नागरोटा घटनेचा अन्वयार्थ...

    दिनांक :21-Nov-2020
|
जम्मू-श्रीनगर महामार्गाच्या नागरोटा भागात गुरुवारी सुरक्षा दलांनी चार अतिरेक्यांना कबरीत धाडले. ही घटना सुरक्षा दल व त्यांचा गुप्तचर विभाग यांची तत्परता आणि समन्वय निश्चितच अधोरेखित करणारी आहे. परंतु, सोबतच ही घटना जम्मू-काश्मिरातील दहशतवादाच्या संदर्भात एका नव्या पैलूकडेही लक्ष वेधते. जम्मू-काश्मिरात गेल्या काही काळापासून अतिरेकी त्यांचे घृणित कार्य करण्याआधीच मारले जात आहेत. आतापर्यंत असे होत नव्हते. अतिरेकी हल्ला करायचे आणि नंतर झालेल्या चकमकीत ते मारले जायचे. याला गुप्तचर विभागाचे अपयश किंवा सुरक्षा दलाची कमी तत्परता कारणीभूत मानता येणार नाही. एक वेगळेच कारण यामागे आहे.
 
 
nag_1  H x W: 0
 
आपल्याला पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद आठवतच असेल. त्या काळी पंजाबमध्ये जो गैरशिखांचा रक्तपात होत होता, त्या घटना आठवून आजही अंग शहारून उठते. शिखांच्या ज्या गुरूंनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले, त्यातीलच काही शीख, हिंदूंना ठार मारण्यास प्रवृत्त झाले होते. त्यांना कुठलाही गैरशीख नसलेला स्वतंत्र खलिस्तान देश हवा होता. प्रारंभी हे गरम रक्ताचे शीख तरुण अनेकांना आकर्षक वाटले. पंजाबातील अत्यंत सशक्त अकाली दल-भाजपा युतीला धुळीस मिळविण्यास हे माथेफिरू तरुण कामाचे आहेत, असे आडाखे बांधून त्यांना प्रोत्साहनही देण्यात आले. परंतु, नंतर मात्र या भस्मासुरांचा हात या राजकीय पक्षांच्याच डोक्यावर पडला. काही अवधीतच पंजाबातील खलिस्तान चळवळ सार्‍या देशाची डोकेदुखी झाली. नंतर पंजाबचे पोलिस महासंचालक के. पी. एस. गिल यांच्या नेतृत्वात ही चळवळ थंड झाली. याचे श्रेय निश्चितच गिल आणि सुरक्षा दलांना आहे, यात शंका नाही. परंतु, या विजयातही एक पैलू आहे, जो फारच कमी लोकांनी प्रकाशात आणला.
 
 
पंजाबात सर्वसामान्य शीख आणि अतिरेकी यांना कुणालाही ओळखता येत नव्हते. त्यामुळे केवळ संशयावरून कुणालाच ठार करता येत नव्हते. सुरक्षा दलांच्या या मर्मस्थानाचा अतिरेक्यांनी पुरेपूर फायदाही उचलला. घरात शीख अतिरेकी लपून बसलेला असायचा आणि सुरक्षा जवान रस्त्यांवरून त्याला शोधत फिरत असायचे. पोलिस घराचा तपास करायला आले, तर घरातील मंडळी त्या अतिरेक्याला आपला नातेवाईक असल्याचे सांगायचे. परंतु, जेव्हा या खलिस्तानी चळवळीने सर्वसामान्य शीख लोकांनाही छळण्यास सुरुवात केली, त्यानंतर मात्र सर्वसामान्य लोकांनी या अतिरेक्यांची माहिती सुरक्षा दलाला देणे सुरू केले. त्यामुळे सुरक्षा दलाला अतिरेक्याला नेमके हुडकून ठार करणे सोपे गेले. समाजाचे हे असे सहकार्य मिळाले नसते, तर खलिस्तानी चळवळीला नष्ट करण्यास आणखी काही वर्षे लागली असती. जोपर्यंत सामान्य लोकांचा पाठिंबा एखाद्या चळवळीला असतो, तोपर्यंत जगातील कुठलीही ताकद ती चळवळ दडपू अथवा नष्ट करू शकत नाही. हे पंजाबमधील खलिस्तान चळवळीच्या अस्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले.
 
