देशात दरमहा विक्रमी 16 हजार नव्या कंपन्यांची नोंदणी

    दिनांक :21-Nov-2020
|
-मोदी सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचे सुपरिणाम
नवी दिल्ली, 
कोरोनाच्या संकटावर मात करून अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचे अथक प्रयत्न केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा व कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयाचे सकारात्मक परिणाम आता दिसत असून, जुलै ते ऑक्टोबरपर्यंत दर महिन्याला 16 हजारांपेक्षा जास्त कंपन्या स्थापन झाल्या आहेत.
 
 
comp_1  H x W:
 
यापूर्वी कधीही एका महिन्यात 14 हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी झाली नव्हती. ऑक्टोबरमध्ये 16,607 कंपन्या स्थापन झाल्या, हा विक्रम आहे. विशेष म्हणजे नव्या कंपन्यांत उत्पादन क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. सध्या देशात व्यवसाय सेवा (बिझनेस सर्व्हिस) क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा 32 टक्के आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा 20 टक्के आहे. पण, नवीन स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 22 ते 23 टक्के आहे, तर ‘बिझनेस सर्व्हिस’ क्षेत्राचा वाटा घटून 28 ते 29 टक्क्यांवर आला आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 40 : 15 असे राहत होते.
 
 
कमी कंपनी कराचा परिणाम
उत्पादन क्षेत्रातील नव्या कंपन्यांना केवळ 15 टक्के प्रमंडळ कर (कॉर्पोरेट टॅक्स) लागत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांमार्फत व्यवसाय करणारे लोकही कंपनी स्थापन करून व्यवसाय करू इच्छितात. पीएलआय योजनेचा परिणामही दिसत आहे, असे कंपनी व्यवहारातील तज्ज्ञ निपुण सिंघवी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
 
 
केंद्र सरकार ज्या नव्या सुधारणा करीत आहे, त्यापैकी बहुतांश नवे उद्योग आणि एमएमएमईसाठी आहेत. त्यामुळे ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, ते कंपन्यांची नोंदणी करीत आहेत. नोंदणी करणार्‍यांत विदेशातून परतलेले लोकही आहेत, कारण आता भारतात व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ डॉ. एस. पी. शर्मा यांनी सांगितले.