भगव्याचे ठेकेदार!

    दिनांक :21-Nov-2020
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
प्रशासनावरील सुटलेली पकड, राज्यातील जनतेला सुशासन देण्याऐवजी सूड उगवण्याची चाललेली संपूर्ण धडपड, वाममार्गाने सत्ता हस्तगत करून जनतेच्या हितापेक्षा आपल्या काळ्या धंद्यांचा मार्ग सुकर करण्यास चाललेला खटाटोप, कोरोनासारख्या गंभीर संकटप्रसंगी याचा चाललेला पोरखेळ, मदिरालये उघडण्यासाठी तप्तरता आणि मंदिर उघडताना दिसलेली यांची मानसिकता... अशा अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्यानंतर, कुणी कलाकार असोत किंवा मग पत्रकार, यांनी आवाज उठविला तर ते यांच्या अपयशावर अंगुलिनिर्देश नसून, तो महाराष्ट्राचा, छत्रपतींचा, भगव्याचा, हुतात्म्यांचा आणि मराठी माणसांचा अवमान होतो... मुळात सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीला टांगून, गहाण ठेवलेल्या स्वाभिमानाची भाषा बोलताना लाज कशी वाटत नाही, याचेच अप्रूप वाटते...
 
 
mmc_1  H x W: 0
 
मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून भगवा मानाने फडकत आहे. या भगव्यावर केवळ आपलाच अधिकार, मक्तेदारी आहे, असा ठाम समजच शिवसेनेने करून घेतलेला दिसतो. इंग्रजांच्या आधी भारतावर अनेकांनी आक्रमण केले आणि याविरोधात ज्या झेंड्याच्या नेतृत्वात हिंदूंनी लढा उभारला होता, त्याचा रंग भगवाच होता. हा भगवाच तमाम हिंदूंना प्रेरणा देत असतो. आता आजच्या राजकारणात भगव्याचा संदर्भ द्यायचाच झाला, तर शिवसेनेचा जन्म होण्याआधीच भाजपाने जनसंघाच्या रूपात हा भगवा आपल्या हातात घेतला होता. 1966 साली महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या अधिकारांचा लढा उभारण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. शिवसेनेची स्थापना मुळात भूमिपुत्रांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेऊन झाली होती, ‘भूमिपुत्रांची संघटना’ असा नारा देण्यात आला होता. परंतु, ‘भूमिपुत्रांची संघटना’ हा नारा कमजोर पडू लागला आणि राजकारणात यश मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर 1970 ला बाळासाहेबांनी पक्षाला हिंदुत्वाचे स्वरूप दिले. तेव्हापासून शिवसेनेकडून हिंदुत्वाचे मुद्दे हाताळण्यात येऊ लागले. अर्थात, यांचा हिंदुत्वाशी आणि शिवरायांच्या भगव्याशी संबंध कधीचा आणि कशासाठी, हे स्पष्ट होते. भगवा म्हणजे फक्त शिवसेना, असा समज जर उद्धव ठाकरे करून घेत असतील, तर तो प्रकारच हास्यास्पद ठरेल. एक काळ होता, काँग्रेस म्हणजेच देश आणि देश म्हणजेच काँग्रेस, असा समज काँग्रेसी नेत्यांनी करून घेतला होता. मात्र, या पक्षाचा हा (गैर)समज हळूहळू दूर होत गेला आणि आता तर त्यांना खात्रीच पटली की, काँग्रेस ही फक्तकाँग्रेस आहे, देश नाही. देशाची मालक जनताजनार्दन आहे. या जनतेला फार काळ मूर्ख बनवता येत नाही.
सध्या शिवसेनेचाही असाच काहीसा (गैर)समज झालेला दिसतो.
 
