पाकी गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद

    दिनांक :21-Nov-2020
|
जम्मू, 
पाकिस्तानी सैनिकांनी आज शनिवारी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील दोन सेक्टरमध्ये आणि आसपासच्या गावांवर बेछूट गोळीबार व तोफांचा मारा केला. यात महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आले, तर अन्य एक जवान जखमी झाला.
 
 
PTI21-11-2020_000061A_1&n
 
संग्राम शिवाजी पाटील असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील रहिवासी होते. संग्राम पाटील हे राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. संग्राम यांच्यामागे आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याने दोन जवानांना गमावले आहे.
राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील लाम भागात आज पहाटेच्या सुमारास पाकी सैनिकांनी मारा केला. याच भागात तैनात असलेले संग्राम पाटील यात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दुसर्‍या जखमी जवानावर उपचार सुरू असल्याची महिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
 
 
भारतीय जवानांनीही पाकिस्तानच्या गोळीबार व तोफांच्या मार्‍याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असून, यात त्यांचे किती नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे प्रवक्ता म्हणाला. संग्राम पाटील यांची प्राणाहुती व्यर्थ जाणार नाही. त्यांनी दाखविलेला पराक्रम फार मोठा आहे. भारतीय लष्कर त्यांच्या त्यागाला नेहमीच नमन करेल, असेही प्रवक्त्याने सांगितले.