स्पर्धा परीक्षा - इतिहास विषय तयारी

    दिनांक :10-Dec-2020
|
युवाकट्टा
- प्रा. डॉ. धनंजय गभने 
 
विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) कोणत्याही पदासाठी असली, तरी इतिहास (History Subject ) विषयावरील प्रश्न त्यात हमखास असतातच. इयत्ता दहावीपर्यंत आपण इतिहास विषय (History Subject ) आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून शिकतोच. पुढे जे विद्यार्थी विज्ञान अथवा वाणिज्य शाखेकडे वळतात, त्यांचा या विषयाशी संबंध तुटत जातो; पण पदवी वा पदव्युत्तर शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा या विषयाची सखोल तयारी करणे आवश्यक ठरते. काहींना मग यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. कला विषयाचे विद्यार्थी या विषयाशी पदवी वा पदव्युत्तर शिक्षणापर्यंत जुळलेले असल्यामुळे त्यांना तेवढा त्रास जाणवत नाही; परंतु स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी म्हटले की, आपली शाखा कोणतीही का असेना मेहनत घ्यावीच लागते. कारण या परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न विद्यापीठीय परीक्षांच्या स्वरूपाचे नसतात. वस्तुनिठ प्रश्नासोबत वर्णनात्मक प्रश्नांचीसुद्धा मुद्देसूद तयारी व अभ्यास करावा लागतो. मित्रांनो, आज आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत.
 
exam_1  H x W:
 
 
इतिहास अभ्यासाची पायाभरणी अर्थात पूर्वतयारी
मुळात इतिहास हा विषय आवडीने अभ्यास करण्याचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना यातील वंशावळी, सणावळी याची अकारण भीती वाटते. इतिहास विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पद्धतशीरपणे केली तर काहीच कठीण नाही. प्रामुख्याने इतिहास विषयाचे तीन भाग पडतात. प्रथम म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास व तिसरा म्हणजे अर्वाचीन इतिहास. यातही आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग एमपीएससी वा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावाच लागेल.
 
इतिहास अभ्यासाची पूर्वतयारी करताना त्याला प्रामुख्याने तीन भागात विभागून अभ्यास करणे सोईचे होईल. प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हटला तर अगदी सिंध संस्कृतीच्या इतिहास पासून सुरुवात करून वैदिक युग, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, मगध राज्य, मौर्य साम्राज्य त्यानंतरची राजवंश जसे कण्व, कुपाल, गुप्त साम्राज्य, हुण, राजपूत, गुर्जर, प्रतिहार, कनौज, पाल, येथपर्यंतचा कालावधी सर्व तपशीलवार अभ्यासणे आलेच. या सर्वांच्या काळातील वैशिष्ट्ये, सणावळी लक्षात ठेवणे जिकरीचे काम तर आहेच; सोबतच कठीण आहे. पण त्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंतची इतिहासाची पुस्तके फारच उपयोगी पडतात. एनसीईआरटी व राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वाचावी लागतील. त्यातून स्वत:ची टिपणे काढावीत व स्वतंत्र वहीत लिहून ठेवावीत. हीच बाब मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. मध्ययुगीन इतिहास म्हटला तर सुुलतान घराण्यापासून तर खिलजी, तुघलक, लोधी, मुगल साम्राज्यातील बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेबपर्यंतचा तपशीलवार इतिहास अभ्यासावा लागेल, तर अर्वाचीन इतिहासासाठी 1850 च्या उठावापासून तर स्वातंत्र्यापर्यंत व स्वातंत्र्योत्तर काळातील अगदी आतापर्यंतच्या घटनांचा अभ्यासही करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे इतिहासाची विभागणी करून पूर्वतयारी होण्यात मदत होते.
 

exam_1  H x W:
 
 
इतिहास अभ्यासाचा कृती आराखडा अर्थात अ‍ॅक्शन प्लॉन
 
मित्रांनो, वर सांगितल्याप्रमाणे आपली पूर्वतयारी झाली की प्रत्येक विभागश: (म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहास) टिपणे वही तयार करावी. उदा. प्राचीनकालीन इतिहासाचा आराखडा करावयाचा असेल तर त्या काळातील प्रत्येक युग व राजवंशानुसार तक्ते तयार करावेत. त्यात त्यांचे वैशिष्ट्ये, संस्कृती, लोकजीवन, साहित्य अशी वर्गवारी करावी. सर्व राजवंशाची सणावळी, कार्यकाळ यांचाही उल्लेख त्या तक्त्यात करावा. उदा. सिंध संस्कृतीतील शहरे, नद्या, हडप्पा उत्खननात सापडलेली प्रमुख शहरे त्यांची वैशिष्ट्ये, बौद्धकालीन व जैनकालीन साहित्य, जैन सभा, ब्राह्मण ग्रंथ व उपनिषदे याबाबतच्या बारीकसारीक नोंदीसाठी तक्त्यांचा आधार घ्यावा. यामुळे अभ्यास लक्षात राहतो. हाच कृती आराखडा मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासासाठी अंमलात आणावा.
 
