आता आयुर्वेदिक डॉक्टरही करू शकतील सामान्य शस्त्रक्रिया

    दिनांक :21-Nov-2020
|
- केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली, 
आयुर्वेदिक डॉक्टर्सही आता सामान्य शस्त्रक्रिया तसेच ऑर्थोपेडीक, नेत्ररोगशास्त्र, ईएनटी आणि दंत यासारख्या शस्त्रक्रिया करू शकणार आहे. पदव्युत्तर डॉक्टरांना मोठा दिलासा देणारा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 

doctor_1  H x W 
 
पदव्युत्तर आयुर्वेदातील शल्य आणि शालाक्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उपरोक्त सर्व क्षेत्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियांचे औपचारिक प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 2016 मध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा नवा नियम अंमलात आणला जाणार असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. याबाबतची राजपत्रित अधिसूचना दोन दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली आहे.
 
मास्टर्स ऑफ सर्जनची उपाधीही मिळणार
शल्य आणि शालाक्य अभ्यासक्रमात यशस्वी होणार्‍या डॉक्टरांना स्वतंत्रपणे या सर्व शस्त्रक्रिया करता यावा, यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. आतापर्यंत आयुर्वेद डॉक्टर्स, मास्टर्स ऑफ सर्जन असलेल्या अनुभवी डॉक्टरांच्या अधिपत्यात सहाय्यक म्हणून या सर्व शस्त्रक्रियांमध्ये सहभागी होत होते. मात्र, आता त्यांना स्वबळावर आणि स्वतंत्रपणे या शस्त्रक्रिया करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
 
 
शस्त्रक्रियेच्या दोन प्रवाहात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यात उत्तीण होणार्‍या विद्यार्थ्यांना मास्टर्स ऑफ सर्जन (आयुर्वेद) शल्य तंत्र आणि मास्टर्स ऑफ सर्जन (आयुर्वेद) शालाक्य तंत्र अशा दोन उपाध्या प्रदान करण्यात येतील, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. या प्रशिक्षणासाठी आता आयुर्वेद अभ्यासक्रमात शस्त्रक्रियांबाबतची माहिती देणार्‍या पाठ्यपुस्तकांचा समावेश केला जाणार आहे.