पाकी दहशतवाद संपल्याशिवाय अफगाणिस्तानला यश नाही

    दिनांक :21-Nov-2020
|
-भारताने संयुक्त राष्ट्रसंघात ठणकावले
न्यू यॉर्क, 
पाकपुरस्कृत दहशतवाद संपल्याशिवाय अफगाणिस्तानला यश मिळणार नाही. ड्युरंड लाईन अर्थात् अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानात दहशतवादी पाठविणार्‍यांना जबाबदार ठरवले पाहिजे आणि सुरक्षा परिषदेने अशा शक्तींविरोधात स्पष्टपणे बोलले पाहिजे, असे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात ठणकावले आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या 2,640 किमी सीमेला ड्युरंड लाईन संबोधले जाते.
 
 
ts trimurti_1  
 
शांतता प्रक्रिया आणि हिंसाचार हातात हात घालून जाऊ शकत नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे आणि तातडीने सर्वंकष युद्धबंदी लागू करावी, अशी आमची मागणी आहे. अफगाणिस्तानात शाश्वत शांतता निर्माण करण्यासाठी ड्युरंड लाईनपलीकडून हिंसाचाराला घातले जाणारे खतपाणी तातडीने संपुष्टात यावे, असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी शुक्रवारी ठणकावले.
 
 
अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेला सहकार्य करण्यासाठी सुरक्षा परिषद काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित करताना अफगाणिस्तानात विदेशी अतिरेक्यांची उपस्थिती असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे, असे त्यांनी एका बैठकीत सांगितले. हिंसाचार, अतिरेकी संघटना आणि त्यांना सुरक्षित आश्रय उपलब्ध करून देणार्‍यांविरोधात आता सुरक्षा परिषदेने स्पष्टपणे बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
ड्युरंड लाईनपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालणे बंद झाल्याशिवाय अफगाणिस्तानला यश मिळणार नाही. दहशतवाद किंवा हिंसाचार अफगाणिस्तानच्या भवितव्याला आकार देऊ शकणार नाही. अफगाणिस्तानसाठी धोका ठरणारा दहशतवाद संपवणे अत्यावश्यक आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांना जबाबदार ठरवणे अत्यावश्यक झाले आहे, असे त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. सध्या अफगाणिस्तान गंभीर परिस्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने संबंधितांना योग्य संदेश देणे गरजेचे झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.