काँग्रेसला मायबापच उरला नाही : केजरीवाल

    दिनांक :21-Nov-2020
|
- कुणालाही मते द्या, सरकार भाजपाचेच
नवी दिल्ली, 
काँग्रेसची पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. या पक्षाचा कोणी मायबाप आता शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेसला आता कुठलेही भवितव्य राहिलेले नाही, अशी टीका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. ‘हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समिट’मध्ये ते बोलत होते.
 
 
kejariwal_1  H
 
बिहार विधानसभा निवडणुकीतील आणि एकूणच देशभरातील सुमार कामगिरीबद्दल केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. राज्याराज्यांत लोक भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेस पक्षच भाजपाचे सरकार स्थापन करून देतो. काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मते काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचेच बनते, असेही ते म्हणाले.
 
 
राष्ट्रीय स्तरावर कोणीतरी काँग्रेसचा पर्याय म्हणून असायला हवे. स्थानिक पक्ष वर येऊ द्या किंवा अन्य कुठलाही. परंतु, आता काँग्रेसला कोणतेही भविष्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय राजकारणाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केजरीवाल यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. आमची भूमिका काय असेल ते वेळच सांगेल, असे ते म्हणाले. आम आदमी पार्टी हा एक छोटा पक्ष आहे. परंतु, दिल्लीत आम्ही केलेल्या विकासकामांमुळे देशातील नागरिक आपकडे आदराने पाहतात. देशातील जनता पर्याय नक्कीच देईल अशी मला खात्री आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.