 
भगवा हा शिवसेनेच्याच मालकीचा आहे. शिवसेना म्हणजेच भगवा आणि भगवा म्हणजेच शिवसेना, अशी गाठ शिवसेना नेत्यांनी मनाशी बांधलेली दिसते. आज देशाच्या राजकारणाात भाजपामुळेच आतापर्यंत हा भगवा कायम आहे, याचा विसर एकतर या नेत्यांना पडला असावा किंवा पंजा आणि घड्याळाच्या चक्रात अडकल्याने, शिवसेना भगव्याचा नेमका अर्थ विसरली असावी. कदाचित, देशभरात भाजपाची भगवी लाट उसळलेली पाहून, शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकलेली असावी. प्रत्येक राज्यात भाजपाच्या जागा वाढत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता प्रभाव म्हणा किंवा दरारा म्हणा, शत्रूंनाही घाम फोडत आहे; तर दुसरीकडे भाजपाचा वाढता प्रभाव विरोधकांना घाम फोडत आहे. तिकडे ममता बॅनर्जींना तर स्वप्नातही भाजपाच्या कमळातही भगवे रंग दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. बिहारमधील विधानसभा आणि गुजरात व उत्तरप्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव होईल, असा तर्क मांडताना, शिवसेनेचे ‘पगारी’ नेते संजय राऊत यांनी हाथरससह ज्या हिंदुत्वाच्या मुद्यांचे गणित सादर केले होते, तेच नेमके मतदारांनी चुकीचे ठरविले आणि भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या. यावरून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला जनकौल मिळू शकतो, असे संकेत आहेत. उसनवारीचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पगारी नोकर असलेले संजय राऊत यांनीही कदाचित आगामी निकालांचे गणित केलेले असावे. देवेंद्र फडणवीस यांनी ते ओळखून, भाजपाच्या बैठकीत नेमक्या त्यांच्या दुखत्या नसेवरच बोट ठेवून, ‘‘मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकेल, पण तो भाजपाचा असेल!’’ असे अचूक वज्र सोडलेले दिसते. निशाणा अचूक होता, त्याने तो चुकण्याचा प्रश्नच नव्हता. झालेही तसेच, फडणवीसांची कट्यार नेमकी ठाकरे आणि राऊतांच्या काळजात घुसली आणि झालेल्या वेदनांच्या अपेक्षित प्रतिक्रिया बाहेर आल्या.
 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंगावर नेहमीच भगवा पांघरून काँग्रेसचा, या पक्षाच्या धोरणांचा विरोध केला. काँग्रेसच्या कोणत्याही दबावतंत्रापुढे बाळासाहेबांनी गुडघे टेकले नाहीत. त्यांच्यासाठी भगवा म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी होती. शिवरायांच्या मर्दांच्या महाराष्ट्रात काँग्रेसची थेरं खपवून घेतली जाणार नाहीत, असे ते नेहमी आपल्या भाषणातून म्हणायचे. बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातून वेळोवेळी, काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, सत्ता हाती घेऊन हिंदुत्वाचा जोरदार ठसा उमटवायचा आहे, असे ठाम आणि कणखर मत मांडले.
 
 
मात्र, त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी भगव्याचीच परिभाषा बदलली नाही, तर ज्या बाळासाहेबांच्या विचारांचा ते वारंवार हवाला देत असतात, त्या विचारांनाही तिलांजली दिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठ्यातील खुंट्याला हिंदुत्व बांधले. भगवा म्हणजे प्रखर राष्ट्रभाव, भगवा म्हणजे आक्रमणकारींविरोधातील अभेद्य शस्त्र, हा विसरच उद्धव यांना झालेला आहे. त्यांनी केवळ भगव्यालाच नाही, तर बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रीय, हिंदुत्व विचारांनाही दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधले. इतके सर्व करूनही ते आजही स्वत:ला भगव्याचे ठेकेदार म्हणवून घेत आहेत, हा भगव्यातील त्या राष्ट्रवादी विचारांचा आणि बाळासाहेबांनी ज्या राष्ट्रवादी विचारांसाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचाही अपमानच आहे. आपण बाळासाहेबांना पावलापावलावर किती अपमानित केले आहे, याचा जराही विचार मात्र या ठेकेदारांना येत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबई महापालिकेत 2017 साली केवळ दोन जागांचा तेवढा फरक भाजपा आणि शिवसेनेच्या संख्याबळात होता. शिवसेना 84 आणि भाजपा 82 असे बलाबल होते. मग मुंबईकरांनी भाजपाला शिवसेनेएवढे दिलेले 2017 मधील समर्थन म्हणजे मुंबई- महाराष्ट्राचा अवमान मुंबईकरांनी केला असा समजावा का? मुंबईत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून दिले आहेत, शिवसेनेचे नव्हेत... हादेखील अवमानच म्हणावा लागेल. नेहमी शिवरायांच्या अस्मितेची आणि अवमानाची तुतारी वाजविणार्‍या त्या पगारी नोकराला छत्रपतींच्या वारसांचा अवमान करताना छत्रपतींच्या अवमानाची आठवण झाली नाही. तुम्ही कितीही पिपाण्या वाजवा. या महाराष्ट्राला तुमचा खरा चेहरा कळला आहे. भगवा कुणाचेही पेटंट किंवा मक्तेदारी नाही, हे लक्षात ठेवा. मुंबई आणि महाराष्ट्रावर भगवाच फडकेल, पण तो निखळ, पवित्र, स्वच्छ आणि शुद्ध असा... 
 
- 9270333886