
 
 
प्रत्येक शिक्षकांची सध्या कोरोना तपासणी केली जात असुन तपासणी करण्यासाठी सुद्धा शिक्षकांची मोठी गर्दी होत आहे. विद्यार्थी आभासी अभ्यासात लक्ष देत नाहीत हेही तेवढेच खरे तरी अति मोबाईल वापरामुळे त्यांच्या आरोग्यावर धोकाही संभवतो. या सर्व बाबी असल्या तरी शाळा सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थी देखील शाळेत येणार, पुन्हा शाळेत गर्दी होणार. मात्र, या गर्दीत एखादा विद्यार्थी अथवा शिक्षक बाधित असल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो याचा विचारही होणे. गरजेचे आहे. विद्यार्थी हे कोरोना संसर्ग वहन करण्यास फार मोठे साधन ठरू शकतात. कारण शाळेत एकत्र येणार्‍या विद्यार्थ्यांच्या समूहातून असा घात होऊ शकतो. एखादी थोडी चूकही मोठी महाग पडू शकते. कोरोना संसर्गामुळे निश्चितच 2020-21 हे शैक्षणिक सत्र वाया जाणार हे नक्की! अनेक पालकांच्या मते शाळेआधी पाल्यांचे आरोग्य महत्त्वाचे. शाळा सुरू होणार मात्र आपला पाल्य शाळेत किती सुरक्षित राहील हा संभ्रम पालकांमध्ये कायम असल्याचे दिसून येते.