कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट

    दिनांक :21-Nov-2020
|
- पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, 
कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले असून, त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले.
 
 

Modi_1  H x W:
 
आगामी शतकात नैसर्गिक वायूचा वापर करण्याचे प्रमाण चार पटीने वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून, पुढील पाच वर्षांच्या काळात तेल शुद्धीकरणाची क्षमता दुपटीने वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभाला ते संबोधित करीत होते.
 
 
कार्बल उत्सर्जनाचे प्रमाण किमान 35 टक्क्यांनी कमी करण्यासाठी आपल्या सरकारची वाटचाल सुरू झाली आहे. याबाबतची माहिती मी जेव्हा जागतिक नेत्यांना दिली, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. भारत खरच हे लक्ष्य साध्य करू शकेल का, असा प्रश्न त्यांना पडला. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सरकारने काही क्षेत्रांवर काम सुरू केले आहे. यासाठी ऊर्जेत नैसर्गिक वायूचा वापर चार पटीने वाढविण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, तेल शुद्धीकरणाची क्षमताही दुपटीने वाढवली जाणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
अक्षय ऊर्जा निर्मितीत आत्मनिर्भर होण्याचेही आमचे उद्दिष्ट असून, ते देखील पूर्ण होणार आहे. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य 450 गिगावॅट इतके निर्धारित करण्यात आले असले, तरी त्या आधीच आम्ही यात स्वयंसिद्ध होणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.