विनोदी अभिनेत्री भारतीसिंहला अटक

    दिनांक :21-Nov-2020
|
- मादकपदार्थ प्रकरणी ‘एनसीबी’ची कारवाई
- घरात सापडला 86 ग्रॅम गांजा
मुंबई, 
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येतून समोर आलेल्या मादकपदार्थाच्या तस्करी प्रकरणात मादकपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज शनिवारी विनोदी अभिनेत्री भारतीसिंहला अटक केली. तिचा पती हर्ष लिंबाचिया याच्यावरही अटकेची टांगती तलवार कायम आहे.
 
 
bharti_1  H x W
 
सुशांतसिंह मृत्युनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या लोकांचा मादकपदार्थ तस्करीतील सहभाग समोर येऊ लागल आहे. त्यातच एनसीबीच्या पथकाने आज सकाळी भारतीसिंहच्या अंधेरी येथील घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. यात 86.50 गॅ्रम गांजा जप्त करण्यात आला. छापेमारी सुरू असताना, भारती आणि तिचा पती हर्ष दोघेही उपस्थित होते. एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. आम्ही दोघेही दररोज गांजाचे सेवन करीत असतो, अशी कबुली भारतीने सुमारे चार तास चाललेल्या चौकशीत दिली आहे.
 
 
दरम्यान, आजची रात्र तिला एनसीबीच्या कार्यालयातच काढावी लागणार असून, उद्या रविवारी तिला विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. एक हजार ग्रॅम गांजा जवळ बाळगणार्‍या व्यक्तीला किमान सहा महिन्यांचा कारावास किंवा दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अलिकडील काळात ज्या मादकपदार्थ तस्करांना अटक केली आहे, त्यांच्या चौकशीतून भारती व तिच्या पतीचे नाव समोर आले होते. चित्रपट सृष्टीतील अनेक बड्या दिग्गजांच्या नावाची यादीच एनसीबीने तयार केली असून, लवकरच यातील काहींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
टेलिव्हिजनच्या माध्यमातून भारतीसिंह घराघरात पोहोचली आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अर्जुन रामपाल आणि त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांची देखील चौकशी केली होती. याशिवाय, अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीतसिंह आणि सारा अली खान यांचीही एनसीबीने चोकशी केली आहे.