सदर तक्ते आपल्या अभ्यासाच्या खोलीत लावावीत. त्यामुळे सतत आपल्या डोळ्यासमोर तक्ते असले तर लक्षात ठेवावयाला सोपे जाते. यात एक बाब लक्षात ठेवावी की, टिपणे वही व तक्ते यातील नोंदी एकसारख्या असू नयेत. कारण अगदी कठीण व क्लिष्ट नोंदीसाठी तक्ते तयार करावेत तर टिपणे वहीत सर्व तपशीलवार नोंदी कराव्यात. कोणतीही नोंद सुटता कामा नये. यामुळे एकदा मूळ पुस्तकातून सर्व नोट्स काढले की पुन्हा ते मूळ पुस्तक वाचायची गरज पडणार नाही व स्वत: काढलेले नोट्स अभ्यास करताना फारच उपयोगी पडतात. पुन्हा महत्त्वाची बाब म्हणजे इतिहास विषय असा आहे की, एकदा वाचून होत नाही, त्याचे वारंवार वाचन करणे आवश्यक असते; पण लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करणेही आवश्यक आहे. जसे वंशावळी लक्षात ठेवायच्या असतील तर विविध राजवटीत होऊन गेलेले राजे व त्यांच्या नावाचे पहिले अक्षर अनुक्रमे जुळवून लक्षात ठेवता येतील. यासारख्या अनेक ट्रिक्स आपण वैयक्तिक पातळीवर तयार करून त्यानुसार अभ्यासाचा अ‍ॅक्शन प्लान तयार होत जाईल.
 
मध्ययुगीन इतिहास असेल तर विविध घराणे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटना, अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत लार्ड गव्हर्नर जनरल यांचा कार्यकाळ, त्यांचे घेतलेले निर्णय, घडलेल्या घटना यांचा अनुक्रम जुळवून ते लक्षात ठेवण्यासाठी या ट्रिक्स कामात येतात. अर्थातच अभ्यास करताना वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास करू नये. इतिहास मग कोणत्याही काळातील असेल. प्रत्येक घटनांच्या मागे असलेली कारणे, त्यानंतरचा परिणाम यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावाच लागेल. त्यानंतरच तो आपल्या लक्षात राहील व त्या अनुषंगाने परीक्षेत विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे सहज सोपे होईल, हे लक्षात ठेवावे. अर्थातच वरपांगी अभ्यास करून चालणार नाही.
 
महत्त्वाच्या बाबी
इतिहास विषयाचा अभ्यास करताना खालील बाबी विशेष लक्षात ठेवाव्यात.
 
सर्वप्रथम इतिहास विषयाच्या मूळ पुस्तकातूनच (एनसीईआरटी तसेच राज्य शिक्षण मंडळ) अभ्यास करावा. बाजारातील गाईडसद़ृश पुस्तकातून अभ्यास करू नये. यातील माहिती आपल्याला गोंधळात टाकू शकते.
 
स्वत:च्या नोट्स अवश्य काढाव्यात, तक्ते बनवावेत.
 
ग्रुपस्टडी केला तर फार चांगले, त्यामुळे बर्‍याच मुद्यांच्या बाबतीत आपल्या मनातील गोंधळ कमी होतो.
इतिहासाची विभागणी (प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन) करून अभ्यास केला तर ते सोपे जाते.
 
राजवटी, सणावळी, महत्त्वपूर्ण घटना लक्षात ठेवण्यासाठी फक्त स्वत:ची ट्रिक्स विकसित कराव्यात.
 
अभ्यासाची सुरुवात वस्तुनिष्ठपणे करू नये (म्हणजे बहुपर्यायी प्रश्न वाचून) आधी मूळ पुस्तके संपूर्ण वाचून काढावीत. नंतर त्यातून आपल्या स्वत:च्या नोट्स काढाव्यात. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र नोंदवही करून त्यात नोट्स लिहाव्यात.
 
ज्या ठिकाणी सणावळीचा गोंधळ वा संभ्रम निर्माण होत असेल त्या ठिकाणी इतिहास विषयाच्या वरिष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे व संभ्रम दूर करावा.
 
इतिहास विषय अभ्यासण्यासाठी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी कठीण जातो म्हणून वारंवार वाचन करणे आवश्यक आहे. एकदा वाचून झाले, त्यातील नोंदी तयार केल्या की संपले असे नाही. नोंदी करताना त्या तपशीलवार व विस्तृत कराव्यात. जेणेकरून कोणतीही बाब त्यातून सुटणार नाही. स्वत: घेतलेल्या नोंदी पक्क्या लक्षात राहतात. म्हणूनच बाजारातील तयार मजकूर शक्यतो टाळावा.
 
इतिहासाची आवड असणार्‍या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार करावा, त्यांच्याशी चर्चा करावी. संबंधित शिक्षकांच्या संपर्कात असावे व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्याला जर वेळ असेल तर व शक्य असेल तर इतिहासकालीन स्थळांना (जसे गड किल्ले, मंदिरे, तलाव इ.) भेटी द्याव्यात. यामुळे पुन्हा आपल्या ज्ञानात भर पडते.
 
सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, स्पर्धा परीक्षांच्या संबंधित प्रकाशित होणार्‍या नियतकालिकांमधील इतिहास विषयातील प्रश्नपत्रिका सोडवून पहाव्यात. यापुढे अभ्यासाची उजळणी होत जाते व आत्मविश्वास वाढत जातो.
 
काही महत्त्वाची संदर्भ पुस्तके
• एन.सी.ई.आर.टी. व राज्य शिक्षण मंडळाची वर्ग 8 ते 12 ची इतिहासाची पुस्तके.
• फ्रीडम स्ट्रगल - बिपीन चंद्रा.
 
• इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडस - बिपीन चंद्रा
• ब्रिटिशकालीन भारत का इतिहास - विद्याधर महाजन.
 
इतिहास विषयाच्या तयारीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा!
9423640251