कर्मचार्‍यांना आता करावे लागणार 12 तास काम

    दिनांक :21-Nov-2020
|
- श्रम मंत्रालयाने पारित केला प्रस्ताव
नवी दिल्ली, 
कर्मचार्‍यांच्या कामाचे तास वाढविण्याचा मसुदा प्रस्ताव श्रम मंत्रालयाने पारित केला आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास, कर्मचार्‍यांना सध्या असलेले नऊ तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार आहे.
 
 
working_1  H x
 
कामाचे तास प्रती दिवस 12 तास करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. सध्या एका दिवसाला नऊ तास काम करावे लागते. यात एक तासाच्या विश्रांतीचाही समावेश आहे. श्रम मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी संहिते अंतर्गत हा मसुदा प्रस्ताव तयार केला आहे.
 
 
या मसुद्यात असेही नमूद आहे की, कोणत्याही कारखाना, कंपनी किंवा संस्थेतील कर्मचारी आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त वेळ काम करणार नाही. त्यामुळे कामगारांच्या कामाच्या तासांचे अशाच प्रकारे विभाजन केले जावे की, सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि विश्रांतीची वेळही एक तासापेक्षा जास्त राहणार नाही.
 
 
श्रम मंत्रालयाने हा मसुदा संबंधित विभागांना पाठविला असून, यावर 45 दिवसांच्या आत सूचना सादर करण्यास सांगितले आहे. तास वाढविण्याची पद्धत भारतातील परिस्थिती पाहून ठरविण्यात आली आहे. यात दिवसभरातील काम वाटून दिले आहे. यामुळे कामगारांना ओव्हरटाईम भत्त्याच्या (जास्त वेळ काम करणे) माध्यमातून अधिक उत्पन्न कमवता येईल. सध्याच्या ओव्हरटाईमच्या नियमानुसार, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ केलेले काम या तत्त्वात बसत नाही, पण नव्या नियमानुसार 15 मिनिटे जास्त केल्यास, ते काम अर्ध्या तासाचा ओव्हरटाईम म्हणून गणला जाईल. कोणतीही व्यक्ती अर्ध्या तासाच्या मध्यांतराशिवाय 5 तासांवर सतत काम करणार नाही, असे यात नमूद आहे.