राजकीय नेत्यांना कोरोनासंसर्गित पत्राचा धोका

    दिनांक :21-Nov-2020
|
- दहशतवादाचे नवीन तंत्र
- इंटरपोलचा इशारा
नवी दिल्ली,
भारतासह विविध देशांच्या राजकीय नेत्यांना धोका पोहोचवण्यासाठी कोरोनाचा विषाणू वापरला जाऊ शकतो, असा इशारा इंटरनॅशनल पोलिस ऑर्गनायझेशन अर्थात् इंटरपोलने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिला आहे. राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गित पत्र पाठवून लक्ष्य केेले जाऊ शकते, असे यात म्हटले आहे.
 
 
interpol_1  H x
 
कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिस व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांच्या चेहर्‍यांवर थुंकणे, खोकणे असे प्रकार काही लोक करीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या पृष्ठभूमीवर इंटरपोलने भारतासह इतर 193 सदस्य देशांमधील राजकीय नेते आणि व्यक्तींना कोरोना संसर्ग असलेली पत्रे पाठविली जाऊ शकतात, असा धोक्याचा इशारा दिला आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 
 
इंटरपोलने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती असतील आणि त्या एखाद्याच्या चेहर्‍यावर थुंकत किंवा खोकत असतील, तर धोका उद्भवू शकतो. अशाप्रकारे जाणीवपूर्वक खोकणे, थुंकण्याचे प्रकार केले जात असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे इंटरपोलने म्हटले आहे. मात्र, एखाद्या राजकीय नेत्याला अशाप्रकारे पत्र पाठविण्यात आल्याची घटना घडली आहे अथवा नाही याविषयी इंटरपोलने अद्याप काही स्पष्ट केलेले नाही.
 
 
अनेकदा प्रवासावर निर्बंध असूनही कोरोनाबाधित भागातील व्यक्ती जाणीवपूर्वक कोरोनाचा प्रसार नसलेल्या भागात जाते. तसेच कोरोना संसर्ग असलेले जैविक नमुने आभासी अर्थात डिजिटल माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. या पृष्ठभूमीवर सर्व देशांमधील सुरक्षा एजन्सींनी नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात याची यादीही इंटरपोलने दिली आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार्‍या यंत्रणेला या धोक्यांची माहिती असणे आवश्यक आहे. पोलिसांनी सहकार्य न करणार्‍या व्यक्तींपासून सांभाळून राहिले पाहिजे, तसेच पीपीई किटचाही वापर केला पाहिजे. टपाल खात्यातील कर्मचार्‍यांनी पाकिटे-पार्सल हाताळताना या जैविक धोक्याची जाणीव ठेवून योग्य ती काळजी घेऊन, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून काम केले पाहिजे, असेही इंटरपोलने म्हटले आहे. दहशतवादी कृत्ये करण्यासाठी कोरोना विषाणूचा अशाप्रकारे उपयोग केला जाऊ शकतो, हा धोक्याचा इशारा इंटरपोलने या आधीही दिला आहे.
 
 
दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनेही यापूर्वीच पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना याबाबत सावध केले आहे. देशात बनावट हस्त निर्जंतूक द्रवाची (हँड सॅनिटायजर्स) विक्री आणि पीपीई किट तसेच कोरोनाशी संबंधित वैद्यकीय साहित्य विक्रेते बनून फसवणूक करणार्‍यांचे जाळेच सक्रिय असल्याची सूचना दिली आहे. तसेच आर्थिक फसवणूक करणारे आणि कोरोनाच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत दिशाभूल करणारे गुन्हेगारी गट मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचा इशाराही इंटरपोलने दिला आहे.