आज जागतिक दूरचित्रवाणी दिन

    दिनांक :21-Nov-2020
|
दूरदर्शन : माध्यमांचे सर्वात प्रभावशाली स्वरूप 
नागपूर, 
दैनंदिन जीवनात लोकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांच्या निराकरणासाठी दूरचित्रवाणी अर्थात् टेलिव्हिजन हे प्रभावी प्रसारमाध्यम आहे. विविध लोकोपयोगी कार्यक्रम आणि बातम्यांच्या माध्यमातून निष्पक्ष माहिती प्रदान करण्यात या माध्यमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दूरचित्रवाणीचा वापर जगभरातील जनतेच्या दैनंदिन समस्यांवर प्रकाश टाकून असंख्य लोकांना शिक्षित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ही गोष्ट संयुक्त राष्ट्रांनी मान्य केली. तसेच संप्रेषण आणि माहिती प्रसारणासाठी दूरदर्शन हे माध्यमांचे सर्वात प्रभावशाली रूप आहे, हे देखील संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केले. दूरचित्रवाणीची ही मोठी उपयुक्तता लक्षात घेऊन युनोने 21 नोव्हेंबर 1996 रोजी पहिली जागतिक दूरचित्रवाणी परिषद आयोजित केली होती आणि त्याच दिवशी 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून घोषित करण्यात आला.
 
 
tv_1  H x W: 0
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रसारित करण्यासाठी आणि सांस्कृतिक विविधता वाढविण्यासाठी दूरचित्रवाणीचा मोठा उपयोग होत आहे. लोकांना प्रभावित करणार्‍या जागतिक समस्यांचे सादरीकरण व त्यांचे निराकरण करण्यात दूरचित्रवाणीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. आपल्याकडे देशात राष्ट्रीय प्रसारण 1982 पासून सुरू झाले. पूर्वी फक्त श्रीमंतांकडे असणारे टीव्ही स्वस्त झाल्याने आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत.
 
 
टीव्ही हा विसाव्या शतकातील महत्त्वाचा शोध मानायला हवा. हे माध्यम आता माहिती, मनोरंजन व शिक्षणाचा प्रमुख स्रोत आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात हे माध्यम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पुस्तके व वृत्तपत्रांप्रमाणेच टीव्ही पाहण्याबाबतही तशीच क्रांती झाली आहे. त्यातील तंत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होत गेला आहे. डीटीएच म्हणजेच ‘डायरेक्ट टू होम’मुळे आपल्या पसंतीच्या वाहिन्या पाहून तेवढेच शुल्क देणे शक्य झाले आहे. या मनोरंजनावर नियंत्रण ठेवणारी-त्याच्या दराचे नियंत्रण करणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी लागली, यातून त्याचे महत्त्व लक्षात यावे.