 
जम्मू-काश्मिरातही आता हेच होत आहे. प्रारंभी फुटीरतावादी चळवळीला लोकांचा असलेला पाठिंबा झपाट्याने कमी होत आहे. सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होत आहे. या फुटीरतावादी नेत्यांनी सर्वसामान्यांना दाखविलेली स्वप्ने प्रत्यक्षात येणारी नाहीत, याची लोकांना खात्री झाली आहे. उलट, याच लोकांमुळे आपल्या एक-दोन पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, आपली प्रगती खुंटली आहे, याचे वास्तविक भान या लोकांना होऊ लागले आहे. ही परिस्थिती निर्माण व्हायला, 2014 नंतरचे नरेंद्र मोदी सरकार बव्हंशी कारणीभूत आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही. काही आंधळे हे नाकारतील. अजूनही नाकारत आहेत. परंतु, आता लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. राजकीय नेतृत्वाची मुत्सद्देगिरी, अतुलनीय संयम आणि सुरक्षा दलांचे शौर्य, धाडस यांच्या समन्वयाने जम्मू-काश्मिरातील परिस्थिती बदलू लागली, ती 2014 नंतरच. सर्वसामान्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली, तर तेही भ्रमाच्या धुक्यातून बाहेर येतात. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला काळसर्पाच्या विळख्याप्रमाणे असलेले कलम 370 व 35ए निष्प्रभ केल्यानंतर व विकास कामांचा धडाका लावल्यानंतर तिथल्या लोकांना, फुटीरतावादी चळवळीचा निरर्थकपणा स्पष्टपणे दिसू लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दुतोंडीपणा उघडा पाडून, त्याच्याविरुद्ध जगाला उभे करण्यात आल्यापासून तर काश्मिरातील परिस्थिती झपाट्याने निवळत गेली. लोकांना आपला खरा शत्रू कोण आणि खरा मित्र कोण, याचा विवेक आला. याचे प्रकटीकरण म्हणून आतापर्यंत स्वेच्छेने अथवा जिवाच्या भीतीने अतिरेक्यांचा ठावठिकाणा सुरक्षा दलास लागू न देणारे सर्वसामान्य नागरिक धीट बनले. ते अतिरेक्यांचे अड्डे, त्यांच्या हालचाली सुरक्षा दलास गुप्तपणे सांगू लागले. त्याचाच परिणाम म्हणून सुरक्षा दलांना गेल्या दोन वर्षांत प्रचंड सफलता मिळाली आहे. या फुटीरतावादी चळवळीने सर्वसामान्यांची सहानुभूती, पाठिंबा गमविला आहे, याचेच हे निदर्शक आहे. कलम 370 हटल्यानंतर जम्मू-काश्मिरात विकासाची सकाळ उगवू शकते, याचा उष:काल तिथल्या लोकांना दिसला. आणि आता आपण बघत आहोत की, तिथल्या अतिरेक्यांना, त्यांनी काही कारवाई करण्याच्या आधीच, तिथल्या तिथे ठार करण्यात यश मिळू लागले आहे. यासाठी जम्मू-काश्मिरातील नागरिकांचे अभिनंदन करायला हवे.
 
 
सुरक्षा दलाच्या तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या या धवल यशात विष कालविणारे आजही आपल्या देशात आहेत. लोकांनी ज्यांचे नेतृत्व झिडकारले आहे असे अब्दुल्ला पितापुत्र, मेहबुबा मुफ्ती यांच्या शेपट्यांची वळवळ सुरू आहे. हुर्रीयतच्या नेत्यांचे तर कुठे नावही ऐकू येत नाही, इतके ते विस्मरणात गेले आहेत. आपल्याला आतापर्यंत फसविण्यात आले, याची जाणीव माणसाला टोकाची चीड आणणारी असते. काश्मिरी लोकांच्या बाबतीत हे आता घडू लागले आहे. एखाद्या सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असेल, तर दृष्टिपथातही नसणारी वांछित परिस्थिती निर्माण करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे भारत सरकार हे आहे. ‘अमन की आशा’नामक कबुतरे उडविणारे तसेच पाकिस्तानला चुचकारत शांत ठेवण्याला मुत्सद्देगिरी मानणारे सरकार, भारतात केंद्रस्थानी होते म्हणून या विषवल्ली सतत फोफावत राहिल्या. पाकिस्तानचाही जगात दबादबा कायम राहिला. परंतु, मोदी सरकारने जी दमदार पावले उचललीत, त्याचेच हे सुफळ आहे. आज पाकिस्तानला जगात कुत्रेदेखील हुंगत नाही. पाकिस्तानचा पालक असलेले सौदी अरब, संयुक्त अरब अमिरातसारखे देश, दारावरच्या भिकार्‍याला हाकलून लावावे तसे पाकिस्तानला फेटाळत आहेत. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय आहे. ही असते खरी मुत्सद्देगिरी! मग आधीच्या सरकारांनी मुत्सद्देगिरीच्या नावाखाली काय केले, हा प्रश्नच आहे.
 
 
आज काश्मिरातील परिस्थिती अशी आहे की, सुरक्षा दल नाव घेऊन एकेका अतिरेक्याला ठार करीत आहेत. ‘अतिरेकी बनला तर त्याचे आयुष्य फार फार सहा महिन्यांचेच असेल,’ अशी सार्थ दर्पोक्ती सुरक्षा दल करीत आहेत. अतिरेकी झालेले तरुण घाबरून घरी परतत आहेत. त्याच वेळी आतापर्यंत राजकीय सत्तेपासून वंचित असलेल्या सर्वसामान्यांना राजकारणाच्या प्रवाहात सामावून घेण्याचे मन:पूर्वक प्रयत्नही सुरू झाले आहेत. आपला विकास अब्दुल्ला, मुफ्ती अथवा हे हुर्रीयतवाले करू शकत नाहीत, तो आपणच आपला केला पाहिजे आणि तो करता येतो, हे लोकांना अनुभवास येऊ लागले आहे. आतापर्यंत कटकारस्थानाने उर्वरित भारतापासून दूर ठेवण्यात आलेल्या जम्मू-काश्मिरातील बांधवांना, मुख्य प्रवाहात बरोबरीच्या नात्याने सहभागी करून घेण्यास सारा भारत उत्सुक आणि आनंदित आहे. हे अभूतपूर्व दृश्य साकारण्यासाठी कारणीभूत असलेल्या सुरक्षा दलांचे तसेच भारत सरकारचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. नागरोटाच्या चकमकीत चार अतिरेक्यांना ठार करून, सुरक्षा दलाने पुन्हा एकदा या वस्तुस्थितीकडे सार्‍या भारतीयांचे लक्ष वेधले आहे.