चेन्नईच्या रस्त्यावर अमित शाह पायी चालले

    दिनांक :21-Nov-2020
|
- कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
- सुरक्षा अधिकारीही चकीत
चेन्नई, 
चेन्नईच्या दोन दिवसांच्या भेटीवर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी विमानतळावरून बाहेर आल्यानंतर राजशिष्टाचार बाजूला सारले आणि रस्त्यावर पायी चालून कार्यकर्ते व शुभचिंतकांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, तर अमित शाह यांचे सुरक्षा अधिकारी मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चकीत झाले होते.
 
 
amit shah chennai_1 
 
विमानतळावरून अमित शाह आपल्या वाहनात बसले आणि जीएसटी मार्गापर्यंत आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हजारो कार्यकर्ते व समर्थक पाहून ते आपल्या वाहनातून खाली उतरले. अण्णाद्रमुकचे कार्यकर्तेही त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या प्रेमामुळे भारावलेले अमित शाह यांनी हात उंचावून सर्वांचे अभिवादन स्वीकारले आणि दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले. आज मी तामिळनाडूत आहे आणि याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
 
 
विमानळावर अमित शाह यांचे स्वागत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेलवम्, मंत्रिमंडळातील अन्य वरिष्ठ मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन् यांनी केले. तामिळनाडू सरकारतर्फे सायंकाळी आयोजित कार्यक्रमातही ते सहभागी झाले. विशेष म्हणजे, तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून, त्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.